दिवाळी म्हणजे प्रकाश सण. आनंद, उत्साह, जल्लोष सगळीकडे अगदी ओसंडून वाहत असतो. दिवाळी म्हटले की, डोळ्यासमोर सर्वात आधी येतात ते दिवे. फराळ, आकाशकंदीत, विद्युत रोषणाई, रंगबेरंगी रांगोळी या सगळ्यांच्या जोडीला लक्ष वेधून घेतात ते दिवे अर्थात पणत्या. दिवाळी या सणाचे मुख्य आकर्षणच दिवे असते. त्यामुळे या दिव्यांशिवाय हा सण निव्वळ अपूर्ण आहे. शिवाय दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण मग दिवे तर यायलाच पाहिजे.
दिवाळीचे पाच दिवस आपल्याकडे संध्याकाळ झाली की, घरासमोर, दारात पणत्या ठेवल्या जातात. या पणत्यांनी संपूर्ण घर सजवले जाते आणि त्यांच्या उजेडात घर लख्ख न्हाऊन निघते. मात्र तुम्हाला माहित आहे का, सुख-समृद्धीचे प्रतीक असलेल्या या सणामध्ये दिवे लावताना देखील जर आपण थोडे नियम पळाले आणि की गोष्टी केल्या तर वास्तुदोष देखील दूर होतो. मग दिवाळीच्या दिवसांमध्ये नक्की दिवे कुठे लावायचे?, कसे लावायचे?, कोणत्या दिशेला ठेवायचे?, तेलाचे की तुपाचे कोणते दिवे लावावे? आदी अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीसमोर जो दिवा लावला जातो, तो आपल्या डाव्या हाताला लावावा. शास्त्रानुसार दिवाळीला देवी लक्ष्मीसमोर डाव्या हाताला तुपाचा दिवा लावावा म्हणजे या दिवशी लावलेला दिवा देवतेच्या उजव्या बाजूला असावा. तर तेलाचा दिवा उजव्या हाताकडे ठेवावा. या प्रकारे दिवा लावणे शुभ मानले जाते. यासोबतच घराच्या मंदिरात दिवा लावावा. यानंतर प्रदोषकाळात सूर्यास्तानंतर दिवा लावणे शुभ मानले जाते. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख-समृद्धी नांदते.
स्वयंपाकघरातील आग्नेय कोपऱ्यात दिवा लावावा. असे केल्याने कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. यासोबतच दिवाणखान्यातही दिवा लावा. दिवाणखान्यात दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि वातावरणात शांतता राहते. याशिवाय तुळशीजवळ, पवित्र झाडांजवळ देखील दिवा लावणे शुभ मानले जाते.
शास्त्रानुसार तुपाच्या दिव्यात पांढरी उभी वात म्हणजे फुलवात वापरावी. तेलाच्या दिव्याची वात लांब म्हणजे तेलवात असावी हे पडताळून मगच दिवा लावत जा. पूजेमध्ये विशेष फळ मिळण्यासाठी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. तिळाचे तेल वापरत असल्यास वात लाल किंवा पिवळी रंगाची असल्याचे लक्षात ठेवले पाहिजे. दक्षिण दिशा यमाची असते. केवळ धनत्रयोदशीदिनी दक्षिणेला तोंड करून दिवा लावला जातो. त्याला यमदीपदान असे म्हणतात. दिवाळीला शुद्ध तुपाचे दिवे लावल्यास घरात समृद्धी येते, अशी मान्यता आहे.
कोणत्या देवी-देवतांसमोर तुपाचा दिवा लावायचा?
धार्मिक मान्यतेनुसार, लक्ष्मी, भगवान गणेश, भगवान विष्णू, देवी दुर्गा आणि भगवान विष्णूची पूजा करताना तुपाचा दिवा लावणे अधिक योग्य मानले जाते.
दिवा लावण्याचा मंत्र
शुभम करोति कल्याणं, आरोग्यं धन संपदाम्। शत्रु बुद्धि विनाशाय, दीपं ज्योति नमोस्तुते।।
– दिवाळीत नेहमी शुद्ध अंतःकरणाने दिवा लावावा असे मानले जाते. दिवा लावताना, आपले मन शांत आणि सकारात्मक भावनांनी भरलेले ठेवा.
– दिवाळीला दिवा लावण्यासाठी तूप आणि शुद्ध तेल वापरणे शुभ मानले जाते.
– दिवाळीला नवा दिवा लावण्याची परंपरा आहे.
– मातीचे दिवाळीचे दिवे चिरलेले किंवा तुटलेले नाहीत याची खात्री करा.
– पितळ, तांबे आणि चांदीचे दिवे लावण्यापूर्वी ते व्यवस्थित स्वच्छ करा.
– दिवा पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणे शुभ असते. दिवा लावताना ॐ किंवा इतर मंत्रांचा जप करावा.
– तुम्ही हवे तितके दिवे लावू शकतात, परंतू ५, ७, ९, २१, ५१, १०८ या विषम संख्येत दिवे लावणे शुभ मानले जाते.
– बहुतेक लोक पूर्वेकडे तोंड करून दिवा लावतात, कारण पूर्वेला देवांची दिशा मानली जाते.
– दिवा स्वच्छ ठिकाणी ठेवा, जेथे धूळ किंवा इतर अशुद्धी नसावी.
पूर्व दिशा
पूर्व दिशा ही सूर्यदेवाची दिशा मानली जाते. या दिशेला दिवा लावल्याने आरोग्यास लाभ होतो, बुद्धिमत्ता वाढते आणि सकारात्मक उर्जा संचारते.
=========
हे देखील वाचा : जाणून घ्या दिवाळीबद्दलच्या ‘या’ खास गोष्टी
=========
पश्चिम दिशा
पश्चिम दिशा ही पूर्वजांची दिशा मानली जाते. या दिशेला दिवा लावल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि घरात शांतता कायम राहते.
उत्तर दिशा
उत्तर दिशा ही कुबेर देवाची दिशा मानली जाते. या दिशेला दिवा लावल्याने घरात आर्थिक लाभ आणि समृद्धी येते.
दक्षिण दिशा
दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली जाते. या दिशेला दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सुरक्षितता राहते.
(ही माहिती धार्मिक शास्त्रांच्या श्रद्धेवर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. )