प्रत्येक व्यक्तीला तिच्या वैयत्तिक, व्यावसायिक आयुष्यात कौतुक, प्रशंसा नेहमीच आवडत असते. दोन गोड आणि कौतुकाचे शब्द त्या व्यक्तीला अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा देतात. हा नियम सर्वच क्षेत्रातील लोकांना अगदी गृहिणींना देखील लागू होतो. समोरच्या व्यक्तीने आपले केलेले कौतुक भारावून टाकणारे असले तरी कामाप्रती आपली जबाबदारी देखील तितकीच वाढते.
कलाक्षेत्रात देखील असेच घडते. कलाकारांना त्यांच्या कामासाठी दरवर्षी विविध पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. त्यांच्या कामाचे कौतुक तर शाबासकीची थाप म्हणून त्यांना पुरस्कार दिला जातो. आजच्या घडीला या क्षेत्रात लहान मोठे अनेक पुरस्कार आहेत. सर्वच पुरस्कार कलाकारांसाठी महत्वाचे असतात. मात्र असे असले तरी ज्यांच्यामुळे या कलाविश्वात काम करायला मिळते, अशा दादासाहेब फाळके यांच्या नावाने मिळणाऱ्या पुरस्काराचे महत्व काही औरच असते.
नुकताच २०२४ सालातला दादासाहेब फाळके पुरस्कार मिथुन चक्रवर्ती यांना सिनेसृष्टीतील योगदानाबाबत जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सिनेसृष्टीतील पुरस्कारांपैकी सर्वात मोठा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार भारत सरकारतर्फे दरवर्षी चित्रपटांमध्ये महत्वपुर्ण कामगिरी करणाऱ्या कलाकारांना आणि तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. कलाविश्वात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला आपल्याला देखील आपल्या कामासाठी या पुरस्काराने सन्मानित केले जावे असे वाटत असते. अशा या पुरस्काराबद्दल आणि त्याच्या स्वरूपाबद्दल आपण आज जाणून घेऊया.
भारतीय सिनेसृष्टीचे जनक असणाऱ्या दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दीवर्षापासूनअर्थात इ.स. १९६९ मध्ये हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. हा पुरस्कार माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत खात्यातर्फे दिला जातो. दरवर्षी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळयादरम्यान ह्या पुरस्काराचे वाटप केले जाते.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या चित्रपट महोत्सव संचालनालयाद्वारे दरवर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभात हा सन्मान प्राप्त व्यक्तीला दिला जातो. प्राप्तकर्त्याचा त्यांच्या “भारतीय चित्रपटांच्या विकासासाठी केलेल्या उत्कृष्ट योगदानासाठी” हा सन्मान केला जातो. भारतीय चित्रपट उद्योगातील प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असलेल्या एकामोठ्या समितीद्वारे या सन्मान प्राप्त कलाकाराची निवड केली जाते.
हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली तेव्हापासून आतापर्यंत या पुरस्काराचे स्वरुप बदलले. १९६९ साली सुरु झालेला हा पुरस्कार आज २०२४ सालापर्यंत या ५५ वर्षांच्या कालावधीत बऱ्याच स्वरूपात बदलत गेला आहे. हा पुरस्कार सुरु झाला तेव्हा ढाल, शाल आणि ११ हजार रुपये हे या दादासाहेब फाळके पुरस्काराचे स्वरुप होते. त्यानंतर सुवर्णपदक, शाल आणि २० हजार रुपये हे या पुरस्काराचे स्वरुप झाले. तर १९८२ पासून सुवर्णकमळ १ लाख रुपये आणि शाल या स्वरूपात हा पुरस्कार प्रदान केला जाऊ लागला. २००३ मध्ये या पुरस्काराची रक्कम २ लाख रुपये करण्यात आली. त्यानंतर २००६ मध्ये ही रक्कम १० लाख रुपये करण्यात आली. आजतागायत ही रक्कम १० लाखच आहे.
========
हे देखील वाचा : महाराष्ट्रातल्या जागृत साडे शक्तिपीठांची माहिती
========
दरम्यान दादासाहेब फाळके हा पुरस्कार पहिल्यांदा “भारतीय सिनेमाची फर्स्ट लेडी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देविका राणी यांना देण्यात आला. १९६९ ते २०२४ या ५५ वर्षांच्या कालावधीत ५५ अशा प्रतिभावान कलावंतांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
आतपर्यंत हा पुरस्कार कोणाकोणाला मिळाला
१) देविका राणी
२) बीरेंद्रनाथ सरकार
३) पृथ्वीराज कपूर
४) पंकज मलिक
५) सुलोचना
६) बी.एन. रेड्डी
७) धीरेंद्रनाथ गांगुली
८) कानन देवी
९) नितीन बोस
१०) रायचंद बोराल
११) सोहराम मोदी
१२) जयराज
१३) नौशाद
१४) एल. व्ही. प्रसाद
१५) दुर्गा खोटे
१६) सत्यजीत रे
१७) व्ही. शांताराम
१८ ) बोम्मीरेड्डी नागी रेड्डी
१९) राज कपूर
२० ) अशोक कुमार
२१ ) लता मंगेशकर
२२ ) अक्किनेनी नागेश्वर राव
२३) भालजी पेंढारकर
२४) भुपेन हजारिका
२५) मजरुह सुल्तानपुरी
२६) दिलीप कुमार
२७ ) डॉ. राजकुमार
२८) शिवाजी गणेशन
२९ ) कवी प्रदीप
३०) बलदेवराज चोप्रा
३१) हृषिकेश मुखर्जी
३२) आशा भोसले
३३) यश चोप्रा
३४) देव आनंद
३५) मृणाल सेन
३६) अदूर गोपालकृष्णन
३७) श्याम बेनेगल
३८) तपन सिन्हा
३९) मन्ना डे
४०) व्ही. के. मूर्ती
४१ ) डी. रामानायडू
४२) के. बालचंदर
४३) सौमित्र चॅटर्जी
४४) प्राण
४५) गुलजार
४६ ) शशी कपूर
४७ ) मनोज कुमार
४८ ) के. विश्वनाथ
४९) विनोद खन्ना (मरणोत्तर)
५० ) अमिताभ बच्चन
५१) रजनीकांत
५२ ) आशा पारेख
५३) वहिदा रेहमान