Home » वयोवृद्ध चीन

वयोवृद्ध चीन

by Team Gajawaja
0 comment
China
Share

जगावर राज्य करण्याची स्वप्ने पहाणारा चीन वयोवृद्ध होत आहे. म्हणजेच चीनमध्ये वयोवृद्ध नागरिकांची संख्या वाढत आहे. चीनमध्ये जन्मदरातही घट झाली आहे. कमी होणारी लोकसंख्या आणि आहे त्या लोकसंख्येचे वाढते वय, या कैचीमध्ये चीन सापडला आहे. एकेकाळी चीनमध्ये सर्वात जास्त मनुष्यबळ उपलब्ध होते. मात्र आता त्याच चीनमध्ये मनुष्यबळाची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळेच चीनमध्ये निवृत्तीचे वय वाढवण्यात आले आहे. चीनमध्ये पुरुषांच्या निवृत्तीचे वय 60 होते, ते आता 63 वर्ष करण्यात आले आहे. शिवाय महिलांचे निवृत्तीचे वय 55 होते, ते 58 करण्यात आले आहे. चीनमध्ये वयोवृद्ध नागरिकांची संख्या अधिक होत असल्यानं अनेक सामाजिक प्रश्नही तयार होत आहेत. चीनच्या ग्रामीण भागातील तरुण, नोकरीसाठी शहरात आले आहेत. ही मंडळी आता शहरात स्थिरावली असून त्यांना गावाकडे पुन्हा जायचे नाही.

अशात गावामध्ये रहाणा-या वयोवृद्धांची काळजी घेण्यासाठीही कोणी नाही. चीनच्या ब-याच गावात एकट्या रहाणा-या वयोवृद्धांची मनस्थितीही खराब झाल्याचे आढळून आले आहे. अशा वृद्धांना मदतीचा हात देण्यासाठी येथील काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला असून वृद्धाश्रमांची स्थापना करण्यास सुरुवात केली आहे. जागतिक महासत्ता बनू पहाणा-या चीनमध्ये सामाजिक समस्यांचे मोठे जाळे तयार झाले आहे. यातील प्रमुख समस्या म्हणजे, चीनमध्ये वाढती वयोवृद्धांची आहे. यात आणखी एक काळजी घेण्याची गोष्ट म्हणजे, या वयोवृद्धांची काळजी घेण्यासाठी योग्य ती व्यवस्था चीनमध्ये नाही. तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुलभ अशा वैद्यकीय सुविधाही नाहीत. त्यामुळे या वयोवृद्धांना त्यांचे रोजचे अन्न मिळवण्यासाठी मिळेल ते काम करावे लागत आहे. (China)

चीनमधील अर्थशास्त्रज्ञांच्या मते, पुढच्या 25 वर्षात चीनमधील हे सर्वात मोठे मानवतावादी संकट असणार आहे. चीनमधील लोकसंख्येचे सरासरी वय सतत वाढत आहे आणि वृद्ध लोकांची लोकसंख्या वाढल्याचे लक्षात घेऊन चीन सरकारने आपल्या देशात निवृत्तीचे वय वाढवले आहे. मात्र असे असले तरी, चीन पुढच्या काही वर्षात या वयोवृद्धांचा कार्यभार कोण संभाळणार असा प्रश्न उपस्थित रहाणार आहे. चीनमधील आयुर्मान 2021 पर्यंत 78 वर्षांपर्यंत वाढले आहे. 2050 पर्यंत वयोमान 80 वर्षांपेक्षा जास्त असेल असा अंदाज आहे. त्यामुळे चीनमधील कामकाजाच्या नियमात तातडीनं बदल करुन घ्याव्यात अशी मागणी करण्यात येत आहे. याशिवाय वृद्धांना आधार देण्यासाठी आवश्यक अशी योजनाही सरकारी पातळीवरुन राबवावी अशीही मागणी आहे. (China)

नुकत्याच झालेल्या एका सुधारणेत चीनमधील पुरुषांसाठी निवृत्तीचे वय 60 वरून 63 वर्षे करण्यात आले आहे. तर महिलांचे वय 55 वरून 58 वर्षे करण्यात आले आहे. हे बदल 1 जानेवारी 2025 पासून अंमलात येणार आहेत आणि 15 वर्षांनी लागू होणार असून काही खाजगी संस्थांमध्ये त्याची कार्यवाहीही सुरु झाली आहे. सरकारनं नागरिकांना जास्त वर्ष काम करण्याची परवानगी दिल्याने पेन्शन बजेटवरील दबाव कमी होणार आहे. चीनमधील तरुणांची लोकसंख्या कमी होत असतांना चीनच्या सरकारी खजानावरील बोजाही वाढला आहे. कोरोनाकाळात चीन सरकारला झालेली आर्थिक हानि मोठी आहे. याशिवाय चीनमधील पर्यटन व्यवसायही अपेक्षित अशा तेजीत नाही. या सर्वाचा एकत्रित परिणाम तेथील अर्थव्यवस्थेल बसत आहे.
याच एक परिणाम म्हणजे, चीनमध्ये नेमक्या नोक-या उपलब्ध आहेत. (China)

==============

हे देखील वाचा : मेड इन चायनामुळे ओझोन थरालाही धोका

===============

ज्यांना नोक-या आहेत, ते तरुण सतत कामाच्या तणावाखाली आहेत. त्याचा परिणाम म्हणून या तरुणांना लग्न करण्यास नकार दिला आहे. अशा एकट्या रहाणा-या तरुणांची संख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. तरुणीही यात मोठ्या संख्येनं आहेत. मुलाला जन्म दिला तर काही काळ सुट्टी घ्यावी लागले, परिणामी नोकरीतून कमी केलं जाईल, या भयापोटी अनेक तरुणी लग्न करण्यासच नकार देत आहेत. या तरुणीही शहरात कुटुंबापासून वेगळं राहून स्वतःचे करिअर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परिणामी चीनमध्ये शहरी भागात एकटी रहाणारी तरुण पिढी आणि ग्रामीण भागात एकटी रहाणारी वयोवृद्ध पिढी असे दोन मोठे गट पडले आहेत. या दोन्ही गटांना मानसिक समस्येचा विळखा आहे. एकटेपणामुळे त्यांच्यात शारीरिक आरोग्याच्याही समस्या निर्माण झाल्या आहेत. ही सर्व परिस्थिती पहाता पुढच्या 25 वर्षात चीनमध्ये सर्वाधिक वयोवृद्ध लोकसंख्या असणार असल्याचे भाकीत येथील समाजशास्त्रज्ञ करीत आहेत. (China)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.