गणपती बाप्पा सर्वांच्या घरी थाटात विराजमान झाले आहेत. बाप्पा घरी आल्यानंतर चाहूल लागते ती गौरींच्या आगमनाची. माहेरवाशिणी बाप्पा आल्यानंतर सप्तमीला तीन दिवसांचा पाहुणचार घेण्यासाठी येतात. शास्त्रानुसार ज्येष्ठा गौरीचे पूजन हे भाद्रपद महिन्यातील ज्येष्ठा नक्षत्रावर करायला हवे. अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्यात ज्येष्ठा गौरीचे पूजन करतात. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीला गौरीचे आवाहन होते. दुसऱ्या दिवशी पूजन आणि तिसऱ्या दिवशी तिचे विसर्जन केले जाते. यंदा ज्येष्ठा गौरी आवाहान हे १० सप्टेंबरला मंगळवारी होणार आहे.
अतिशय दणक्यात आणि मोठ्या उत्साहाने या गौरींचे स्वागत संपूर्ण महाराष्ट्रात केले जाते. घरोघरी आपल्या परंपरेनुसार आणि रितीनुसार गौरींचे आगमन होते आणि त्यांचे कोडकौतुक केले जाते. आता या गौरींचे प्रकार जे वेगवेगळे आहे, तसेच या गौरींचे नैवेद्य देखील अतिशय विविध प्रकारचे असतात. प्रत्येक प्रांतानुसार आणि प्रदेशानुसार गौरींच्या नैवेद्यामध्ये भिन्नता आढळून येते. चला जाणून घेऊया गौरींच्या या विविध प्रकारच्या नैवेद्यांबद्दल.
विदर्भ
महाराष्ट्रातील विदर्भात या सणाला महालक्ष्मीचा सण असे म्हटले जाते. या दिवशी गौरी आगमनाला भाजी- भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. तर बऱ्याच ठिकाणी देवीच्या नैवेद्यात कांदा-लसूण वगळले जाते. महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी पंचपक्वांनाचा नैवेद्य अर्पण केला जातो. तसेच फराळात मोदक, करंज्या, सांजोऱ्या यांचा फुलोरा देखील बनवला जातो.
महालक्ष्मीच्या नैवेद्यात विविध पदार्थ वाढले जातात. यात प्रामुख्याने कोशिंबीर, चटण्या, मोदक, पुरणपोळी, बटाटा किंवा अळूची भाजी, कढी, आंबील, नकुल्यांची खीर, पंचामृत, १६ भाज्यांपासून तयार केलेली भाजी, वरण-भात, तसेच फराळाच्या पदार्थात लाडू, करंजी, अनारसे हे पदार्थ बनवले जातात.
मराठवाडा
महाराष्ट्रातील मराठवाड्यात, खान्देशी भागात किंवा पश्चिम महाराष्ट्रात विदर्भासारखाच नैवेद्य असतो. १६ भाज्या, १६ कोशिंबिरी, १६ चटण्या, १६ पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. गोडाच्या पदार्थांमध्ये काहीसा फरक पाहायला मिळतो. इथे अनेक भागात साखरेची पुरणपोळी नैवेद्यात वाढली जाते. गौरी विसर्जनाच्या दिवशी दही-भात आणि मुरडी कानोले यांचा नैवेद्य अर्पण केला जातो. तसेच येथे देखील अनेक घरात संजोऱ्यांचा नैवेद्य दाखवला जातो. सोबतच अनेक घरांमध्ये या महालक्ष्मीची ज्वारी आणि गहूने ओटी भरली जाते. गौरी पूजनाच्या दिवशी पुरणाच्या १६ अर्त्यानी देवीची आरती केली जाते. सोबतच सवाष्ण आणि ब्राह्मण जेवायला बोलवतात.
======
हे देखील वाचा : जाणून घ्या जेष्ठा आणि कनिष्ठा गौरीबद्दल
======
कोकण
कोकणात याला गौरी- गणपतीचा सण म्हटले जाते. हा सण या ठिकाणी महत्त्वाचा मानला जातो. गौरीला आगमनाच्या दिवशी तांदळाची भाकरी आणि भाजीचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी हळदीच्या पानातल्या पातोळ्या आणि भाज्यांचा नैवेद्य असतो. यामध्ये प्रामुख्याने उकडीचे नैवेद्य असतात. तर याभागात कोळीवाड्यातील ठिकाणी तिखटाचा नैवेद्य दाखवला जातो. पूर्वीपासून सुरु असलेली परंपरा आजही गावपाड्यातील लोक जपतात. तिखटाच्या नैवेद्यात मटण, चिकन, चिंबोऱ्या, मासे आणि कोंबडीवडे असे मांसाहारी पदार्थ वाढले जातात.
जेष्ठा आणि कनिष्ठा गौर बसण्यामागची आख्यायिका
वर्षोंनुपूर्वी कोलासुर नावाचा एक राक्षस स्त्रियांना फार त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून स्त्रिया एकत्र झाल्या व त्यांनी ब्रह्मा, विष्णू, आणि महेश यांना प्रार्थना केली. त्यांनी या तीनही देवांना आपल्यावर आलेल्या संकटाची जाणीव करून दिली. त्यांचे संकट पाहून देवांनी हे काम विष्णूंची पत्नी महालक्ष्मी हिच्याकडे सोपविले. तेव्हा महालक्ष्मी हिने कोलासुराशी युद्ध केले व त्याचा नाश केला. महालक्ष्मी हिच्या कृपेने स्त्रिया संकटमुक्त होऊन सुखी झाल्या. देवीच्या त्या उपकाराचे स्मरण म्हणूनच महालक्ष्मी उत्सव साजरा केला जातो.