Home » श्रीमंतांचा लाडका देश !

श्रीमंतांचा लाडका देश !

by Team Gajawaja
0 comment
United Arab Emirates
Share

संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएई हे जगभरातील श्रीमंतांचे आवडते डेस्टिनेशन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. फारकाय भारतातील करोडपतीही संयुक्त अरब अमिरातीमध्ये रहाण्याला पसंती देत आहेत. त्यामुळे या देशात दरवर्षी हजारो नागरिक स्थलांतर करत आहेत. यामध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. यावर्षीही कमीत कमी ४३०० भारतीय संयुक्त अरब अमिरातीमध्ये स्थलांतरित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. संयुक्त अरब अमिराती हा जगातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या देशांपैकी एक आहे. जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीध्ये या देशाचा वरचा क्रमांक आहे. गगनचुंबी इमारती, आलिशान शॉपिंग मॉल्स, लक्झरी हॉटेल्स, चकचकीत रस्ते आणि त्यावरुन वेगानं धावणा-या महागड्या गाड्या यासाठी हा देश ओळखला जातो. या देशाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे, गेल्या काही वर्षात येथे अनेक देशांचे आणि धर्माचे नागरिक एकत्र झाले आहेत. जवळपास २०० देशातील नागरिक या संयुक्त अरब अमिरातीमध्ये रहात आहेत. जगातील सर्वात सुंदर देशामध्येही या देशाचा समावेश होतो. (United Arab Emirates)

तसेच हा सुरक्षित देशही मानला जातो. नुकत्याच प्रकाशित झालेल्या फोर्ब्स मासिकानुसार, यूएई हा फिनलंड, कॅनडा, यूके आणि जपानसह करिअरच्या संधींसाठी जगातील सर्वोत्तम देशांपैकी एक देश आहे. पर्यटनासाठी हा देश सर्वोत्तम आहे. युएईमधील शिक्षण प्रणालीही आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे. विविध आंतरराष्ट्रीय शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे या देशात आहेत. अर्थात देशात कितीही सुविधा असल्यातरी आरोग्याची सुविधा ही सर्वोत्तम मानली जाते. त्यातही युएई अग्रेसर आहे. येथील आरोग्यसेवा जगभरात उत्कृष्ट मानली जाते. जगाच्या कानाकोपऱ्यातील सर्वोत्कृष्ट डॉक्टर, परिचारिका, विशेषज्ञ आणि सर्जन या देशात आहेत. या सर्व सुविधांमुळेच जगभरातील श्रीमंतांचा लाडक देश म्हणून युएईचा नंबर लागला आहे. युएईमध्ये जगभरातील श्रीमंत कायम वास्तव्यासाठी स्थलांतर करत आहेत. या नागरिकांचे युएईमध्ये स्वागत होतेच, शिवाय त्यांना आवश्यक अशा सर्व सरकारी मदतीसाठी विशेष दालन त्यांना मिळते. त्यामुळे परदेशी नागरिक अधिक सुलभतेनं या देशात राहू शकत आहेत. या सर्वात भारतीयांचीही संख्या मोठी आहे. (United Arab Emirates)

इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट मायग्रेशन फर्म हेन्ली अँड पार्टनर्सच्या अहवालानुसार अंदाजे ४३०० भारतीय करोडपती या वर्षी म्हणजे २०२४ मध्ये युएईमध्ये स्थलांतरीत होण्यीची शक्यता आहे. २०२३ च्या अहवालानुसार जवळपास ५१०० भारतीय करोडपती अन्य देशात स्थायिक झाले आहेत. यातही युएईमध्ये स्थायिक होणा-यांची संख्या अधिक आहे. भारतीयांप्रमाणेच, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जपान, जर्मनी सारख्या देशांमधूनही अनेक नागरिक युएईच्या वाटेवर आहेत. त्याला कारणीभूत येथील वातावरण आहे. युएईमधील शहरे ही आधुनिक अशा साधनांनी युक्त आहेत. त्यासोबत युएईमधील समुद्र किना-यांवर निवांत रहाण्याची इच्छाही अनेकांची असते. अशा दोन्ही वातावरणात या देशात रहाता येते, त्यामुळे तरुणवर्गासोबतच निवृत्त मंडळीही या देशाकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे संयुक्त अरब अमिराती हे जगातील तिसरे मोठे स्थलांतर केंद्र झाले आहे. (United Arab Emirates)

अमेरिका आणि सिंगापूर हे दोन देश पहिल्या आणि दुस-या क्रमाकांवर असले तरी या देशातील नागरिकही मोठ्या संख्येनं युएईमध्ये वास्तव्यास येत आहेत. ही सर्व श्रीमंत मंडळी आपला देश सोडून अन्य देशात रहायला का जातात, हाही एक प्रश्न आहे. त्याचे उत्तर म्हणजे, कुटुंबाची सुरक्षितता हे आहे. बहुतेक श्रीमंत कुटुंब ही आपल्या सोबत आपल्या कुटुंबाची सुरक्षा महत्त्वाची मानतात. शिवाय व्यवसायाच्या संधी, उत्तम जीवनशैली, मुलांचे शिक्षण, आरोग्य सुविधा आणि उच्च जीवन शैली याला प्राधान्य देतात. या सर्वांमध्ये युएई अग्रेसर आहे. मुख्य म्हणजे, या देशात शून्य आयकर भरावा लागतो. कर आणि कायदा आणि सुव्यवस्था ही व्यावसायिकांची पहिली पसंती आहे. त्यामुळेच बहुतेक श्रीमंत यूएईमध्ये राहणे पसंत करतात. (United Arab Emirates)

======

हे देखील वाचा : इराकच्या हुकूमशाही सरकारचे विधेयक

======

१९७१ मध्ये, पर्शियन गल्फमधील अबू धाबी, शारजाह, दुबई, उम्म अल क्वावेन, अजमान, फुजैराह आणि रस अल खैमाह या सात राज्यांना एकत्र करून स्वतंत्र संयुक्त अरब अमिरातीची स्थापना करण्यात आली. संयुक्त अरब अमिराती, तेलसाठ्याच्या बाबतीत जगातील सहाव्या क्रमांकाचा देश आहे. या तेलसाठ्यांमुळेच काही वर्षातच हा देश जगातील सर्वोत्तम देशांच्या यादीत वरच्या क्रमांकावर जाऊन बसला आहे. आता याच देशात जगभरातील नागरिक मोठ्या संख्येनं स्थलांतरित होत आहेत. (United Arab Emirates)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.