बांगलादेशात सत्ता परिवर्तन झाले. शेख हसिना यांनी बांगलादेश सोडल्यावर या देशात हिंदूंवर अनेक ठिकाणी हल्ले करण्यात आले. हिंदू मंदिरांवरही दंगेखोरांना हल्ला करुन मंदिरांना आगी लावल्या आहेत. बांगलादेशच्या १७ कोटी लोकसंख्येपैकी १ कोटी ३५ लाख हिंदू आहेत. या हिंदूंनी बांगलादेशच्या उभारणीमध्ये महत्त्वाचा वाटा उचलला आहे. आता त्याच हिंदूंवर हल्ले करुन त्यांची संपत्ती लुटण्यात येत आहे. बांगलादेशात अनेक संपन्न मंदिरे आहेत. येथील काही मंदिरांचा हिंदू पौराणिक ग्रंथांमध्येही उल्लेख आहे. येथील माता शितळादेवी मंदिर आणि ढाकादेवी मंदिरांचा उल्लेख हिंदू ग्रंथांत आहे. या सर्व मंदिरांना आता समाजकंटकांपासून धोका निर्माण झाला आहे. इस्कॉनची काही मंदिरे बांगलादेशात असून यापैकी एका मंदिराला आग लावण्यात आली आहे. आत्तापर्यंत शांतपणे जगणा-या आणि सर्व धर्माला समान वागणूक देणा-या बांगलादेशींमध्ये त्यामुळेच संतापाची लाट उसळली आहे.
बांगलादेशमधील अनेक मंदिरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. (Bangladesh Hindu Temples)
बांगलादेशाचा इतिहास हा हिंदू धर्माबरोबर जोडलेला आहे. भारताची फाळणी होण्यापूर्वी भारताचा एक भाग असलेल्या या देशात अनेक मंदिरे आहेत. मंदिरे उभारण्यात पुढाकार घेणा-या पाल आणि सेन घराण्यासारख्या हिंदू शासकांनी या भागावर कित्येक वर्ष शासन केले. सांस्कृतिचे रक्षक अशी त्यांची ओळख होती. त्यांनी अनेक मंदिरे बांगलादेशमध्येही बांधली आहेत. त्यापैकी कांताजी मंदिर हे प्रसिद्ध आहे. कांताजी किंवा कांतानगर मंदिर हे दिनापूर शहराजवळ आहे. हे मंदिर १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात दिनाजपूरचे महाराज प्राणनाथ यांच्या पुढाकाराने बांधले गेले. हे मंदिर उत्कृष्ट स्थापत्य कलेसाठी ओळखले जाते. भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी यांना समर्पित असलेल्या या मंदिराचे १८९७ च्या भुकंपात मोठे नुकसान झाले. या कांताजी मंदिरापाठोपाठ नाव घेतले जाते ते ढाकेश्वरी मंदिराचे. बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका येथील हे मंदिर ढाका शहराची खरी ओळख आहे. (Bangladesh Hindu Temples)
सेन वंशाचा राजा बलाल याने १२ व्या शतकात हे भव्य मंदिर बांधले. १९९६ मध्ये या मंदिराला मंदिर म्हणून घोषीत करण्यात आले. ढाकेश्वरी देवी म्हणजेच दुर्गादेवीचा अवतार मानली जाते. या मंदिरात संपूर्ण बांगलादेशातील हिंदू समाज दुर्गापुजेसाठी एकत्र होतो. याच ढाकेश्वरी देवीच्या नावावरून ढाका हे नाव पडले आहे. भारताच्या फाळणीपूर्वी, ढाकेश्वरी देवी मंदिर हे संपूर्ण भारतातील शक्ती उपासक समुदायाचे श्रद्धास्थान होते. ढाकेश्वरी पीठाची गणना शक्तीपीठ म्हणून केली जाते. देवी सतीच्या मुकुटाचे रत्न या ठिकाणी पडल्याची कथा सांगितली जाते. भव्य असलेल्या ढाकेश्वरी मंदिराच्या संकुलात दोन मंदिरे आहे. यात पंचरत्न देवी दुर्गा मंदिरही आहे. याच परिसरात मोठा तलावही आहे. येथे राजांच्या काळात हत्तीही रहात असल्याची माहिती आहे. या ढाकेश्वरी मंदिरावरही हिंसक जमाव चालून गेला होता. मात्र येथील मुस्लिम तरुणांनी या मंदिराभोवती कडे करुन मंदिराचे रक्षण केल्याची माहिती आहे. (Bangladesh Hindu Temples)
==============
हे देखील वाचा : शेख हसीना बांगलादेशमध्ये असत्या, तर आज जिवंत नसत्या !
===============
बांगलादेशच्या सातखीरा जिल्ह्यात जेशोरेश्वरी काली मंदिर आहे. हे माता कालीचे मंदिर आहे. येथेही नवरात्रोत्सव मोठ्या उत्सहात साजरा होतो. मात्र आता हे मंदिरही पाडण्यात आल्याची माहिती आहे. या प्रसिद्ध मंदिरांसोबत बांगलादेशमधील शितळादेवीचे मंदिरही प्रसिद्ध आहेत. या मंदिरातही नवरात्रोत्सव उसाहात साजरा होतो. श्रावण महिन्यापासूनच येथे सजावट केली जाते. मात्र सध्या या मंदिराचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. बागेरहाट शिवमंदिर करणपूर, हे मंदिरही प्रसिद्ध आहे. भगवान शंकराच्या या मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त मोठा उत्सव असतो. मात्र सध्या येथेही चिंतेचे वातावरण आहे.
याशिवाय सुगंधा शक्तीपीठ, शिकारपूर, श्री मदन मोहन ठाकूर मंदिर, काळ भैरब मंदिर, ब्राह्मणबारिया, श्री मेहर कालीबारी मंदिर चितगाव जिल्हा, छत्तेश्वरी मंदिर, रामकृष्ण मिशन, इस्कॉन श्री राधा माधव मंदिर, कैबल्यधाम आश्रम, अनुकुलचंद्र सत्संग आश्रम, तुळशीधाम आश्रम, पंचानन धाम आश्रम, गोलपहाड मोहोषण काली मंदिर, चंद्रनाथ मंदिर, सीताकुंड, ताराचरण साधू आश्रम, धालघाट, पाटिया उपजिल्ह्यातील अनेक हिंदू मंदिरे आणि आश्रम आहेत. यापैकी अनेक आश्रमांची तोडफोड कऱण्यात आली आहे. तसेच हिंदू मंदिरांचेही नुकसान झाले आहे. बांगलादेशातील ५० जिल्ह्यातील हिंदूंवर अत्याचार झाल्याची माहिती आहे. या सर्वच ठिकाणी हिंदूंच्या मंदिरांना प्रथम लक्ष करण्यात आले आहे. (Bangladesh Temples)
सई बने