मुंबईची लोकल आज ही लाईफलाईन आहे. लोकलशिवाय मुंबईकरांचं पानही हलत नाही. लोकल प्रवास जितका स्वस्त आहे तितकाच चांगला. एवढ्याश पैशात तुम्हाला हव्या त्या ठिकाणी सोडणारी मुंबईत लोकलच. पण याच लोकलमध्ये प्रवास करण्यासाठी एकेकाळी बक्षीस जाहीर झालं होतं. तुम्ही म्हणाल काहीही फेका. आता बक्षीस सोडा साधं तिकिट नसेल तर टीसीला चांगलाच दंड द्यावा लागतो. मग ही बक्षीसाची भानगड आहे तरी काय जाणून घेऊयात. तर गोष्ट आहे मुंबईत रेल्वे सुरू होण्याची अगदी ब्रिटिश काळातली. (Mumbai Local)
१८५३ साली मुंबईच्या बोरीबंदर ते ठाणे दरम्यान पहिली लोकल धावली होती. यामुळे प्रवासाचा खुप सारा वेळ वाचणार होता. पण अनेक भारतीयांना याबद्दल नवल वाटत होतं. अशी काही यंत्र असू शकतात ज्यामुळे प्रवास एवढ्या कमी वेळात होऊ शकतो. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातले लोक रेल्वेने प्रवास करण्यासाठी घाबरत होते. तेव्हा ब्रिटिश सरकारने लोकलने प्रवास करण्यासाठी शक्कल लढवली. प्रवास करण्यासाठी प्रवाशांना चक्क बक्षीस जाहीर केलं होतं. प्रबोधन ठाकरे यांनी आपल्या जुन्या आठवणी या पुस्तकात हा किस्सा सांगितला आहे. जी. आय. पी. रेल्वेच्या काही जुन्या गंमती, या प्रकरणात प्रबोधन ठाकरे म्हणतात की, इंग्रजांनी विस्तव आणि पाण्याची सांगड घालून वाफेलाच गाडी ओढायला लावली. मुहुर्तावर निघालेली आगगाडी मुंबईहून ठाण्याला पोहोचली. पण या वाफेच्या भुताटकीत, गाडीत बसायचा लोकांना धीर होईना. (Mumbai Local)
====================
हे देखील वाचा : मुंबई रेल्वे स्थानकांच्या नावामागची कथा
===================
म्हणून दुसऱ्या दिवशी ठाणे ते मुंबई मोफत प्रवास अशी घोषणा करण्यात आली. आगगाडी म्हणजेच ट्रेनमध्ये बसणे धोकादायक नाही, हा प्रवास लवकर आणि सुखाचा आहे अशी समजूत रेल्वेचे अधिकारी काढत होते. पण भारतीय लोक ऐकण्याच्या मनःस्थिती नव्हतेच. लोकांनी अनेक अफवा पसरवल्या. ही ट्रेन म्हणजे वाफेचे इंजिन असेलली इंग्रजाची भुताटकी आहे. तेव्हा मुंबईत ब्रिटिशांनी अनेक इमारती आणि वास्तू बांधायला घेतल्या होत्या. इमारतीत जिवंत गाडायला माणसं या ट्रेनमधून नेली जातात अशी अफवाही लोकांनी पसरवली. काही सरकारी कर्मचारी, कारकून, आणि व्यापाऱ्यांचे अधिकारी मुंबईहून ठाण्याला ट्रेनने प्रवास करून आले आणि त्यांनी आपले अनुभव सांगितले. तरी या लोकांचे समाधान होईना. (Mumbai Local)
मग ब्रिटिशांनी शक्कल लढवली. ठाणे ते मुंबईसाठी मोफत प्रवास आणि एक रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. ठाण्यातले लोक बक्षीसासाठी जेव्हा प्रवासासाठी निघाचे तेव्हा त्यांचे नातेवाईक धाय मोकलून रडायचे. पण हेच लोक जेव्हा सुखरुप परत यायचे तेव्हा चौकशी करण्यासाठी त्यांच्याकडे लोकांची एकच गर्दी व्हायची. रेल्वे अधिकाऱ्यांची ही आयडिया कामाला आली. लोकांनी एक रुपयासाठी का होईना प्रवास करायला सुरूवात केली होती. नंतर अधिकाऱ्यांनी बक्षीसाची रक्कम एक रुपयांवरून आठ आण्यावर आणली. लोकांचा धीर चेपला. ठाण्याहून मुंबईला जाण्यासाठी बैलगाडीचा वापर व्हायचा. आणि या प्रवासासाठी पाच तास लागायचा. आता ट्रेनमुळे हा प्रवास तासावार आला होता. (Mumbai Local)