Home » आक्राळविक्राळ गोकाक धबधबा !

आक्राळविक्राळ गोकाक धबधबा !

by Team Gajawaja
0 comment
Gokak Falls
Share

भारतभर सर्वत्र पाऊसाचे धुमशान चालू आहे. पावसामुळे कुठे रस्ते तुंडुंब झाले आहेत, तर कुठे नदीला पूर आला आहे. कुठे गावात पाणी शिरले आहे, तर मुंबईसारख्या ठिकाणी पावसानं ट्रेनचा वेग मंदावला आहे. पावसानं अनेकांचे वेळापत्रक विस्कटले असले तरी निसर्ग प्रेमी मात्र या धुंवाधार पावसामुळे सुखावले आहेत. आणि याच पावसानं तयार झालेल्या धबधब्यांच्या सौंदर्याच्या प्रेमात पडले आहेत. असाच एक धबधबा बघायला सध्या निसर्गप्रेमींची मोठी गर्दी होत आहे. हा आहे बेळगाव जिल्ह्यातील गोकाकचा धबधबा. या धबधब्यानं मुसळधार पावसामुळे रौद्र रूप धारण केले आहे. घटप्रभा नदीवरील या धबधब्याचे रौद्र रूप सध्या पर्यटकांना मोहात पाडत आहे. (Gokak Falls)

बेळगावच्या या विलोभनीय धबधब्याला बघण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. हा धबधबा आणि त्याच्यापासून जवळच असणारा पूल, तसेच या भागातील शिवमंदिरांमध्ये या पर्यटकांची संख्या वाढली आहे. कर्नाटकमध्ये पाऊस मुसळधार पडत असला तरी, या धबधब्याचे सौंदर्य एवढे आहे की, ते पाहण्यासाठी भर पावसात निसर्गप्रेमी गर्दी करत आहेत.कर्नाटक राज्यातील बेळगावी जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील गोकाक हे गाव आहे. घटप्रभा आणि मार्कंडेय किंवा दोन्ही नद्यांचा संगम असलेले गोकाक हे बेळगावपासून ७० किमी अंतरावर आहे. याच गावाजवळील गोकाक धबधबा आता पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. अत्यंत निसर्गसंपन्न अशा जागी असलेल्या या धबधब्याचा सर्वच परिसर प्रेक्षणिय आहे. या भागात प्रसिद्ध अशी शिवमंदिरे आहे. अलिकडच्या वर्षात या सर्व भागात पर्यटनही मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

 

गोकाक धबधबा पावसाळ्यात रौद्र रुप धारण करतो. मात्र अन्य महिन्यातही हा धबधबा बघण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. त्यामुळे या भागात, पर्यटकांसाठी अनेक सुविधा करण्यात आल्या आहेत.बेळगावमधील हे गोकाक शहरही पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. या शहराला ऐतिहासिक वारसा आहे. या शहराची स्थापना १८५३ मध्ये झाली. ब्रिटीशांनी गोकाक धबधब्याच्या पाण्याचा उपयोग करत १८८७ मध्ये जलविद्युत प्रकल्प स्थापन केला. हा जलविद्युत प्रकल्प या राज्यातील सर्वात जुन्या विकास प्रकल्पांपैकी एक आहे. येथेच गोकाक स्पिनिंग मिलची स्थापना करण्यात आली. या शहराच्या अर्थव्यवस्थेत प्रमुख स्त्रोत म्हणून याकडे बघितले जाते. गोकाक धबधब्याएवढाच प्रसिद्ध आहे को रोपवे. धबधबा पहायला येणारे पर्यटक या रोपवेवरुन चालण्याचा आनंद घेतात. हा झुलता पूल एक अरुंद आहे. यातून फक्त ३०-३० लोकांना प्रवेश देण्यात येतो. हा पूल १४ मिटर वर लटकलेला आहे. येथून धबधब्याची छायाचित्रे काढली जातात. (Gokak Falls)

=================

हे देखील वाचा:  रहस्यमयी लखामंडल मंदिर !

==================

याच गोकाक धबधब्यापासून काही अंतरावर गोडचिन्माल्की धबधबाही आहे. या दोन्ही धबधब्यामुळे या भागात पर्यटकांची कायम गर्दी असते. या दोन धबधब्यांव्यतिरिक्त या भागात चालुक्य काळातील अनेक वास्तु आहेत. ६ व्या शतकातील वास्तुकलेची माहिती देणा-या या वास्तू बघण्यासाठी स्थापत्यशास्त्रातील अभ्यासकांची गर्दी असते. विशेष म्हणजे, घाटप्रभा नदीच्या काठावर असलेले महालिंगेश्वर मंदिर कायम भाविकांनी गजबजलेले असते. या मंदिरातील कोरीव काम हे बघण्यासारखे आहे. गोकाक धबधबा बघण्यासाठी आलेले पर्यटक आवर्जून या महालिंगेश्वर मंदिराला भेट देतात. सध्या चालू असलेल्या श्रावण महिन्यात या महालिंगेश्वराला अभिषेक घालण्यासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. गोकाक धबधब्यातील मार्कंडेय नदी आणि घटप्रभा नदिचे पाणी अभिषेकासाठी वापरले जाते. याशिवाय या भागात योगीकोल्ला मल्लिकार्जुन मंदिर, करियम्मा मंदिर, लक्ष्मी मंदिर, हनुमान मंदिरही प्रसिद्ध आहेत.

गोकाक धबधब्याचे खरे सौंदर्य बघायचे असेल तर जुलै ते सप्टेंबर महिन्यात एकदा या भागाला भेट देण्याचे आवाहन स्थानिक करतात. हा धबधबा बघण्यासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येत नाही. अलिकडे येथे वाढलेल्या पर्यटनामुळे अनेक सुविधाही करण्यात आल्या आहेत. धबधब्यापासून काही अंतरावर मार्कंडेय नदिच्या पात्रात नौकाविहार करण्याची सुविधाही करण्यात आली आहे. गोकाक धबधबा निर्माण झाला आहे, ती घटप्रभा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे. हिरण्यकेशी नदी आणि मार्कंडेय नदी या घटप्रभाच्या उपनद्या आहेत. तर मार्कंडेय किंवा मार्कंडा ही कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यातून वाहणारी नदी आहे. (Gokak Falls)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.