त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय/मुख्य प्रशासकीय केंद्र आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी अर्ध सिंहस्थ कुंभमेळा भरतो.
त्र्यंबकेश्वर कुंभमेळा अख्यायिका
अख्यायिका अशी…. देव व दानवांनी समुद्र मंथन केले. त्यावेळी त्यातून १४ रत्ने निघाली. त्यातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा ते मिळविण्यासाठी देव व दानवांमध्ये युध्द सुरू झाले. इंद्राचा मुलगा जयंत अमृत कलश घेऊन पळू लागला. दानवांनी त्यांचा पाठलाग केला. या झटापटीत अमृत कलश पृथ्वीवर चार ठिकाणी ठेवला गेला.
ज्या चार ठिकाणी अमृत कलश ठेवण्यात आला तीच ठिकाणे कुंभमेळयाची होत. या प्रसंगी अमृत कलशाचे फुटण्यापासून सूर्याने रक्षण केले. दैत्यांपासून गुरूने रक्षण केले. अमृत सुकू नये म्हणून चंद्राने काळजी घेतली. इंद्रपुत्र जयंताने स्वत:च अमृत पिऊ नये यासाठी पहारेदारी शनीने केली.
सूर्य, चंद्र व बृहस्पती अमृत कलशाच्या रक्षणाचे वेळेस ज्या ज्या राशीमध्ये होते ती ती वेळ पुन्हा आली की त्या त्या ठिकाणी कुंभमेळा भरत असतो. याविषयी स्कंदपुराण, ब्रम्हपुराण व पद्मपुराण यांमध्ये माहिती दिली आहे. हरिद्वार, अलाहाबाद, किंवा उज्जैन याठिकाणी फक्त कुंभमेळा म्हटले जाते. परंतु ज्यावेळेस कुंभमेळा त्र्यंबकेश्वर व नाशिक येथे भरतो त्यावेळेस गुरु, सूर्य व चंद्र ही तीनही ग्रह सिंह राशीत असतात म्हणून यास सिंहस्थ कुंभमेळा असे म्हणतात.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
नानासाहेब पेशवे यांनी इ.स. १७५५-१७८६ या कालावधीत हेमांडपंती स्थापत्यशैलीत श्री त्र्यंबकेश्वर मंदिर नव्याने बांधवले. भारत सरकारने या मंदिराला दिनांक ३० एप्रिल, इ.स. १९४१ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. मंदिराच्या बाजूस असलेल्या कुशावर्त तीर्थाचा जीर्णोद्धार होळकरांचे फडणीस असलेल्या पारनेरकरांनी केला.
भौगोलिक पार्श्वभूमी
त्र्यंबकेश्वर हे शहर भारत देशाच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात नाशिक पासून २८ कि. मी. अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. मुंबई पासून १६५ कि. मी. अंतरावर असून जाण्यासाठी कसारा घाटातून इगतपूरी मार्गे तसेच भिवंडी – [वाडा] मार्गे खोडाळ्यावरून जाता येते. हे शहर समुद्रसपाटीपासून ३००० फूट उंचीवर आहे.
मंदिराची रचना
त्र्यंबकेश्वर येथे असलेल मंदिर हे काळ्या शिळेपासून बनलेलं आहे. मंदिराची रचना अद्वितीय तसेच आकर्षक आहे, मंदिराच्या आतमध्ये एक गर्भगृह आहे आणि त्या गर्भगृहामध्ये शिवलिंग आहे. आपल्याला ते डोळ्यांच्या आकाराचे भासते आणि त्यामध्ये पाणी भरलेलं दिसते. आपण लक्षपूर्वक बघितले असता त्यामध्ये आपल्याला तीन छोटे छोटे लिंग दिसतात. त्या लिंगांना ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचा अवतार मानलं जातं.
कसे पोहोचणार
त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी आपण रेल्वे मार्ग, सडक मार्ग, आणि वायुमार्ग या तीनही मार्गांचा अवलंब करू शकता. आपण मुंबईवरून येत असणार तर आपल्याला नाशिक पर्यंत कोणत्याही एका मार्गाने यावे लागेल. नाशिकच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून नाशिक – त्र्यंबकेश्वर अशा एस. टी. महामंडळाच्या गाडया दर अर्ध्या तासाने चालू असतात.
शब्दांकन – शामल भंडारे.
=====
हे देखील वाचा: विश्वेश्वर – बारा ज्योतिर्लिंग
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.