भारत हा शेती प्रधान देश आहे. भारतात शेतीसह शेतीला जोड असे व्यवसायही केले जातात. त्यामध्ये पशूपालन हा मुख्य व्यवसाय आहे. यातून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते. गाय, बकरी, कोंबड्या, उंट, म्हैस, ससा, डुकरे फारकाय भारतात गाढव पालनाचाही व्यवसाय होतो. पण अशा एका शेतीबद्दल ऐकले आहे, का जिथे फक्त सापांची निर्मिती होते. जगात असा एक देश आहे, तेथील एका गावात कुठल्याही धान्याची शेती होत नाही, ना तिथे कुठल्या प्राण्यांचे पालन करुन त्यातून उत्पादन मिळवले जाते. तर या गावात फक्त विषारी सापांची शेती केली जाते. अर्थातच हा देश आपल्या शेजारी आहे, आणि तो म्हणजे चीन. (Snake Farming)
चीन या देशाबाबत अशा अनेक गुढ गोष्टी आहेत, ज्यांचा अद्यापही उलगडा झालेला नाही. तशीच एक गोष्ट म्हणजे, येथील एका प्रांतात होणारी सापांची शेती. चीनमधील जिसिकियाओ हे गाव जगभरात सापांच्या शेतीसाठी ओळखले जाते. हे साप विषारी आहेत. जेवढा जास्त विषारी साप तेवढे जास्त पैसे हे तेथील धोरण आहे. चीनमध्ये या सापाच्या प्रत्येक अवयवापासून औषधोपचार केला जातो. फारकाय चीनमध्ये सापाच्या मांसालाही प्रचंड मागणी आहे. त्यामुळेच काही वर्षापूर्वी अत्यंत साधेपणानं होत असलेली या जिसिकियाओ गावातील सापांची शेती आता आधुनिकपणे करण्यात येत आहे. त्यावरच या गावाची आर्थिक सुबत्ता वाढली आहे. (Snake Farming)
चीन मध्ये जिसिकियाओ नावाचे एक गाव आहे, तेथील नागरिक किंग कोब्रा, वायपर आणि रॅटल स्नेक यांसारख्या धोकादायक सापांची शेतीच करतात. एका अहवालानुसार या गावात दरवर्षी तीस लाखांहून अधिक साप जन्माला येतात. या सापांचा चीनमधील पारंपारिक औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्वचेच्या समस्या, कर्करोग यांसारख्या समस्यांमध्ये ही औषधे वापरली जातात. चीनमध्ये हजारो वर्षांपासून पारंपारिक वैद्यकीय पद्धती प्रचलित आहेत. त्यात सापांच्या विषाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. जिसिकियाओ गावातील साप ठराविक वर्षानंतर या औषधांच्या कंपन्या विकत घेतात त्यातील विष काढून घेतले जाते. मग हे साप हॉटेलचालकांना पुन्हा विकले जातात.
चीनमध्ये सापांपासून अनेक खाद्यपदार्थही तयार केले जातात, आणि त्याची मागणीही तेथे खूप आहे. चीनच्या या गावात सापांच्या अनेक नव्या सापांचा प्रजाती जन्माला आल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे. या सापांना लाकूड आणि काचेच्या छोट्या खोक्यात पाळले जाते. जिसिकियाओ गावात सुमारे १७० कुटुंबे आहेत. दरवर्षी ३० लाखांहून अधिक सापांचे उत्पादन येथून होते. येथील सापांच्या विषापासून हृदयरुग्णांना औषध तयार करुन दिले जाते. सापापासून तयार केलेल्या औषधावर अल्कोहोलचा प्रभाव पडत नाही आणि जो माणूस ते पितो तो नेहमी निरोगी राहतो, असे चीनमधील नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच कॅन्सर बरा करण्यासाठी सापाची कातडी वापरली जाते. चीनध्ये १९१८ मध्ये आलेल्या स्पॅनिश फ्लू च्या साथीवर सापाच्या तेलाने उपचार केले गेले होते. (Snake Farming)
जिसिकियाओ गावात पूर्वी पारंपारिक पद्धतीने या विषारी सापांना सांभाळले जायचे. मात्र आता त्यातही बदल करण्यात आला आहे. जिसिकियाओ गावातील प्रत्येक कटुंबात आता आधुनिक यंत्रणा आहे, ज्यात विषारी सापांची ही शेती होते. साप जेव्हा अंडी घालतात तेव्हा ती अंडी लाकूड आणि काचेच्या छोट्या पेटीत ठेवली जातात. त्यामुळे सांप त्याला खाऊ शकत नाहीत. अंड्यातील सापांची पिल्ले बाहेर आल्यावर त्यांना वेगळ्या जागी ठेवले जाते. त्यासाठी जिसिकियाओ गावात असे वेगवेगळे विभाग निर्माण करण्यात आले आहेत. त्यात कमी उंचीची झाडे लावण्यात आली आहेत. या झाडांवर शेकडो साप लटकत असतात. त्या सापांचे खाद्या म्हणून बेडूक, उंदीर आणि इतर कीटकही तेथे सोडले जातात. अशामुळे सांप अधिक लवकर मोठे होतात, असे मानण्यात येते. त्यामुळे त्यांची किंमतही चांगली मिळते.
============================
हे देखील वाचा : जपानमुळे व्हेल माशाच्या अस्तित्वावरच संकट
============================
यातून जिसिकियाओ गावात दरवर्षी करोडो रुपयांचा व्यवहास होतो. सापांचे विष, मांस आणि दात यांची उत्पादने शेजारच्या जपान, व्हिएतनाम, थायलंड, फिलीपिन्स इत्यादी देशांनाही पुरवली जातात, त्यातून या गावाला मोठे परकीय चलनही मिळवते. आता तर चीनमधील बहुतांश भागातून हॉटेल चालक आणि औषध निर्माते जिसिकियाओ गावात सांप खरेदीसाठी येतात. मागणी सातत्याने वाढत असल्याचे पाहून अधिकाधिक लोक सापांचा व्यवसाय करू लागले आहेत. या गावात नव्यानं १०० स्नेक फार्म उघडण्यात आले आहेत. यातील बहुतांश स्नेक फार्म हे विषारी सापांचे आहेत. (Snake Farming)
८० च्या दशकात या गावात साप पाळण्याचे काम सुरू झाले. त्या वेळी, गावाचे उत्पन्न वार्षिक सुमारे १ लाख युआन म्हणजेच १० लाख रुपये होते. सध्या या गावातील स्नेक फार्मची किंमत सुमारे ८ कोटी युआन म्हणजेच ८० कोटी पर्यंत गेली असून सापांची वाढती मागणी पाहता, हा व्यवसाय १०० दशलक्ष युनानपर्यंत पोहचणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
सई बने