जगाचे छप्पर म्हणून ओळखल्या जाणा-या तिबेटवर चिन कायम आपला मालकी हक्क सांगत आला आहे. यासाठी चिननं तिबेटच्या संस्कृतीवर आक्रमण चालू केले आहे. 1950 पासून या चीन आणि तिबेटमधील वादाला सुरुवात झाली. मात्र आता या वादाचे आणि चीनच्या दादागिरीचे परिणाम तिबेटच्या भाषा आणि संस्कृतीवर किती व्यापक झाले आहेत, हे उघड होत आहेत. चीननं आता तिबेटच्या स्थानिक भाषेवरही प्रतिबंध आणण्यास सुरुवात केली आहे. (Tibet Language)
तिबेटमधील सर्वच शाळांमध्ये तिबेटची भाषा नाही, तर चीनची भाषा मॅंडरीन शिकवण्यात येणार आहे. यासाठी चिनच्या अधिका-यांनी तिबेटमधील विखुरलेल्या शाळांचे उदाहरण दिले आहे. शाळा अनेक दुर्गम भागात असल्यामुळे समान अभ्यासक्रम ठेवणे गरजेचे आहे. यासाठी मॅंडरीनच योग्य भाषा असल्याचे स्पष्टीकरण चीनच्या शिक्षण विभागानं दिले आहे. आता आगामी वर्षापासून तिबेटच्या सर्वच शाळांमध्ये चीनची अधिकृत मॅंडरीन ही भाषा शिकवली जाणार आहे. त्यामुळे काही वर्षातच मुळ तिबेटच्या भाषेचे अस्तित्वच पुसले जाणार आहे. याला स्थानिक तिबेटी नागरिकांनी विरोध केला असला तरी, चिनच्या दादागिरीपुढे त्यांचा नाईलाज होत आहे.
तिबेटमध्ये चीनचा हस्तक्षेप हा नवीन विषय राहिलेला नाही. आता चीन भाषिक दहशतवाद तिबेटवर थोपवू पहात आहे. आपलीच मॅंडरीन भाषा तिबेटमध्ये शिकवावी यासाठी चीननं तिबेटचा सगळा अभ्यासक्रमच बदलला आहे. यामुळे भविष्यात तिबेटची मुळ ओळख पुसली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भाषेवर आधारीत असलेली तिबेटची संस्कृतीही धोक्यात आली आहे. चीनने येणा-या पुढील शालेय वर्षासाठी तिबेटमध्ये नवे शैक्षणिक धोरण चालू केले आहे. हे धोरण अगदी बालवाडीपासून पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी लागू असणार आहे. तसेच त्यामध्ये बोर्डिंग स्कूलही येणार आहेत. या नव्या शैक्षणिक धोरणातील मुख्य बाब अशी की, यात तिबेटऐवजी मँडरीन भाषाच शिकवण्यात येईल. विशेषतः तिबेटच्या प्री-स्कूलमध्ये तिबेटीऐवजी मँडरीन शिकवण्याची जबरदस्ती झाल्यामुळे पुढच्या दहा वर्षात तिबेटची मुळ भाषा बोलणारी पिढीच आता संपणार असल्याची चिंता व्यक्त होत आहे. (Tibet Language)
यासाठी चीनची योजना व्यापक आहे. तिबेटमधील चार वर्षांच्या मुलांपासून ही भाषिक जबरदस्ती असणार आहे. या सगळ्या धोरणावर टीका होणार हे गृहित धरुन चीननं आधीच आपले स्पष्टीकरण आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राच्या माध्यमातून दिले आहे. त्यानुसार तिबेटी मुलांना त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रगत भाषेची गरज आहे. यासाठी मॅंडरीनसारखी सर्वोत्तम भाषा मिळणार नाही. तिबेटी भाषा ही अत्यंत जुनी भाषा असल्याचे चीनचे म्हणणे आहे. तिबेटी भाषेमध्ये लिपीबरोबर चित्रलिपीचाही समावेश आहे. अशी भाषा ही जगातून नाहीशी झाली आहे. अशावेळी तिबेटी जनतेची ही मुळ भाषा त्यांच्या प्रगतीसाठी मारक आहे. तिबेटी तरुण हे हुशार आहेत. त्यांची हुशारी जगाला समजायची असेल तर भाषा हे प्रमुख माध्यम राहील, त्यासाठी मॅंडरीनच योग्य असल्याचे चीननं स्पष्ट केले आहे. असे असले तरी तिबेटमध्ये या चीनच्या नव्या आदेशावर टीका होत आहे. चीनने बोर्डिंग स्कूलसाठी एक अभ्यासक्रम तयार केला आहे. त्यामध्ये मॅंडरीन भाषेसोबत चीनच्या संस्कृतीचीही माहिती देण्यात आली आहे. मात्र त्यामध्ये तिबेटबाबत उल्लेखही नाही. त्यामुळे तिबेटींची सामाजिक क्षमता कमी होणार आहे. (Tibet Language)
=============
हे देखील वाचा : दाऊद माझा नातेवाईक…
=============
गेल्या काही वर्षापासून चिन सरकार तिबेटमधील शाळाही बंद करत असून तिबेटी मुलांना चीनमधील बोर्डींगमध्ये जबरदस्तीनं दाखल करुन घेत आहे. त्यासाठी चीननं विशेष बोर्डींग स्कूल चालू केल्या आहेत. सध्या 80 टक्की तिबेटी मुलं ही चिनमधील या बोर्डींगस्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. तिबेटमधील हवामान आणि तेथील भौगोलिक स्थिती पहाता अशा बोर्डींगस्कूल तिबेटमधील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उत्तम असल्याचे चीनचे म्हणणे आहे. मात्र या बोर्डींग स्कूलमध्ये तिबेटच्या संदर्भात काहीही शिक्षण दिले जात नाही. अशा शाळांमध्ये विद्यार्थी पाठवायला विरोध केला तरी त्यासाठी पालकांवर दबाव आणला जात आहे. या बोर्डींग स्कूलमध्ये अत्यंत कडक नियम आहेत. अनेकवेळा मुलांना वर्षभर त्यांच्या पालकांना भेटता येत नाही. त्यामळे येथील मुले ही मानसिक दबावाखाली आहेत. यासंदर्भात तिबेटमध्ये काम करणा-या सामाजिक संस्थांनी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदत मागितली आहे.
सई बने