लिओनार्डो द विंची या जगप्रसिद्ध चित्रकाराचे मोनालिसा हे चित्र सर्वाधिक प्रसिद्ध आणि महागडे आहे. ही मोनालिसा फ्रान्सच्या पॅरिसमधील लूवर म्युझियममध्ये अगदी कडेकोट बंदोबस्तात ठेवलेली आहे. हे चित्र जेवढे प्रसिद्ध आहे, तेवढेच त्याच्याभोवती एक गुढ पसरले आहे. मोनालिसाच्या चित्रातील तिच्या सौम्य हास्यबद्दल अनेक अर्थ लावण्यात आले आहेत. पॅरिसला भेट देणा-या प्रत्येक पर्यटकाला मोनालिसाच्या या चित्राला भेट देऊन तिच्या हास्याचे रहस्य सोडवण्याची इच्छा असते. मात्र या मोनालिसाला कडकोट बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. कारण या जगप्रसिद्ध चित्रावर एकदा अँसिड टाकण्यात आले, तर त्याची चोरीही झाली आहे. (MonaLisa)
गेल्या वर्षी एकानं या चित्रावर केक फेकून मारला. आता हेच मोनालिसाचे चित्र चर्चेत आले आहे, कारण काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या चित्रावर चक्क सूप फेकले आहे. अर्थात या चित्राला मजबूत काचेच्या आवरणात ठेवण्यात आले आहे, त्यामुळे त्याच्यावर काहीही परिणाम झालेला नाही. पण या चित्राला जपण्यात जेवढा पैसा सरकार खर्च करत आहे, त्यापेक्षा कमी पैसे फ्रान्समधील शेतक-यांना मिळतात असा आरोप लावण्यात आला आहे. गरज कसली आहे कलेची की, शेतक-यांना योग्य मोबदला मिळण्याची, असा सवाल करत या कार्यकर्त्यांनी मोनालिसाच्या (MonaLisa) चित्रावर सूप फेकले आणि पुन्हा मोनालिसाचे चित्र चर्चेत आले.
लिओनार्डो द विंचीने 16 व्या शतकात बनवले मोनालिसाचे (MonaLisa) चित्र जगातील अनमोल वारसामध्ये गणले जाते. या मोनालिसाच्या चित्रात अनेक गुढ संदेश असल्याची चर्चा आहे. मुळात मोनालिसा हे एका स्त्रीचे चित्र आहे की, ते पुरुषाचे इथपासून या चित्राबाबत चर्चा झाली आहे. तसेच मोनालिसाच्या हास्यातही अनेक गुढ असल्याचे सांगितले जाते. लिओनार्डो द विंची आपल्या प्रत्येक चित्रात एक गुढ संदेश देत असत. तसाच तो संदेश मोनालिसामध्येही असल्याचे म्हटले जाते.
त्यामुळेच की काय, मोनालिसाचे चित्र बघण्यासाठी पॅरिसच्या लूवर म्युझिअमला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. हे मोनालिसाचे चित्र जेवढे प्रसिद्ध आहे, तेवढेच ते वादात सापडले आहे. त्यामुळेच या चित्रासाठी लूवर म्युझियममध्ये स्वतंत्र दालन असून त्यावर बुलेटप्रूफ काचेच कव्हर घालण्यात आले आहे. अर्थात या मोनालिसासाठी कितीही कडक सुरक्षा असली तरी वेळोवेळी हेच चित्र आंदोलनकर्त्यांचे पहिले लक्ष ठरले आहे.
21 ऑगस्ट 1911 रोजी मोनालिसाचे (MonaLisa) हे चित्र चोरीला गेले होते. त्यावेळी संग्रहालयातील चित्रांवर काचेच्या फ्रेम्स आणि इतर कलाकृती लावण्यात येत होत्या. त्यामुळे चित्रे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेली जात होती. याच दरम्यान, मोनालिसाचे चित्र गायब झाले. चित्र गायब झाल्याचे सुरक्षा यंत्रणांच्या दोन दिवसानंतर लक्षात आले. त्यांना तोपर्यंत हा कामाचाच भाग वाटत होता. या चित्राची बरीच शोधाशोध करण्यात आली, पण चित्र मिळवण्यासाठी तब्बल दोन वर्षा जावी लागली.
विन्सेंझो नावाच्या व्यक्तीकडे हे चित्र मिळाले. चित्र चोरण्यासाठी विन्सेंझोला एक वर्ष आणि 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती, परंतु 7 महिन्यांनंतर त्याची सुटका करण्यात आली. मोनालिसाच्या या चोरीनंतर लूवर म्युझिअममध्ये एक स्वतंत्र कक्ष चालू करण्यात आला. विशेष सुरक्षा यंत्रणा उभारण्यात आली. पण वारंवार हे चित्र आंदोलनकर्त्यांनी आपला राग व्यक्त करण्यासाठीचे साधन मानले आहे. एका कलाकरानं या चित्रावर अँसिड टाकून इतर कलांनाही प्रोत्साहन द्या असा संदेश दिला. तर गेल्यावर्षी एका सामाजिक कार्यकर्त्यांने या चित्रावर केक फेकून फान्समधील अन्नधान्यच्या कमतरतेवर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता.
============
हे देखील वाचा : ‘या’ निर्मात्याचे बॉलिवूडमधील 29 सिनेमे झालेत फ्लॉप
============
गेल्या आठवड्यापासून फान्समध्ये शेतक-यांच्या प्रश्नावर आंदोलन चालू आहे. या आंदोलनातील काही कार्यकर्त्यांनी या मोनालिसाच्या चित्रावर थेट सूप टाकलं आहे. फ्रान्समध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अनेक आंदोलने झाली आहेत. तेथील शेतकरी त्यांच्या पिकांना वाढीव किंमती मिळवण्यासाठी आंदोलन करीत आहेत. या शेतक-यांच्या आंदोलना शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहे. याच आंदोलनातील काही कार्यकर्त्यांनी मोनालिसाच्या चित्रावर सूप टाकून सरकारच्या धोरणांचा निषेध केला. त्यांच्यामते मोनालिसासारखी चित्रे जपण्यासाठी करोडो रुपये खर्च होत आहेत. आणि दुसरीकडे शेतक-यांना त्यांच्या शेतमालाचा योग्य मोबदला मिळत नाही. कमी मोबदला मिळत असलेल्या शेतक-यांचे आयुष्य अतिशय कठिण झाले आहे. त्यांना पुरेसा आहारही मिळत नाही. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मोनालिसापेक्षा शेतकरी गरजेचे आहेत, त्यांची काळजी घ्या असा सल्लाही देण्यात आला आहे.
सई बने