देवीच्या 51 शक्तिपिठांपैकी एक शक्तिपिठ म्हणून विंध्यवासिनी मंदिराची (Vindhyavasini Mata) ख्याती आहे. उत्तरप्रदेशच्या मिर्झापूर येथील हे माता विंध्यवासिनी मंदिर सिद्धपीठ म्हणून ओळखले जाते. गंगा नदीच्या काठावर असलेली ही माता सृष्टीच्या आरंभापासून असल्याची माहिती भाविक देतात. विंध्याचल पर्वत रांगामधील मातेचे हे मंदिर अत्यंत जागृत आहे. एरवीही या विंध्याचल माता मंदिरात भक्तांची गर्दी असते. मात्र नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये मातेच्या दर्शनासाठी अक्षरशः भक्तांचा पूर येतो. त्यामुळेच नऊ दिवस अहोरात्र हे मंदिर चालू असते. (Vindhyavasini Mata)
मिर्झापूर येथील या माता विंध्यावासिनी मंदिराची किर्ती सर्वदूर आहे. या ठिकाणी साधना आणि उपासना केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. शिवाय तप आणि ध्यानधारणा केल्यावर सिद्धी प्राप्त होतात, असा भक्तांचा विश्वास आहे, म्हणूनच या मंदिराला सिद्धपीठ मानले जाते. चैत्र आणि शारदीय नवरात्रीच्या काळात मातेचे दर्शन घेणे पवित्र मानले जाते. त्यामुळेच लाखो भक्त दररोज माँ विंध्यवासिनीच्या दर्शनासाठी येत आहेत.
माता विंध्यावासिनीचा महिमा (Vindhyavasini Mata) अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये सांगितला आहे. दुर्गा सप्तशती आणि मार्कंडेय पुराणातही मातेच्या पराक्रमाचा उल्लेख आहे. माता विंध्यवासिनीने महिषासूर या राक्षसाचा वध करण्यासाठी अवतार घेतला होता. विंध्य पर्वतावर राहत असलेल्या मधु आणि कैतभ नावाच्या राक्षसांना विंध्यवासिनी मातेने मारले. त्यानंतरही माता विंध्यावासीनी विविध रुपात भक्तांच्या मदतीला गेल्याच्या आख्यायिका सांगण्यात येतात. मातेचा कायम वास या मंदिर परिसरात असतो, अशी भक्तांची श्रद्धा आहे. शारदीय आणि वासंतिक नवरात्रीमध्ये माता नऊ दिवस मंदिराच्या छतावरील ध्वजात विराजमान असते. मातेचा हा ध्वज सोन्याचा आहे.
माता विध्यावासिनीची यात्रा ही तीन स्वरुपात पूर्ण झाल्याचे मानण्यात येते. या मंदिर परिसरातच अन्य देवतांची मंदिरेही आहेत. या मंदिरांना भेट दिल्याशिवाय माता विंध्यावासिनीचा आशीर्वाद प्राप्त होत नाही, असे सांगितले जाते. माता विंध्यावासिनी मंदिराच्या 3 किलोमीटर परिसरात तीन मंदिरे आहेत. त्यामध्ये कालिखोह माता मंदिर (मां कालीचे मंदिर), अष्टभुजी देवी मंदिर यांचा समावेश आहे. या तिन्ही मंदिरात गेल्यावरच विंध्यवासिनी देवीची यात्रा पूर्ण होते, असे मानले जाते. (Vindhyavasini Mata)
माता विंध्यावासिनीची मुर्ती अत्यंत देखणी आहे. सोळा पाकळ्यांच्या अष्टकोनी कमळच्या मध्यभागी माता विंध्यावासिनी विराजमान आहे. या मातेची पुजा करायची असेल तर स्नान करुनच भक्तांना मंदिराच्या गाभा-यात जाता येते. देवीला बोललेला नवस पूर्ण झाल्यावर भक्त देवीला पिठाच्या पु-या अर्पण करतात. पहाटे चार पासून मंदिरामध्ये पूजा सुरु होतात. भक्तांची वाढती गर्दी पाहता रात्री बारापर्यंतही मंदिराचे दरवाजे उघडे असतात. नवरात्रीमध्ये मध्ये भक्तांची गर्दी कितीही असली तरी मातेला दिवसातून चारवेळा वेगवेगळा शृंगार करण्यात येतो.
विंध्यावासिनी देवीचा (Vindhyavasini Mata) महिमा धर्मराज युधिष्ठिर यांनीही गायला आहे. विंध्यचैवनाग-श्रेष्ठे तवस्थानंहि शाश्वतम्। म्हणजेच पर्वतांमध्ये सची देवी सरस्वती अष्टभुजाच्या रूपात विराजमान आहे. वनवासाच्या काळात या माता विंध्यावासिनी, माता काली आणि माता सरस्वती यांचे दर्शन घेण्यासाठी प्रभू रामही आल्याची माहिती आहे. याच ठिकाणी दोन्ही बंधूनी तपसाधना केली होती. माता सितेनं येथे तिनही मातांची आराधना करुन देवीला प्रसन्न केल्याची आख्यायिका सांगण्यात येते.
शक्तीपीठ विंध्याचल धाम येथे नवरात्रीच्या काळात मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या लाखाच्या घरात पोहचली आहे. देवी दर्शनाचा हा त्रिकोण पूर्ण केल्यावर भाविकांचे सर्व संकट दूर होऊन त्यांना सुख प्राप्त होते, अशी भक्तांची भावना आहे.
============
हे देखील वाचा : वाराणसीची माता अन्नपूर्णा
============
प्राचीन काळी या विंध्याचल पर्वताच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात हिंस्त्र प्राण्यांचा वावर होता. त्यामुळे या मंदिरात जाणा-या भक्तांची संख्या कमी होती. पण अलिकडच्या काळात या भागात अनेक धर्मशाळा उभारण्यात आल्या आहेत. येथे भाविक राहू शकतात. शिवाय विंध्याचल पर्वताच्या आधारानं अनेक डाकूही राहत असत. आता त्यांची दहशतही कमी झाल्यानं भाविक या मंदिरात मोठ्या संख्येने येत आहेत.
सई बने