-श्रीकांत ना. कुलकर्णी
दि. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. याच महिन्यात महाराष्ट्राच्या स्थापनेला ६१ वर्षे पूर्ण झाली. अर्थात यंदा कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्राचा वर्धापन दिन फार मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला नाही. वास्तविक कोणत्याही राज्याची निर्मिती हा त्या राज्यातील नागरिकांचा आनंदाचा क्षण असतो. मात्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती सहजासहजी होऊ शकली नाही. त्यासाठी राज्यातील जनतेला फार मोठा लढा द्यावा लागला. महाराष्ट्राच्या इतिहासात ‘संयुक्त महाराष्ट्राचा लढा’ (Samyukta Maharashtra Samiti) या लोकचळवळीला फार महत्व आहे. त्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्णच होऊ शकणार नाही. प्रामुख्याने काँग्रेसविरोधी नेत्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या चळवळीचे एक प्रमुख आधारस्तंभ होते आचार्य प्र. के. अत्रे… चळवळीचे मुख्य उद्दिष्ट पार पडेपर्यंत त्यांनी ही चळवळ जिवंत ठेवण्याचे फार मोठे कार्य केले. त्यामुळे या चळवळीतील अत्रे यांचे योगदान कोणीही नाकारू शकणार नाही.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटिशांनीच स्थापन केलेली काही राज्ये होती. त्यापैकीच एक मुंबई राज्य (बॉंबे स्टेट) होते. या मुंबई राज्यात आत्ताची दोन राज्ये होती एक महाराष्ट्र आणि दुसरा गुजरात. मात्र नंतर भाषावार प्रांतरचना करण्याचा निर्णय झाल्यानंतर गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन वेगळी राज्ये करण्याचे ठरले. मात्र त्याचवेळी मुंबई शहराचं निर्माण झालं. मुंबईत मराठी लोकांबरोबरच गुजराती आणि इतर भाषिक लोकांचे प्रमाण खूप होते. त्यामुळे मुंबई गुजरातला देण्याची मागणी जोर धरू लागली. शिवाय त्यावेळी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई होते. ते गुजरातचे असल्यामुळे साहजिकच मुंबईला गुजरातमध्ये सामील करून घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु झाले होते.
त्याला विरोध करण्यासाठी ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’ स्थापन करण्यात आली. या समितीने सुरुवातीलाच ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशी घोषणा करून आपल्या लढ्याचे रणशिंग फुंकले. आचार्य अत्रे (Pralhad Keshav Atre) यांचे ‘मराठा’ हे वृत्तपत्र तर संयुक्त महाराष्ट्र समितीचे मुखपत्रच बनले. खुद्द आचार्य अत्रे यांनी आपल्या जहाल लेखणीने हा प्रश्न आणखी ज्वलंत केला. दररोज, मोर्चे, निदर्शने, सभा यामुळे सारी मुंबई दणाणून जाऊ लागली. अशाच एका कामगार मोर्चाला आवर घालण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचा आदेश दिला आणि त्यावेळी झालेल्या गोळीबारात १०५ कामगार हुतात्मा झाले. त्यामुळे हे आंदोलन आणखीनच चिघळले.
शेवटी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने या आंदोलनापुढे नमते घेतले आणि स्वतंत्र मराठी भाषक राज्याची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र तरीही ‘मुंबईचा’ प्रश्न कायम होता. मधल्या काळात मुंबई केंद्रशासित ठेवण्याचेही प्रयत्न झाले. मात्र संयुक्त महाराष्ट समितीने तेही हाणून पाडले. शेवटी मुंबईचे महत्व कायम राहण्यासाठी सुरुवातीला “मुंबई (महाराष्ट्र)” असे नाव राज्याला देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यानच्या काळात मोरारजी देसाई यांना नेहरूंनी केंद्रात अर्थमंत्री केले होते. त्यांच्या जागी मुंबईचे मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची निवड झाली होती. त्यांनीही ‘मुंबई (महाराष्ट्र )’ या नावाला सुरुवातीला होकार दिला कारण एकदाचे मुंबईसह राज्य मिळाले ना मग ‘महाराष्ट्र’ नावाचा कशाला आग्रह धरायचा अशी त्यांची भूमिका होती.
परंतु आचार्य अत्रे यांनी या नावालाही तीव्र विरोध केला आणि त्यासाठी पुन्हा आंदोलन उभारण्याचा इशारा दिला. एवढेच नव्हे तर अत्रे यांनी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भेटून, या राज्याला ‘महाराष्ट्र’ हेच नाव कसे योग्य आहे हे सांगितले. त्यासाठी त्यांनी सुमारे सातशे वर्षांपूर्वी चक्रधरस्वामी यांच्या लीळाचरित्र या ग्रंथात ‘महाराष्ट्र’ या राज्याचा उल्लेख असल्याचे सोदाहरणासह पटवून दिले. त्यानंतर ‘महाराष्ट्र’ राज्याची स्थापना झाली आणि दि. १ मे १९६० रोजी यशवंतराव चव्हाण यांनी दिल्लीहून महाराष्ट्राचा मंगलकलश आणला. अर्थातच नंतर महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांचीच वर्णी लागली.
—–
हे नक्की वाचा: महाराष्ट्र दिनाचे महत्त्व!
—–
महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर मुंबईत गोळीबारात बळी पडून हुतात्मा झालेल्या १०५ कामगारांचे स्मारक उभारण्याचा निर्णय संयुक्त महाराष्ट समितीने घेतला. त्यासाठीही आचार्य अत्रे यांनी पुढाकार घेतला. त्यावेळचा त्यांचा एक किस्सा भारी आहे. हे हुतात्मा स्मारक उभारल्यानंतर त्याचे १ ऑगस्टला उद्घाटन करावयाचे निश्चित झाले. या उद्घाटन कार्यक्रमासाठी आचार्य अत्रे यांनी तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री (अत्रे त्यांना नेहमी ‘अनर्थ’ मंत्री म्हणत) मोरारजी देसाई यांनाही निमंत्रण देण्याचे ठरविले आणि आपली अनोखी कल्पना लढवून त्यांना दिल्लीत तारेने निमंत्रण पाठविले. इंग्रजी भाषेत पाठविलेल्या तारेत आचार्य अत्रे यांनी म्हटले होते …
“WE are erecting memorial of martyrs whom you had honour to kill as C.M. in samyukt Maharashtra movement on 1st August. Please send your curses.”
– ACHARYA ATRE
“संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात ज्यांना ठार मारण्याचा मान मुख्यमंत्री या नात्याने तुम्हाला लाभला होता, त्या हुतात्म्यांचे स्मारक आम्ही १ ऑगस्ट रोजी उभारीत आहोत. त्यासाठी कृपया आपले शिव्याशाप पाठवावेत.”
विशेष म्हणजे हे उपहासात्मक निमंत्रण अत्रे यांनी त्यांच्या ‘मराठा’ दैनिकात पहिल्या पानावर चौकटीत प्रसिद्ध केले. त्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा झाली. अर्थातच या निमंत्रणाला मोरारजी देसाई यांच्याकडून कसलेच उत्तर आले नाही हे सांगायला नकोच. मात्र त्यातून आचार्य अत्रे यांचा बेडर स्वभाव दिसून येतो. त्यांच्याच भाषेत सांगायचे झाल्यास “सामान्य जनतेच्या प्रश्नावर सत्तारूढ नेत्यांना त्यांची जागा दाखवून देणारा आचार्य अत्रे यांच्यासारखा संपादक गेल्या दहा हजार वर्षात झाला नाही”.
आचार्य अत्रे यांच्या ‘कऱ्हेचे पाणी’ या खंडात्मक आत्मचरित्रात हा सारा इतिहास आहे.
– श्रीकांत ना. कुलकर्णी
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
—–
हे देखील वाचा: जाणून घ्या बॉम्बे ते मुंबई हा प्रवास कसा झाला?…
—–