केनिया या पूर्व आफ्रिकेतील देशात सध्या मोठी समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या एका छोट्या पक्षांपासून निर्माण झाली आहे. आधीच अन्नधान्याची कमतरता असलेल्या केनियामध्ये आता अधिकच अन्यधान्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्याच्यासाठी कारण झाले आहे ते पक्षांचे…हे पक्षी म्हणजे क्विलिया नावाचे पक्षी (Quelea Birds). आकारानं अगदी छोटे असलेले हे पक्षी केनियामधील अन्नधान्याचा साठा संपवत आहेत. या पक्षांचे मुळ खाद्य असलेले गवत आणि त्यावरील किटक आता नष्ट झाल्यानं या क्विलिया पक्षांनी (Quelea Birds) त्यांचा मोर्चा शेताकडे वळवला. मोठ्याप्रमाणात त्यांनी शेती नष्ट केली. केनियाच्या सरकारनं जवळपास 60 लाख क्विलिया पक्षी मारण्याचे आदेश दिले आहेत. काही वर्षापूर्वी चीननं चिमण्यांना मारण्याचे आदेश दिले होते आणि तिथे मोठ्या प्रमाणात चिमण्या मारण्यात आल्या. आता त्यानंतर केनिया सरकारनं दिलेला हा क्विलिया पक्षी मारण्याचा आदेश चर्चेत आला आहे.
केनिया हा आफ्रिकन देश क्विलिया पक्ष्यांमुळे (Quelea Birds) हैराण झाला आहे. येथील शेतीमालावर या पक्षांनी डल्ला मारल्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे केनिया सरकारने 60 लाख पक्षी मारण्याचे आदेश दिले आहेत. आधीच सततच्या दुष्काळामुळे या देशांतील अन्यधान्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्यात या क्विलिया पक्षांचे खाद्य असलेल्या गवताचे आणि त्यावरील किटकांचे प्रमाणही कमी झाले. या गवतावरील छोट्या बिया हे क्विलिया पक्षी खातात. मात्र दुष्काळामुळे हे गवतही कमी होत आहे. परिणामी क्विलिया पक्षांनी आता आपली भूक भागवण्यासठी शेतावर हल्लाच केल्यासारखी परिस्थिती केनियाच्या काही भागात झाली आहे. त्यामुळेच आता केनिया सरकारनं या संकटावर मात करण्यासाठी चक्क 60 लाखांहून अधिक क्विलिया पक्षांना मारण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या काही वर्षापासून केनियामध्ये अन्नधान्याचा दुष्काळ आहे. त्यात कोरोनामुळे येथील परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. अन्नधान्यासाठी सामान्य जनतेची वणवण होत असतांना त्यावर या क्विलिया पक्षांनी (Quelea Birds) डल्ला मारल्यामुळे शेतकरी अधिक हैराण झाले आहेत. त्यांचे मोठे नुकसान होत आहे. सर्वच भागात या क्विलिया पक्षांची संख्या वाढल्यामुळे सरकारने सुमारे 6 दशलक्ष रेड-बिल क्विलिया पक्षी मारण्यास सुरुवात केली आहे. हे पक्षी म्हणजे जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेली पक्षी प्रजाती आहे. त्यांना ‘पंख असलेले ग्रासॉपर्स’ असेही म्हणतात. हे पक्षी गहू, बार्ली, तांदूळ, सूर्यफूल आणि मका ही पिके खातात.
आफ्रिकन खंडाचा पूर्व भाग, ज्यामध्ये सोमालिया, इथिओपिया, इरिट्रिया, जिबूती, सुदान, केनिया आणि दक्षिण सुदान यांचा समावेश आहे, या सर्वच देशात दुष्काळाचे प्रमाण जास्त आहे. अनेक वर्षाच्या दुष्काळामुळे या देशांतील गवताचेही प्रमाण कमी झाले आहे. या गवतावर ज्या बिया असतात त्या बिया क्विलिया पक्ष्यांचे खाद्य आहे. मात्र या सर्वच देशात दुष्काळामुळे गवतही उगेनासे झाल्यानं क्विलिया पक्षांचीही उपासमार सुरु झाली. पण या पक्षांनी शेतीवरील पिकावर हल्ला सुरु केल्यानं शेतक-यांची मोठी अडचण झाली आहे. या पक्षांना शेतापासून दूर करण्यापेक्षा त्यांना मारुन त्यांची संख्या नियंत्रीत करण्यावर भर दिला आहे. कारण आत्तापर्यंत या क्विलिया पक्ष्यांनी केनियातील सुमारे 300 एकर भातशेती नष्ट केली आहे. 20 लाख क्विलिया पक्ष्यांचा (Quelea Birds) कळप एका दिवसात 50 टन धान्य खाऊ शकतो. पश्चिम केनियातील शेतकऱ्यांचे सुमारे 60 टन धान्य पक्ष्यांमुळे वाया गेले आहे. या पक्षांची संख्याही झपाट्यानं वाढत असल्यानं शेतीवरील त्यांचे संकट अधिक गडद होत आहे. परिणामी केनिया सरकारनं या क्विलिया पक्षांनाच मारण्याचा आदेश दिला आहे.
==========
हे देखील वाचा : भारतातील ‘या’ मंदिरांमध्ये गैर हिंदूना परवानगी नाही
==========
क्विलिया हा पक्षी (Quelea Birds) त्याच्या रंगीबेरंगी पिसारा आणि चमकदार लाल बिलासाठी प्रसिद्ध आहे. याला विणकर पक्षी असेही म्हणतात. हा पक्षी मोठ्या कळपांमध्ये प्रवास करतो. हा पक्षी मूळ आफ्रिकेतील उप-सहारा प्रदेशातील आहेत. हे पक्षी दररोज त्यांच्या शरीराच्या अर्ध्या वजनापर्यंत गवत आणि बिया खातात. त्यांना “आफ्रिकेचे पंख असलेले टोळ” म्हणूनही ओळखले जाते कारण ते पिकांसाठी खूप विनाशकारी ठरत आहेत. 2021 मध्ये, या पक्ष्यांनी युगांडातील शेकडो एकर भातशेती नष्ट केली. एका शेतकऱ्याने सांगितले की, पक्ष्यांच्या आगमनानंतर केवळ तीन आठवड्यांनंतर त्यांचे पीक नष्ट झाले. क्विलिया हे पक्षी गहू, तांदूळ आणि मक्यासह गवत, बियाणे आणि धान्य पिके खातात. आफ्रिकेतील अनेक लोक हे क्विलिया पक्षी खातात. अफ्रिकन बाजारपेठेत पकडेले क्विलिया पक्षी आढळतात. आता सरकारनंच त्यांना खुलेआम पकडण्याची परवानगी दिल्यामुळे ही संख्या वाढणार आहे.
सई बने