फरीदकोटातील शाही परिवाराच्या ३० वर्ष जुन्या संपत्तीचा वाद आता मिटला आहे. नुकत्याच सुनावण्यात आलेल्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार २० हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचा वाद आता संपवण्यात आला आहे. फरीदकोटातील महाराजांच्या संपत्तीसाठी त्यांच्या मुलींनी ३ दशक कायद्याची लढाई लढली. दोन्ही बहिणींना त्यांच्या बाजूने निकाल लागल्यानंतर आता संपत्तीत हिस्सा मिळणार आहे. संपत्ती अशा कारणास्तव फार महत्वाची आहे कारण राजमहल आणि किल्ल्यापासून ते हीरे-जवाहरात पर्यंत आहे. या लढाईला सन्मानाची लढाई असे म्हटले जात आहे.(Faridkot Royal Property)
कसा सुरु झाला होता वाद?
१९१९ मध्ये जेव्हा वडिलांचा मृत्यू झाला त्यानंतर हरिंदर सिंह बरार यांना राज्याचा महाराजा बनवले होते. त्यावेळी त्यांचे वय ३ वर्ष होते. हरिंदर सिंह राज्याचे अखेरचे महाराजा होते. त्यांची पत्नी होती नरिंदर कौर, ज्यांच्या तीन मुली आणि एक मुलगा होता- अमृत कौर, दीपिंदर कौर, महीपिंदर कौर आणि मुलगा टिक्का हरमोहिंदर सिंह. १९८१ मध्ये मुलगा हरमोहिंदर सिंह यांचा एका रस्ते अपघातात मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर महाराजा तणावाखाली गेले आणि मृत्यूपत्र तयार केले. याची घोषणा त्यांचे निकटवर्तीय लाल सिंह यांनी केली.
मृत्यूपत्रानुसार त्यांच्या संपत्तीची देखभालाची जबाबदारी महारावल खेवाजी ट्रस्ट यांना दिली गेली. येथूनच वाद सुरु झाला. सांगितले जाते की, ही ट्रस्ट ऑक्टोंबर १९८२ मध्ये स्थापन करण्यात आली. मृत्यूपत्र आणि ट्रस्टची माहिती ही महाराजांच्या पत्नीला किंवा आईला सुद्धा नव्हती. १९८९ मध्ये महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर मृत्यूपत्र समोर आली. त्यामध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आले होते की, त्यांची लहान मुलगी अमृत कौर हिला बेदखल केले आहे. कारण तिने आपल्या मर्जीने लग्न केले आहे. तर मुलगी दीपिंदर कौरला ट्रस्टचे चेअरपर्सन आणि महीपिंदर कौरला ट्रस्टचे वाइस चेअरपर्सनचा दर्जा दिला गेला होता. २००१ मध्ये मुलगी महीपिंदर कौर हिचा मृत्यू झाला.
लहान मुलगी अमृत कौर हिने आपला हक्क मागून घेण्यासाठी नोव्हेंबर १९९२ मध्ये स्थानिक कोर्टात एक याचिका दाखल केली. तिचे असे म्हणणे होते की, संयुक्त परिवाराचा हिस्सा असल्याने तिला सुद्धा संपत्तीमधील हिस्सा मिळावा.तर संपूर्ण उत्तरदायित्व हे महारावल खेवाजी ट्रस्टला दिले गेले आहे. २०१३ मध्ये कोर्टाचा निर्णय आला आणि अमृत कौर आणि दीपिंदर कौर यांच्या पक्षात निर्णय सुनावण्यात आला.त्यानंतर हे प्रकरण हायकोर्टात गेले आणि नंतर सुप्रीम कोर्ट. आता २०२२ मध्ये सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय जाहीर केला.
महाराजा यांचा भाऊ मंजीत इंदर यांचे असे म्हणणे आहे की, मुलीने जी लढाई लढली आहे ती पैशासाठी नव्हे तर गर्व आणि सन्मानासाठी आहे.(Faridkot Royal Property)
हे देखील वाचा- अबब! नदीकाठावर हजारो शिवलिंग! काय आहे यामागचं रहस्य?
कुठे किती आहे संपत्ती?
स्वातंत्र्य लढ्यानंतर महाराजांना २० हजार कोटी रुपयांची संपत्ती दिली गेली होती.यामध्ये पंजाब, दिल्ली, हरियाणा,चंदीगड आणि हिमाचल प्रदेशातील महल आणि जमीनींचा समावेश आहे.
-फरीदकोट महल हा १४ एकर जमिनीवर विस्तारलेला हा राजमहल १९९५ मध्ये बनवण्यात आला होता. याच्या एका भागात १५० बेड्स असणारे चॅरिटेबल रुग्णालय चालवले जाते.
-किल्ला मुबारक हा १० एकर जमिनीवर पसरला आहे. हा किल्ला राजा हमीर सिंह यांनी उभारला होता. तो १७७५ मध्ये बनवण्यात आला. आता त्याची स्थिती अत्यंत वाईट आहे.
-फरीदकोट हाउस, नवी दिल्लीतील कॉपरनिकस मार्गावर आहे. केंद्र सरकारने तो भाड्याने घेतला आहे. सरकार त्यासाठी प्रत्येक महिन्याला १७ लाख रुपयांचे भाडे सुद्धा देते. १० वर्षांपूर्वी या संपत्तीची किंमत १२०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
-या व्यतिरिक्त चंदीगड मधील मणीमाजरा किल्ला आणि शिमला मधील फरीदकोट हाऊस यांचा सुद्धा समावेश आहे.