Home » ७५ वर्षांत ‘आत्मनिर्भर’ झालेला भारत

७५ वर्षांत ‘आत्मनिर्भर’ झालेला भारत

by Team Gajawaja
0 comment
75th Independence Day
Share

यावर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. ज्या स्वातंत्र्यासाठी कित्येकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, कित्येकांनी आपलं घरदार वाऱ्यावर सोडून अनंत यातना सोसल्या, त्या स्वातंत्र्याची ७५ वर्ष आपण पूर्ण करत आहोत. पारतंत्र्याचा काळ अनुभवलेली मोजकीच मंडळी सध्या जिवंत असतील. बाकी बहुतांश जनता स्वतंत्र भारतात जन्माला आली आहे. म्हणूनच की काय अनेकांना स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामधली पुसटशी रेषही दिसेनाशी झाली आहे. असो. (75th Independence Day)

भारत या शब्दाचा अर्थ शोधायचा तर, ‘भा’ म्हणजे तेज व ‘रत’ म्हणजे रममाण झालेला. थोडक्यात तेजात रममाण झालेला देश म्हणजे भारत. या देशाने स्वातंत्र्यपूर्व काळात कित्येक वीर आणि विरांगनांचे पराक्रम याची देही याची डोळा अनुभवले आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी झटलेल्या प्रत्येकाच्या त्यागाचा मूक साक्षीदार असणाऱ्या या देशाचं रूप आता पालटलं आहे. एकेकाळी पारतंत्र्याच्या बेडीत अडकलेला हा देश आता महासत्ता बनण्याच्या दिशेने आगेकूच करत आहे. 

गेल्या ७५ वर्षांत या देशाने अनेक कटू -गोड घटना अनुभवल्या. १९४७ साली देश स्वतंत्र झाल्यानंतर १९५१ मध्ये देशाने स्वतःची स्वतंत्र घटना तयार केली. लोकशाहीचा स्वीकार केला. काही कायदे बदलले, तर काही नवीन तयार झाले. आता सगळं आलबेल होईल असं वाटत असतानाच १९६२ साली ‘हिंदी चीनी भाई भाई’ असं म्हणणाऱ्या चीनने केसाने गळा कापत भारतावर आक्रमण केलं. देश तेव्हा नुकताच पारतंत्र्याच्या बेडीतुन स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेत होता. पण पुन्हा नरसंहार, आक्रोश, वेदना उघड्या डोळ्यांनी बघताना त्याच्या मनाला प्रचंड यातना झाल्या. (75th Independence Day)

यानंतर परिस्थिती सामान्य होतेय असं वाटत असताना १९६५ साली पुन्हा युद्धाच्या कटू प्रसंगाला सामोरं जावं लागलं. यावेळी हल्ला केला होता भारतापासून वेगळ्या झालेल्या एका तुकड्याने..नापाक पाकिस्तानने. त्यावेळी लाल बहाद्दूर शास्त्री भारताचे पंतप्रधान होते. त्यांचा धोरणी स्वभाव, इच्छाशक्ती आणि ‘जय जवान, जय किसान’ या नाऱ्याने कमाल केली. आणि पाकिस्तानला पराभूत व्हावं लागलं. भारत देश सुखावला. पुढे याच विजयाची १९७१ साली पुनरावृत्ती झाली आणि देशाचा आत्मविश्वास वाढला. 

तीन मोठी युद्ध, देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्रीजींचा ताश्कंद येथे झालेला संशयास्पद मृत्यू, पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच बॉडीगार्डने केलेली हत्या, त्यानंतर पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या, बॉम्बस्फोट, दहशवादी हल्ले, आणीबाणी, शेअर बाजारासह विविध घोटाळे, कारगिल, उरी, नैसर्गिक आपत्ती यासारखी अनेक संकटं या देशाने झेलली. पण यामुळे हतबल न होता देश नेहमीच प्रगतीच्या मार्गावर पुढे जात राहिला. भारताची स्वतंत्र अर्थव्यवस्था तयार झाली. ही अर्थव्यवस्था नियोजन तत्वावर आधारित होती. नियोजन आयोगाने पंचवार्षिक योजनेची पद्धती विकसीत केली. १९६९ साली भारत सरकारच्या आधिपत्याखाली भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO – Indian Space Research Organisation)  स्थापन करून भारताने विज्ञानाच्या क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकलं. 

Isro

या काळात समाजकारण, अर्थकारण, राजकारण बदलत गेलं. त्यामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या. पण याच काळात देशाच्या विकासासाठी अनेक योजनाही राबवण्यात आल्या. शेती, लघुउद्योग, साक्षरता, स्त्री भ्रूण हत्याबंदी, गर्भलिंग चाचणी बंदी, लसीकरण इ योजनांसह मुली, महिला आणि समाजातील दुर्लक्षित व आर्थिकदृष्ट्या मागास गटासाठी कित्येक योजना राबवण्यात आला. तसंच आरोग्य, शैक्षणिक क्षेत्र, रस्तेबांधणी, रेल्वे, जल आणि विमान वाहतूक, वीज व पाणी पुरवठा यासारख्या कित्येक मूलभूत सोइ-सुविधांचाही विकास झाला. शिक्षण, क्रीडा, आरोग्य, तंत्रज्ञान, विज्ञान, मनोरंजन, इ क्षेत्रं विकसित होऊ लागली. 

=====

हे देखील वाचा – ‘मिसाइल मॅन’ला अनोखा सलाम, डॉ. कलाम यांच्या जीवनावर संस्कृत भाषेत महाकाव्य

=====

एकीकडे भारत विविध संकटाशी लढत होता, पण त्याचवेळी या देशामध्ये शास्त्रज्ञ, किडापटू, साहित्यिक, अर्थतज्ज्ञ, कलावंत आणि व्यावसायिकही तयार होते; या साऱ्यांनी मिळून जगाला या देशाची दखल घ्यायला भाग पाडलं. होमी भाभा, सी व्ही रामन, रामानुज, विक्रम साराभाई, बी विजयलक्ष्मी, सी एन रामचंद्रन, विश्वेश्वरय्या, कल्पना चावला, राधाकृष्णन, अशा कितीतरी शास्त्रज्ञांनी आपल्या कर्तृत्वानं देशाचं नाव जगामध्ये ‘रोशन’ केलं. अटलबिहारी वाजपेयींचं सरकार असताना ‘पोखरण’ येथे केलेली अणुचाचणी पाहून अख्ख जग थक्क झालं. याच काळात झालेल्या कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा धूळ चारली. (75th Independence Day)

क्रीडाक्षेत्रामध्येही देशाने चमकदार कामगिरी केली आहे. स्वातंत्र्यानंतर अवघ्या काही महिन्यांत १९४८ सालच्या समर ऑलिंपिकमध्ये भारतीय हॉकी टीमने देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. १९५१ साली दिल्लीमध्ये पहिल्या आशियाई खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यानंतरही विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं भारतात आयोजन करण्यात आलं. यानंतर १९७५ साली क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदावरही आपलं नाव कोरलं.  पुढे १९८३ आणि २०११ सालचा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून देशाचे नाव जागतिक स्तरावर उंचावले. क्रिकेट मध्ये भारताने लक्षणीय कामगिरी केली असून टॉपच्या टीम्समध्ये ‘टीम इंडिया’चं नाव आवर्जून घेतलं जातं. 

indian cricket team

वैयक्तिक कामगिरीबद्दल बोलायचं तर, प्रकाश पदुकोण, खाशाबा जाधव, विश्वनाथ आनंद, सानिया मिर्झा, लिएंडर पेस, महेश भूपती, साइना नेहवाल, विजेंद्र सिंग, अभिनव बिंद्रा, पी व्ही सिंधू, मेरी कोम, इ कितीतरी नावे घेता येतील ज्यांनी विविध क्रीडास्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलं आहे. (75th Independence Day)

२०१४ देशात साली सत्तांतरण झालं. मोदी सरकारच्या काळात देशाची प्रगती अधिक वेगाने सुरु झाली. याच काळात भारताने महासत्ता होण्याची स्वप्न बघितलं. कलाम साहबांनी ते देशाला दाखवलं. आज प्रत्येक क्षेत्रात भारताने आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तर लक्षणीय प्रगती केली आहे. गुगल, मायक्रोसॉफ्ट या सारख्या जगातील अनेक ‘टॉप’ कंपन्यांचे सीईओ भारतीय आहेत. फोर्ब्जच्या श्रीमंतांच्या यादीत ‘टॉप १०’ मध्ये भारतीय व्यावसायिकांची नावं आहेत. आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली आहे. कोरोनाच्या संकटातही लस बनवून भारताने जगाला ‘आत्मनिर्भर’ असल्याचं दाखवून दिलं आहे.आता हा देश स्वातंत्र्याच्या आकाशात उंच भरारी घेत आहे. हा यशाचा आलेख असाच उंचावत राहिला, तर कलाम साहेबांचं महासत्तेचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल. 

– मानसी जोशी 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.