Home » ओडिशाचे मोदी म्हणून ओळखले जाणारे प्रताप चंद्र सारंगी आहेत तरी कोण?

ओडिशाचे मोदी म्हणून ओळखले जाणारे प्रताप चंद्र सारंगी आहेत तरी कोण?

by Team Gajawaja
0 comment
Pratap Chandra Sarangi
Share

राजकारण हे असं क्षेत्र आहे ज्या क्षेत्रात जाण्यासाठी कित्येक तरुण धडपडत असतात, मात्र मोजकेच यशस्वी होतात. अनेकांना वाटतं राजकारणात असणाऱ्या व्यक्तीकडे भरपूर ‘माया’ गोळा होते. मात्र काही राजकारणी ही गोष्ट खोटी असल्याचं सिद्ध करतात. असंच एक नाव म्हणजे प्रताप चंद्र सारंगी (Pratap Chandra Sarangi). 

साधी राहणी आणि उच्च विचारसणीचे अनोखे उदाहरण म्हणजे भारताचे माजी केंद्रीय मंत्री प्रताप चंद्र सारंगी (Pratap Chandra Sarangi). सारंगी राजकारण आणि समाजकारण दोन्हीमध्ये सक्रिय असतात. तसेच त्यांच्याबद्दलची अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना ‘ओडिशाचे मोदी’ म्हणून ओळखले जाते. इतकंच नाही तर, ते स्वतःला अभिमानाने ‘मोदींचा सैनिक’ म्हणवतात. 

पांढरा स्वच्छ कुर्ता आणि पायजमा असा साधा पोशाख परिधान करणारे प्रताप सारंगी २०१९ साली ओडिशा राज्यातील बालासोरमधून भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आले आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी पैसे नाही, तर समाजासाठी काम करणं गरजेचं असतं, असं ठाम मत असणाऱ्या प्रताप सारंगी यांनी निवडणुकीच्या वेळी चक्क रिक्षेमधून प्रचार केला होता. सारंगी यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे फक्त एकच वाहन आहे, ते म्हणजे सायकल!

प्रताप चंद्र सारंगी (Pratap Chandra Sarangi) प्रवासासाठी चार चाकी किंवा दुचाकी गाडी नाही तर, सायकलच वापरतात. अनेकदा तर ते पायीच चालून मैलोनमैल प्रवास करतात. म्हणूनच बालासोरमधील जनतेने ओडिशाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नीरंजन पटनाईक यांचे सुपुत्र नवज्योती पटनाईक आणि बीजेडीचे धनाढ्य उमेदवार उद्योगपती रवींद्रकुमार जेना या दोघांनाही पराभूत करून प्रताप सारंगी यांना आपला प्रतिनिधी म्हणून निवडून दिले. 

प्रताप चंद्र सारंगी (Pratap Chandra Sarangi)  यांचा जन्म ४ जानेवारी १९५५ रोजी बालासोर गावातील सारंगी या ब्राह्मण कुटुंबात झाला. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपले ग्रॅज्युएशनपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती. तरुण वयात ते रामकृष्ण मठाच्या कार्याने प्रभावित झाले होते. त्यामुळे मठाचा साधक व्हायची इच्छा मनात धरून त्यांनी पश्चिम बंगालच्या हावडा मधील बेलूर या गावी मठाच्या मुख्यालयाला अनेकदा भेटी दिल्या होत्या. आहे. 

बेलूरच्या मठामधील साधकांनी मात्र सारंगी यांच्यावर विधवा आईची जबाबदारी असल्यामुळे त्यांना साधक करून घ्यायला नकार दिला आणि त्यांची समजूत काढून त्यांना घरी पाठवले. घरी परत आल्यावर त्यांनी जनसेवेसाठी स्वतःला झोकून दिले. 

====

हे देखील वाचा: केरळमधील लुंगीवाला मोदी ‘पिनाराई विजयन (Pinarayi Vijayan)’ यांची थक्क करणारी कहाणी

====

समाजकार्य करताना सारंगी यांनी बालासोर आणि मयूरभंज जिल्ह्यातील आदिवासी गावांमध्ये विविध योजना राबवल्या. गरीबांसाठी शाळा उघडल्या. अनेक एकल विद्यालये सुरू केली. यामध्ये गावागावातील शिकलेली तरुण मंडळी शिक्षक काम करू लागली. या शिक्षकांचे पगार ग्रामस्थांकडून वर्गणी काढून दिले जात असत.

समाजकार्य करत असतानाच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले. त्यांची कार्यपद्धती आवडल्याने त्यांनी संघांचे स्वयंसेवक व्हायचे ठरवले. त्यानंतर काही वर्ष त्यांनी जिल्हास्तरीय स्वयंसेवक म्हणून काम केले. आरएसएस सोबतच त्यांनी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेसाठीही काम केले आहे.

केंद्रीय मंत्री असूनही सारंगी बंगल्यामध्ये नाही तर, गवताने शाकारलेल्या बांबूच्या घरात राहतात. एक साधं घर जिथे कोणतंही उंची फर्निचर नाही. तरीही सारंगी यांच्या घरात समर्थक आणि कार्यकर्त्यांची नेहमीच वर्दळ असते. 

====

हे देखील वाचा: जेव्हा ३ पेग डाऊन कपिल शर्मा थेट नरेंद्र मोदींशी बोलायला गेला…

====

समाजहिताचा विचार करणाऱ्या सारंगी याना संपत्ती कमावण्याची महत्वाकांक्षा नाही की, आपल्या पदाचा गर्व नाही. त्यांची एकूण मालमत्ता आहे रु. १३.५ लाखाच्या आसपास. गंमत म्हणजे ही त्यांची वैयक्तिक मालमत्ता नाही, तर यामध्ये त्याच्या आईच्या दागिन्यांचाही समावेश आहे.  ही मालमत्ता तर सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाकडे असणाऱ्या संपत्तीपेक्षाही कमी आहे. 

आज राजकारणात अगदी नगरपालिकेत सक्रिय असणाऱ्या राजकारण्यांच्या नावावर करोडो रुपयांची मालमत्ता असते तिथे सारंगी यांच्या नावे असणारी मालमत्ता अगदीच अत्यल्प आहे. परंतु, प्रताप चंद्र सारंगी (Pratap Chandra Sarangi) यांना राजकारण करण्यात किंवा पैसा कमावण्यात रस नाही तर त्यांना समाजसेवा करायची आहे. राजकारणात पदोपदी भ्रष्ट्राचाराच्या बातम्या कानावर येत असताना प्रताप चंद्र सारंगी सारखे नेते  सर्वसामान्यांच्या मनातला विश्वास कायम राखतात. 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.