‘दिल चाहता है’ असो किंवा नुकताच आलेला ‘मडगाव एक्सप्रेस’… गोव्याची टूर सगळ्यांसाठीच खास असते. चलो गोवा चलते है…असा मेसेज ग्रुपमध्ये पडतो, पण plan काही बनतच नाही. अशा टाईपचे कितीतरी मिम्स पण आपल्याला पहायला मिळतात. तसं गोवा तीन गोष्टींसाठी प्रसिद्ध, एक दारू तीसुद्धा स्वस्त… दुसरं म्हणजे इथले बीच… आणि तिसरं म्हणजे इथल्या पार्ट्या… बस्स संपला गोवा ! आपल्या गोव्याची ओळख अजूनही या तीन गोष्टींपुरती सीमित आहे. पण जर मी म्हटलं की गोव्यात प्राचीन मंदिरं आहेत, लेण्या आहेत, किल्ले आहेत, धबधबे आहेत… तर तुमचा विश्वास बसेल का ? निश्चितच नाही बसणार कारण गोव्याबद्दल आपण हे सगळं कधी ऐकलच नाही. आज आम्ही तुम्हाला एका वेगळ्या गोवाची सफर घडवणार आहोत. (Goa)
गोव्याची प्राचीन नावं गोमंतक, गोपकपट्टण, गोवाबुरी अशी अनेक आहेत. तसं गोव्याचं कनेक्शन अनेकदा पोर्तुगीजांशी लावलं जातं, पण त्यांच्याही पूर्वी गोव्याचा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथामध्येही आला आहे. गोव्यावर मौर्य, सातवाहन, क्षत्रप, भोज, चुटू, चालुक्य, कदंब, विजयनगर अशा अनेक साम्राज्यांनी राज्य केलं आहे. त्यामुळे गोवा जितका आधुनिक वाटतो, तितका नसून तो बराच इतिहासात रमलेला आहे. गोव्यात एक प्रसिद्ध शिव मंदिर आहे, ज्याचं नाव आहे तांबडी सूर्ला महादेव मंदिर ! कदंबांनी १३व्या शतकात उभारलेलं हे मंदिर गोव्याची खरी शान आहे. शिल्पकलेचा उत्तम नमुना आणि जंगलाच्या मध्यभागी असलेल हे मंदिर सहसा गोव्याला आलेली मंडळी टाळतात. त्यामुळे गोव्याच्या भूमीवर असलेलं हे तांबडी सुर्ला मंदिर सगळ्यांनीच पहायला हवं. याशिवाय श्री मंगेश मंदिर, शांतादुर्गा मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, नागेशी मंदिर, मारुती मंदिर, सप्तकोटेश्वर मंदिर, सोमेश्वर मंदिर, श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर अशी अनेक कलाकुसर असलेली मंदिरं आहेत, जी कोणीही पाहत नाहीत. धार्मिक भाविकांसाठी ही मंदिरं म्हणजे प्रवासातलं खरं सोनं आहे. त्यामुळे गोव्याला गेलात तर ही सुंदर मंदिरं पाहूनच या. (Social Updates)
आता गोव्यात असलेल्या किल्ल्यावर येऊया. आपण ‘दिल चाहता है’मध्ये एक किल्ला पाहिला आहे, तो म्हणजे चपोरा फोर्ट… मुव्हीमध्ये दाखवल्यामुळे त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली, पण गोव्यात तब्बल १७ किल्ले आहेत, विश्वास होत नाहीये… तर नावं ऐका…तेरेखोल फोर्ट, चपोरा फोर्ट, कोरज्युएम फोर्ट, रिस मॅगोस फोर्ट, अग्वाडा फोर्ट, सिंक्युरिम फोर्ट, काबो दे रामा फोर्ट, रचोल फोर्ट, नानुज फोर्ट, नारोआ फोर्ट, मोर्मुगाव फोर्ट, आंजदीव फोर्ट, बेतुल फोर्ट, अलोर्ना फोर्ट, कोलवले फोर्ट, मर्दनगड आणि थिविम फोर्ट… ही गोव्यामधल्या किल्ल्यांची यादी ! आता इतके किल्ले कसे फिरायचे, असे हे तुमच्या डोक्यात नक्कीच आलं असेल. पण एक गोवा डायरीजची उत्तम आयटीनरी बनवली की, तुम्ही हे किल्ले नक्कीच फिरू शकता. यातील काही किल्ल्याचं कनेक्शन पोर्तुगीज, इंग्रज, आदिलशाहीशी आहे. तर काही किल्ल्यांचं कनेक्शन मराठ्यांशी आहे. आदिलशाहने १५व्या शतकांत बांधलेली एक सफा मस्जिदसुद्धा फोंड्यात इथे आहे. आणि The Basilica of Bom Jesus हे फेमस चर्च तर तुम्हाला माहितीच आहे. (Goa)
गोव्यामध्ये जवळपास २० म्युझिअम्स आहेत. यामध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध गोवा स्टेट म्युझिअम, बिग फुट म्युझिअम, गोवा चित्र म्युझिअम, नेव्हल एविएशन म्युझिअम हे आहेत. आता म्युझिअम्समध्ये आवड असणारी मंडळी तर जाऊ शकता, पण न आवडणाऱ्या मंडळींनाही रस्त्यात एखाद म्युझिअम दिसलं तर फेरफटका मारून येऊच शकता. गोवामधला दुधसागर waterfall तर फेमस टुरिस्ट स्पॉट आहे. पण दुधसागर व्यतिरिक्त इथे बरेच धबधबे आहेत, जिथे मोजकीच लोकं जातात, ते म्हणजे हार्वालेम, तांबडी सुर्ला, चरवणे, हिवरेम, कुस्केम, बामनबुडो, सात्रेम असे अनेक waterfall आहेत, जिथे निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही गेलच पाहिजे. मंदिर, किल्ले, धबधबे झाले आता थोडं लेण्यांवर येऊ. गोव्यात बऱ्याच लेण्या आहेत, ज्यांबद्दल कधी कोणीच बोलत नाही. यामध्ये खांडेपार लेणी, गोव्याची पांडव लेणी, अरवालेम लेणी, रीवोना लेणी, मंगेशी लेणी आणि लामगाऊ या ऐतिहासिक लेण्या आहेत. गोव्याला येणारे कित्येक पर्यटक इथे फिरकत सुद्धा नाहीत. त्यामुळे गोव्यात एन्टरटेनमेंटसोबत इतिहाससुद्धा पहायला असेल तर या लेण्या नक्कीच पर्यटकांनी फिरल्या पाहिजेत. (Social Updates)
गोवा जितका निसर्गसंपन्न आहे, तितकाच वाईल्डलाईफने भरलेला आहे. इथे भगवान महावीर वाइल्डलाईफ Sanctuary, कोटीगाव वाइल्डलाईफ Sanctuary, बटरफ्लाय Sanctuary, डॉ. सलीम अली Sanctuary अशा अनेक sanctuary आहेत, जिथे तुम्ही प्राण्याचं आणि पक्ष्यांचं जग अनुभवू शकता. इथे एक प्रसिद्ध घाट आहे जो महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तिन्ही राज्यांच्या बॉर्डरवर पडतो, तो म्हणजे चोरला घाट ! या घाटावरून प्रवास करताना निसर्गाचा एक वेगळाच अनुभव घेता येतो. बीच बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार नाही, कारण सहसा पर्यटक बीच आणि समुद्राचाच आनंद घ्यायला गोव्याला जात असतात. गोव्यात तसे ५० च्या वर बीच आहेत. पण गोव्यात येणारे पर्यटक जातात बागा, अंजुना, कळंगुटे किंवा कंडोलिमला… त्यामुळे मोजके बीच फिरूनही गोवा एक्स्प्लोर करण्याचं अनेकांचं राहूनच जात. (Goa)
======================
देखील वाचा :
New Year : 2025 होरपळून काढणार !
Jimmy Carter : जिमी कार्टर यांच्या नावानं कसं झालं हरियाणामधलं एक गाव !
======================
हे सगळं सांगण्याचं तात्पर्य हेच होत की, गोवा फुल ऑन आपली संस्कृती जपत पर्यटनाने भरलेला आहे. आणि तो केवळ दारू, बीच आणि पार्ट्यानपुरता नाही. त्यामुळे आज एकच ठरवा की पुढच्या वेळी गोव्याला जाऊ तर थोडं वेगळ्या दृष्टीकोनातून आपल्या या गोमंतकला म्हणजे गोव्याला पाहू ! (Social Updates)