Home » पनवेल मतदारसंघ कोणाच्या बाजूने?

पनवेल मतदारसंघ कोणाच्या बाजूने?

by Team Gajawaja
0 comment
Panvel Assembly Constituency
Share

कोकण आणि देश यांना जोडणारा पनवेल मतदारसंघ राजकीयदृष्ट्या जसा महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे पुणे आणि मुंबई या दोन महानगरांच्या मध्ये असल्यामुळे त्याला आर्थिकदृष्ट्या ही महत्त्व आहे. अशा या मतदारसंघात यंदाची विधानसभेची लढत चुरशीची होईल असा अंदाज होता. याला कारण म्हणजे प्रशांत ठाकूर हे तिथे गेले सलग तीन टर्म आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात प्रस्थापित रोधी भावना निर्माण होते का, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु महाविकास आघाडीच्या बाजूने ज्या काही घडामोडी घडल्या आणि त्यांच्या हालचाली फसल्या. मतदारसंघांचा आढावा आपण गाजावाजाच्या माध्यमातून घेत आहोत. विधानसभेच्या रणधुमाळीत आज आपण पाहाणार आहोत पनवेल मतदारसंघ विधानसभा मतदारसंघाबद्दल. महाविकास आघाडीच्या नेमक्या कोणत्या हालचाली फसल्या? सलग तीन टर्म आमदार असणाऱ्या प्रशांत ठाकूर यांना या मतदार संघात आव्हान असेल का? हे जाणून घेऊया. (Panvel Assembly Constituency)

पनवेल मतदारसंघ हा रायगड जिल्ह्यात येतो आणि आपल्याला माहिती आहे की कोकण किंवा रायगड हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता. तिथे त्यांचे वर्चस्व होते, आणि त्यामुळे वर्षानुवर्षे तिथे शेकाप आणि काँग्रेस असाच सामना होत असे. यंदाच्या निवडणुकीमध्ये परिस्थिती वेगळी आहे. शेकाप ही महाविकास आघाडीमध्ये आहे आणि तिथे काँग्रेस आणि शेकाप एकत्र आहेत. त्यामुळे शेकापने हा मतदारसंघ आपल्याला मिळेल असे गृहीत धरून त्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या होत्या. शेकापचे नेते जयंत पाटील यांनी आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीच सहा जागांवरचे उमेदवार घोषित केले होते, त्यात पनवेल ही एक जागा होती. त्यांनी बळीराम पाटील यांची उमेदवारी जाहीरसुद्धा केली होती. परंतु नंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने या जागेवर दावा केला होता. जागावाटप अधिकृतपणे झालेले नसताना ही जागा शेकापने कशी घेतली, असा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावरूऩ बरीच भवति न भवति झाली. अखेर शिवसेनेने माघार घेतली तरी पक्षाच्या माजी नगरसेविका लीना गरड यांनी बंडखोरी केली आणि त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. (Political Updates)

आता अर्ज माघारीची मुदत संपलेली आहे आणि त्यानंतरचे जे चित्र स्पष्ट झाले आहे त्यानुसार लीना गरड य़ा अजूनही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी आपली उमेदवारी माघारी घेतलेली नाही आणि त्यामुळे महाविकास आघाडीतील शेकाप आणि शिवसेना यांच्यात टक्कर होणार आहे. त्याशिवाय या लढतीतील आणखी एक पैलू असा आहे की, राज्यातील अन्य मतदारसंघाप्रमाणेच येथेही एकाच नावाचे दोन उमेदवार आहेत. त्यानुसार पनवेलमध्ये बळीराम पाटील यांच्याशी नामसाधर्म्य असलेले आणखी एक बळीराम पाटील उभे आहेत. ती त्यांच्या दृष्टीने आव्हानाची बाब आहे. (Panvel Assembly Constituency)

 

बळीराम पाटील यांच्या दृष्टीने आणखी एक अडचणीचा मुद्दा म्हणजे काँग्रेसची नाराजी. आधी म्हटल्याप्रमाणे हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ आहे. देशाचे पहिले अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांनी तत्कालीन रायगडच्या कुलाबा मतदारसंघातून निवडणूक लढवून येथे विजय मिळवला होता. त्यांच्यानंतर ए. आर. अंतुले यांनी या जिल्ह्यावर वर्चस्व गाजवलं. ते राज्याचे मुख्यमंत्री झाले, नंतरही अनेक वर्षे त्यांचा दबदबा होता. अशा परिस्थितीत काँग्रेसला रायगड जिल्ह्यातून काही तरी मिळण्याची आशा होती, परंतु जागावाटप अशा रीतीने झाले की संपूर्ण रायगड जिल्ह्यातच काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी आहे आणि त्याची परिणती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत व त्यांच्या कार्यकर्त्यांनी राजीनामे देण्यात झालेली आहे. (Political Updates)

=====

हे देखील वाचा :  ठाण्यात नेमकी कोणती गणितं चालणार?

========

या सर्व परिस्थितीत महाविकास आघाडी ही विभागल्यासारखी झाली आहे. दुसरीकडे पनवेल मतदारसंघात वर्षानुवर्षे ठाकूर कुटुंबाचे वर्चस्व आहे. रामशेठ ठाकूर यांनी या 1998 ते 2004 मध्ये मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले. त्यांच्यानंतर प्रशांत ठाकूर यांनी गेले तीन टर्म तिथे आमदारकी मिळवलेली आहे. सुरुवातीला ते काँग्रेसमध्ये होते, मात्र 2014 आणि 2019 अशा दोन टर्म त्यांनी भाजपतर्फे निवडणूक लढविली व जिंकली. यंदाच्याही निवडणुकीत ते भाजपच्या वतीने उमेदवार आहेत. प्रचारासाठीही त्यांना चांगला कालावधी मिळालेला आहे. शिवाय महायुतीच्या दृष्टीने त्यांना फायद्याचा म्हणजे रायगड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा मतदारसंघ होय. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जे एकमेव उमेदवार राज्यातून निवडून आले ते तटकरे होते. त्यांची सुद्धा कुमक मग ठाकूर यांना मिळेल असा अंदाज आहे. एकूण परिस्थिती पाहिली तर ठाकूर यांच्या दृष्टीने ही निवडणूक सोपी आहे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. निरीक्षकांनी तर ठाकूर विजयी होतील असा अंदाज व्यक्त केला आहे. अर्थात मतदार काय कॉल देतात ते निकालाच्या दिवशीच कळून येईल. तोपर्यंत तुम्ही गाजावाजाची विधानसभेची रणधुमाळी ही राजकीय विश्लेषक मालिका पाहत रहा. (Panvel Assembly Constituency)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.