Home » Donald Trump : ट्रम्पचे बॉलरुम आणि वाद !

Donald Trump : ट्रम्पचे बॉलरुम आणि वाद !

by Team Gajawaja
0 comment
Donald Trump
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि वाद यांचे अनोखे नाते आहे. आता हेच डोनाल्ड ट्रम्प नव्या वादात सापडले आहेत. त्याला कारण ठरला आहे, ट्रम्प यांचा लहरी स्वभाव आणि त्यांची पार्टी करण्याची सवय. ट्रम्प हे स्वतः पार्ट्या करण्यासाठी ओळखले जातात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  झाल्यावरही त्यांच्या या रहाणीत फरक पडलेला नाही. आता तर अधिक मोठ्या पार्ट्या करण्याची त्यांची योजना आहे. त्यासाठी ट्रम्प यांनी चक्क व्हाईट हाऊसच्या ईस्ट विंगला पाडले आहे. (Donald Trump)

आता या ठिकाणी अध्यक्षांसाठीचा खास बॉलरूम तयार होत आहे. या प्रकल्पासाठी ट्रम्प यांनी सुरुवातीला वैयक्तिक निधीचा वापर करत आहेत आणि अमेरिकन करदात्यांना कोणताही खर्च येणार नाही, असे सांगितले असले तरी आता हा सर्व खर्च करदात्यांच्या पैशातून होणार असल्यामुळे अमेरिकेत गदारोळ उठला आहे. या बॉलरुमसाठी ३०० दशलक्ष डॉलर्सपर्यंत खर्च अपेक्षित असून ट्रम्प यांनीहा पैसा गोळा करण्यासाठी देणगीरांना आवाहन केले आहे. व्हाईट हाऊसमध्ये सर्वात मोठा आणि सुसज्ज असा बॉलरुम तयार करणे, हे ट्रम्प यांचे स्वप्न होते, आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी चक्क व्हाईट हाऊसची रचना बदलण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या या योजनेला आता अमेरिकेतील जनता कडाडून विरोध करत असून ट्रम्प अमेरिकेचा इतिहास पुसून टाकत आहेत, अशी टीका होत आहे. (International News)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता त्यांच्याच देशात एका नव्या वादात सापडले आहेत. हा वाद बॉलरुमवरुन सुरु आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये आता ट्रम्प एक अलिशान बॉलरुम तयार करीत आहेत. बॉलरूम म्हणजे, जिथे डान्स पार्टी आयोजित केल्या जातात, तो भव्य हॉल. आत्तापर्यंत झालेल्या अध्यक्षांना व्हाईट हाऊसमध्ये बॉलरुम नाही, याबद्दल कुठलाही आक्षेप नव्हता. मात्र डोनाल्ड ट्रम्प पहिल्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले, तेव्हाही त्यांना व्हाईट हाऊसमध्ये भव्य पार्टी आयोजित करण्यासाठी एकही जागा नसल्याचे सांगितले होते. आता दुस-यावेळी ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले, आणि त्यांनी या बॉलरुमचे काम हाती घेतले. (Donald Trump)

सुरुवातीला बॉलरुमचा सर्व खर्च आपण वैयक्तिक करणार असल्याचे सांगणा-या ट्रम्प यांनी बॉलरुमसाठी देणगीदारांना आवाहन करण्यास सुरुवात केली, आणि वाद सुरु झाला. या बॉलरुमसाठी व्हाईट हाऊसच्या ईस्ट विंगला पाडण्यास सुरुवात झाल्यावर अनेक अमेरिकन नागरिकांना याचा विरोध केला. व्हाईट हाऊस हे अमेरिकेच्या प्रतिष्ठेचे प्रतिक आहे, त्याचा काही भाग पाडून तिथे नवीन प्रेसिडेंशियल बॉलरूम बांधणे, ही कल्पनाच त्यांना आवडली नाही. व्हाईट हाऊसची ईस्ट विंगही दशकांपासून व्हाईट हाऊस कॉम्प्लेक्सचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ओळखली जात होती, इथे माजी अध्यक्षांच्या काही आठवणी होत्या, त्या ऐतिहासीक म्हणून जतन केल्या होत्या. पण बॉलरुमच्या नावाखाली त्या आठवणी आता नष्ट झाल्या आहेत. ट्रम्प यांनी या बॉलरुमची रचना कशी असेल, हे आधीच ठरवले आहे. (International News)

सुरुवातीला त्यांना ५०० आसनांचा हॉल हवा होता. मात्र आता त्यांनी १,३५० पर्यंत आसनांची क्षमता वाढवली आहे. या बॉलरुममध्ये आसनांची संख्या वाढल्यावर त्याच्यासाठीचे खर्चाचे बजेटही वाढले. त्यामुळे ट्रम्प यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठितांना यासाठी देणगी देण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये अनेक उद्योगपती, चित्रपट व्यवसाय संबंधीत आहेत. हा बॉलरुम पुढच्या १५० वर्षापर्यंत शानदार राहिल अशी ट्रम्प यांना आशा आहे. व्हाईट हाऊसमध्ये येणारा प्रत्येक अध्यक्ष या बॉलरुममध्ये भव्य पार्ट्यांचे आयोजन करेल, आणि त्यातून अमेरिकेच्या भव्यतेची कल्पना जगाला येईल, असे ट्रम्प आता सांगत आहेत. याशिवाय ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या अनेक भागांमध्ये आधीच बदल केले आहेत. त्यांच्या एका टॉयलेटमध्ये त्यांनी सोन्याच्या फ्रेम लावून घेतल्याची ओरडही होत आहे. (Donald Trump)

========

हे देखील वाचा :  Vladimir Putin : व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर !

========

शिवाय अनेक महागड्या शोभेच्या वस्तू त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये लावून घेतल्या आहेत. यावरुन त्यांच्यावर मोठी टीका होत आहे. राजकीय अभ्यासकांच्या मते, अमेरिकेचे व्हाईट हाऊस हे लोकशाहीचे घर असावे, मात्र आता व्हाईट हाऊस लोकशाहीच्या इमारतीपेक्षा डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वच्छंदी स्वभावाचे आणि पार्टीचे प्रतिक झाले आहे. सध्या व्हाईट हाऊसमध्ये जो बॉलरुम उभा रहात आहे, त्याचा प्रारंभिक खर्च २०० दशलक्ष डॉलर्स होता. परंतु आता हा खर्च ३०० दशलक्ष डॉलर्सपर्यंत वाढला आहे. हा खर्च भागवण्यासाठी अनेक उद्योगपतींनी क्रोप्टोमधील गुंतवणूक ट्रम्पच्या हातात सोपवली आहे. त्यावरुनही ट्रम्प टीकेचे धनी झाले आहेत. मात्र कितीही टीका झाली, तरी हा बॉसरुम तयार करणार असा निश्चय ट्रम्प यांनी केला आहे. (International News)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.