Home » Venezuela : अमेरिका व्हेनेझुएला मधला तणाव युद्धाच्या वाटेवर…

Venezuela : अमेरिका व्हेनेझुएला मधला तणाव युद्धाच्या वाटेवर…

by Team Gajawaja
0 comment
Venezuela
Share

दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर असेल्या व्हेनेझुएला या देशावर युद्धाचे ढग जमा झाले आहेत. कारण व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या दोन नेत्यांमधील मतभेद कमालीचे वाढले आहेत. गेल्या काही दिवसात व्हेनेझुएलाच्या जहाजांवर हल्ला करण्याचे आदेश देणा-या डोनाल्ड ट्रम्प यांनी आता मादुरो यांना थेट धमकीच दिली आहे. “ख्रिसमसपर्यंत सत्ता सोडा नाहीतर युद्धासाठी तयार राहा,”असा थेट संदेश ट्रम्प यांनी मादुरो यांना पाठवला आहेच, शिवाय व्हेनेझुएलाचे हवाई क्षेत्र बंद म्हणून घोषित केले आहे.  मादुरो यांना व्हेनेझुएलाच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यासाठी ट्रम्प गेली वर्षभर प्रयत्न करीत आहेत. (Venezuela)

मात्र आता त्यांनी थेट मादुरो यांना फोन करुन पदावरुन दूर व्हा, अन्यथा लष्करी कारवाईला तयार रहा, असा इशारा दिला आहे. शिवाय कॅरिबियनमध्ये विमानवाहू जहाजे तैनात केली आहेत. यामुळे जगभरातील युद्धामध्ये आणखी एका युद्धाची भर पडणार, अशी भीती व्यक्त होत आहे.  व्हेनेझुएलाने ट्रम्प यांच्या धमकीचा वसाहतवादी धोका अशा शब्दात तीव्र निषेध केला आहे. गेल्या काही महिन्यापासून वाढत असलेला अमेरिका आणि व्हेनेझुएलातील तणाव आता थेट युद्धात बदलण्याची चिन्हे आहेत.  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना ख्रिसमसपर्यंत शांततेने सत्ता सोडा नाहीतर अमेरिकेच्या लष्करी कारवाईसाठी तयार राहा, असा इशारा दिला आहे.  ट्रम्प यांनी एका गुप्त हॉटलाइन कॉल दरम्यान हा इशारा दिल्याची माहिती आहे. (International News)

  ट्रम्प यांनी मादुरो यांना फक्त इशाराच दिला असे नाही तर, व्हेनेझुएलावरील आणि त्याच्या सभोवतालचे हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद केल्याचीही माहिती आहे.  त्यामुळे अमेरिका कधीही व्हेनेझुएलावर आक्रमण करेल, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.  ट्रम्प यांच्या हवाई क्षेत्र बंद करण्याच्या निर्णयाबाबत शंकाही घेण्यात येत आहे. कायदेशीरदृष्ट्या, ट्रम्प दुसऱ्या देशाचे हवाई क्षेत्र बंद करू शकत नाहीत.  मात्र अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांनी असा आदेश दिल्यावर आता हे हवाई क्षेत्र बंद झाले आहे. यामुळे विमान उद्योगाला मोठा धक्का बसला आहे.  फ्लाइट रडार २४ मधील डेटानुसार, व्हेनेझुएलाचे हवाई क्षेत्र पूर्णपणे रिकामे आहे. सर्व व्यावसायिक विमाने हे क्षेत्र टाळत आहेत. ट्रम्पच्या धमकीनंतर काही तासांतच, एक क्यूबन जेट व्हेनेझुएलाच्या हवाई क्षेत्रात गेले आहे, त्यामुळे या क्षेत्रात युद्ध केव्हाही सुरु होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.  व्हेनेझुएलाने ट्रम्प यांच्या या निर्णयाचा निषेध करत वसाहतवादी आणि बेकायदेशीर आक्रमकता असलेले वर्तन अशा शब्दात केले आहे. (Venezuela)

डोनाल्ड ट्रम्प ट्रम्प यांनी मादुरो यांना डिसेंबरच्या अखेरपर्यंत मुदत दिली आहे.  मादुरो यांना क्युबा, रशिया किंवा मित्र राष्ट्रात सुरक्षितपणे बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे.  मात्र या देशात जातांना त्यांनी किती संपत्ती सोबत न्यावी यावर बंधन ठेवले आहे.  मादुरो यांनी व्हेनेझुएलाची सत्ता सोडण्यास नकार दिला तर अमेरिका काही आठवड्यांत एक ऑपरेशन राबवणार असून त्यातून मादुरो यांना जबरदस्तीने व्हेनेझुएलाच्या सत्तेवरुन खाली खेचण्यात येणार आहे,  अशावेळी अमेरिका मादुरो यांना अटक करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. (International News)

अलिकडच्या काही महिन्यांत, अमेरिकेने कॅरिबियन आणि पॅसिफिकमध्ये कथित ड्रग्ज बोटींवर २० हून अधिक हल्ले केले आहेत.  यात व्हेनेझुएलाचे ८० हून अधिक नागरिक मारले गेले आहेत. या बोटींवर ड्रग्ज होते की नाही, याचा कुठलाही पुरावा अमेरिकेनं दिलेला नाही.  त्यामुळे अमेरिकेच्या या कारवायांमागील हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.  या सर्वात अमेरिकेने जगातील सर्वात मोठी युद्धनौका, यूएसएस जेराल्ड आर. फोर्ड, कॅरिबियनमध्ये तैनात केली आहे. त्यामुळे अमेरिका कधीही व्हेनेझुएलावर आक्रमण करेल, अशी भीती आता व्यक्त होत आहे.  २०२४ च्या निवडणुकीत हेराफेरीच्या आरोपांना आधीच तोंड देत असलेल्या मादुरो यांच्या मात्र यामुळे अडचणी वाढल्या आहेत. ट्रम्प प्रशासनाने संपूर्ण व्हेनेझुएलाच्या राजवटीला ‘दहशतवादी संस्था’  म्हणून घोषित केल्यावर व्हेनेझुएलामधील निवडणूक प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असे असले तरी मादुरो यांनी आपण अमेरिकेला तोंड देऊ शकतो, असे जाहीर करुन सैन्याला सज्ज रहाण्याचे आदेश दिले आहेत. (Venezuela)

=======================

हे देखील वाचा : Instagram : इंस्टाग्राम हॅक होऊ नये म्हणून फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

=======================

वास्तविक व्हेनेझुएलाचे सैन्य अमेरिकन सैन्यापेक्षा खूपच कमकुवत आहे.  मादुरो यांच्यावर रशियाकडून कमी किंमतीमध्ये जुनी युद्धसामुग्री विकत घेतल्याचही आरोप आहे. सोबतच सैनिकांना १०० डॉलर्स एवढा महिन्याचा पगार तिथे देण्यात येतो.  यात या सैनिकांच्या कुटुंबाच्या गरजाही पूर्ण होऊ शकत नाहीत. त्यामुळेच अमेरिकेने जर व्हेनेझुएलावर आक्रमण केलेच तर हे सैन्य आधी पळून जाईल, असे व्हेनेझुएलातील तज्ञ सांगत आहेत. आता पुढच्या २० दिवसात ट्रम्प काय निर्णय घेतात, यावर व्हेनेझुएला आणि मादुरो यांचे भविष्य अवलंबून आहे. (International News)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.