होमी जहांगीर भाभा आणि विक्रम साराभाई या दोन महान शास्त्रज्ञांनी आपल्या देशाला अनमोल अशी देणगी दिली आहे. भारताला परमाणू महाशक्ती करण्याची सुरुवात करुन देणाऱ्या या दोन शास्त्रज्ञांवर लवकरच एक वेबसिरीज येतेय. ‘रॉकेट बॉयज (Rocket Boys)’ नावाच्या या वेबसिरीजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. त्याच्यावरुन या वेबसिरीजची कल्पना येतेय. सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ४ फेब्रुवारी रोजी येणाऱ्या रॉकेट बॉयजच्या ट्रेलरला लाखो लाईक मिळालेत, यावरुन ही सिरीज लोकप्रिय ठरेलच, पण या महान शास्त्रज्ञांच्या जीवन प्रवास तरुण पिढीला समजून घेता येईल, अशी प्रतिक्रीयाही येत आहे.
रॉकेट बॉयज (Rocket Boys) या सिरीजमध्ये जिम सर्भ हा परमाणू भौतिक शास्त्रज्ञ होमी भाभा तर, इश्वाक सिंह भौतिक आणि खगोलशास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांची भूमिका करीत आहे. होमी भाभा आणि विक्रम साराभाई हे दोघेही चांगले मित्र होते. त्यांची पहिली भेट, मैत्री आणि भारतासाठी त्यांनी दिलेले योगदान याची झलक ट्रेलरमधून बघायला मिळते. या सिरीजमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचीही झलक पहायला मिळणार आहे.
रॉकेट बॉयज (Rocket Boys) सिरीजचा एक टीझर गेल्या वर्षी १५ ऑगस्टला आला होता. त्यानंतर डॉ. होमी भाभा यांच्या जयंतीचे निमित्त साधत दुसरा टिझर ३० ऑक्टोबर रोजी आला. पण त्यानंतर या वेबसिरीजचे शूटिंग कितपत पूर्ण झाले आहे, याची काही बातमी नव्हती. पण काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या रॉकेट बॉयजच्या ट्रेलरनं सर्व शंका दूर केल्या आहेत.
फिल्म निर्माता निखिल अडवाणी, रॉय कपूर फिल्म्स निर्मित या वेबसिरीजचे दिग्दर्शन अभय पन्नू यांनी केले आहे. होमी भाभा यांची भूमिका करणारा जिम सर्भ हा स्वतः पारसी आहेत. आपल्या समाजातील एवढ्या मोठ्या व्यक्तीमत्त्वाची भूमिका करायला मिळणे, हे मोठे भाग्याचे असल्याचे त्यांनी सांगितले.
=====
हे देखील वाचा: ऋतिक रोशन (Hrithik Roshan) साकारणार नकारात्मक भूमिका
=====
अमेजॉन प्राइमची लोकप्रिय वेबसिरीज पाताल लोक मध्ये काम केलेला इश्वाक सिंहही रॉकेट बॉयज मधील विक्रम साराभाई यांच्या भूमिकेबाबत उत्सुक आहे. होमी भाभा आणि विक्रम साराभाई यांची भारताचा वैज्ञानिक विकास करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यांचा काही जीवनप्रवास या सिरीजमध्ये दाखवण्यात आला आहे.
होमी भाभा, विक्रम साराभाई यांना कसा पाठिंबा देतात हेही दाखवण्यात आले आहे. “विक्रम साराभाई तुम एक शानदार इंसान हो और जो तुम अपने देश के लिए कर सकते हो, वो इस लाखों के भीड़ में भी कोई नहीं कर सकता है।” हे होमी भाभा यांचे वाक्य चाहत्यांना विशेष आवडत आहे. या दोन्हीही शास्त्रज्ञांची मैत्री किती घट्ट होती, याचा परिचय यातून मिळतो, अशी प्रतिक्रीया त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई डायरीज, ये मेरी फैमिली या सिरीजचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून अभय पन्नू यांनी काम पाहिले आहे. ट्रेलरवरुन रॉकेट बॉयज रॉकेट बॉयज (Rocket Boys) सिरीजबाबत उत्सुकता वाढली आहे.
– सई बने