Home » वादातीत वादग्रस्त

वादातीत वादग्रस्त

by Correspondent
0 comment
Sachin Tendulkar | K Facts
Share

नुकतेच पंजाब राज्यात प्रचंड राजकीय घमासान होऊन त्याची परिणीती मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची गच्छंती होण्यात झाली. ही घटना सकृतदर्शनी अकस्मात घडल्यासारखी वाटली पण वरवर संथ वाटणाऱ्या पाण्याच्या अंतरंगात बरेचदा जी खळबळ माजलेली असते ती वरकरणी जाणवत नाही. असेच काहीसे पंजाबच्या बाबतीत घडले.

पंजाबी राजकारणात अस्वस्थता/अस्थैर्य निर्माण झाले ते एका खेळिया राजकारण्यामुळं. या सबंध नाट्याचा महानायक होता भारताचा भूतपूर्व क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू. आता तर हरीश रावत यांनी घोषित केले आहे की २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत नवज्योत सिद्धू हाच काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार असेल. या विधानावरून काँग्रेसमध्ये पुन्हा वादंग निर्माण झाले आहेत. एक गोष्ट मात्र खरी आहे की सिद्धू मुख्यमंत्री होण्यासाठीच भाजप मधून काँग्रेसमध्ये आला आहे.

नवज्योत सिद्धूचा जन्म २० ऑक्टोबर १९६३ या दिवशी पतियाळा येथे झाला. त्याचे वडील पंजाबचे ऍडव्होकेट जनरल होते. त्याचे आई वडील सिद्धूच्या लहानपणीच विभक्त झाले. उच्च विद्याविभूषित व उत्तम वक्तृत्वकला असलेला सिद्धू (Navjot Singh Sidhu) स्पष्टवक्ता आहे. तो तापट स्वभावाचा वाटला तरी तितकाच विनोदातही रमतो. तो धर्माने शीख आहे पण भगवद गीतेचा गाढा अभ्यासक आहे.

सध्या सिद्धू राजकारणात गाजत असले तरी त्याची देशाला ओळख झाली ती क्रिकेटमुळेच. १९८३ मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिज संघाविरुद्ध अहमदाबाद कसोटीत सिद्धूने भारतीय संघात पदार्पण केले. तो अहमदाबादनंतर चेन्नई कसोटीत सुद्धा खेळला पण दोन्ही सामन्यात तो पूर्णपणे निष्प्रभ ठरला. त्याची फटके मारण्याची क्षमता अत्यंत मर्यादित होती. त्यावरूनच राजन बाला या क्रिकेट समीक्षकाने लेख लिहून त्याची ‘स्ट्रोकलेस वंडर’ अशी हेटाळणी केली.

तो लेख जिद्दी सिद्धूच्या जिव्हारी लागला. त्याने तो लेख आपल्या खोलीमध्ये चिटकवून ठेवला. गर्भश्रीमंत सिद्धूने घराच्या अंगणात सिमेंटच्या खेळपट्टीवर अथक परिश्रम घेऊन आपल्या खेळात सुधारणा केली. १९८७ च्या भारतातील विश्वचषक स्पर्धेपूर्वी मुंबईचे क्रीडा पत्रकार वायंगणकर यांनी सिद्धूची कठोर मेहनत व त्याची षटकार मारण्याची क्षमता याविषयी देशाला अवगत केले आणि परिणामस्वरूप महत्वकांक्षी सिद्धूची विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाली. ही स्पर्धा सिद्धूच्या टोलेजंग शटकारांमुळे गाजली .

सिद्धू आणि वाद यांचे नाते जुने आहे. भारतीय संघात स्थिरावत असतानाच १९८८ मध्ये तो एका गुन्ह्यात अडकला. पटियाळामध्ये रस्त्यात झालेल्या अपघातामुळे सिद्धू आणि दुसरे मोटारचालक यांची बाचाबाची होऊन प्रकरण गुद्द्यांवर गेले. यात दुसऱ्या मोटारचालकाचा मृत्यू झाला व सिद्धूवर खुनाचा आरोप लागला. सिद्धू काही काळ फरार झाला होता.

त्यानंतर न्यायालयाच्या परवानगीने तो वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाऊ शकला. लांबलेल्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर २००६ मध्ये सिद्धूला या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आणि त्याला खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला. सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या शिक्षेला स्थगिती दिल्यावर तो निवडणूक जिंकून पुन्हा खासदार झाला. त्यावेळी तो भाजप मध्ये होता.

दुसरा प्रसंग घडला इंग्लंडमध्ये १९९६ च्या दौऱ्यात. सिद्धू व कप्तान अझरुद्दीन यांच्यात वादावादी झाली आणि सिद्धूचा समज झाला की अझरुद्दीनने त्याला आईवरून शिवीगाळ केली. तो तडक इंग्लंडचा दौरा सोडून निघून आला. (त्याबद्दल क्रिकेट मंडळाने शिक्षा म्हणून त्याला पुढील दहा कसोटी सामन्यातून वगळले) नंतर मोहिंदर अमरनाथ यांनी खुलासा केला की पंजाबी व तेलगू भाषेतील शब्दसाधर्म्यामुळे सिद्धूचा गैरसमज झाला होता. यानंतर हे प्रकरण मिटवण्यात आले.

सिद्धू हा लहरी क्रिकेटपटू म्हणून प्रसिद्ध होता. त्याची तंदुरुस्ती हा चेष्टेचा विषय झाला होता. सकाळी सामना सुरु होण्याअगोदर तो अचानक तंदुरुस्त नसल्याचे सांगत असे. हात/पाय दुखतो, मान अवघडली अशी कारणे तो सांगत असे. पण त्याच्या या अशा सबबी सांगण्यामुळे भारतीय क्रिकेटला एक नकळत लाभ झाला होता. १९९४ च्या न्यूझीलंड दौऱ्यात एका एक दिवसीय सामन्याच्या सकाळी त्याने स्वतःला अनफिट ठरवलं आणि त्यामुळे सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) व्यस्थापक वाडेकर व कप्तान अझरुद्दीन यांची विनवणी करून सलामीला येण्याची संधी साधली. यानंतरच सचिन भारताचा एक दिवसीय सामन्यात नियमित सलामीचा फलंदाज झाला व त्याने अनेक विक्रम नोंदवले.

सिद्धूकडे प्रचंड संयम आहे तसेच तो आक्रमक सुद्धा आहे. त्याने खेळत असताना दोन्ही गुणांचे दर्शन घडवले होते. १९९७-९८ मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यात त्याने ११ तास बॅटिंग करून २०१ धावा काढल्या होत्या. तर एक दिवसीय सामन्यात तो तेवढीच आक्रमक फटकेबाजी करत असे. १९९६ च्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध ९६ धावा काढताना त्याने चौफेर फटकेबाजी केली. राजकारणातही भाजपमध्ये बारा वर्षे असताना त्याने असाच संयम दाखवला पण काँग्रेसमध्ये आल्यावर तो मुख्यामंत्रीपदासाठी एवढा अधीर झाला की त्याची थोडी वाट बघण्याची पण तयारी नव्हती.

Sachin Tendulkar
Sachin Tendulkar

क्रिकेटच्या मैदानावर तो पाकिस्तानशी कायम खडूसपणे खेळला. पाकिस्तान्यांच्या ‘आरे’ ला ‘कारे’ करत असे. पण  राजकारणात आल्यावर मात्र त्याला पाकिस्तान प्रेमाचे भरते आले आहे. त्याने इम्रानखानच्या शपथविधीला लावलेली उपस्थिती आणि पाकिस्तानी सेनाप्रमुखाना मारलेली मिठी फारच वादग्रस्त ठरली. नुकतेच त्याने विधान केले की दक्षिण भारतापेक्षा पाकिस्तानात गेल्यावर अधिक आपलेपणा वाटतो. या विधानावरूनही सिद्धू टीकाकारांचा लक्ष्य ठरला.

सिद्धू प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्यात पटाईत आहे. १९९८ मध्ये भारतात झालेल्या मालिकेत त्याने ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नला पुढे जाऊन असे काही ठोकले की शेन काही काळ आत्मविश्वास गमावून बसला आणि सचिनचे पुढचे काम सोपे झाले. तसेच त्याने राजकारणात अमरिंदर सिंगना एवढे सळो की पळो करून सोडले की अमरिंदर याना मुख्यमंत्रीपद गमवावे लागले.

हरहुन्नरी सिद्धूने क्रिकेट समालोचन, टीव्ही वरील निरनिराळे विनोदी कार्यक्रम, बिग बॉस यामध्ये सुद्धा मुशाफिरी करून नाव कमावले. पण इथे सुद्धा वादंगाने त्याची पाठ सोडली नाही. संसदेचा खासदार असताना पक्षाची नाराजी पत्करून तो कपिल शर्माच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता.

एकूणच सिद्धू कुठेही गेला तरी निरनिराळ्या वादांनी त्याचा पिच्छा पुरवला. त्यामुळेच म्हणावे लागते की सिद्धू हे वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे ही एक गोष्ट मात्र वादातीत आहे.

– रघुनंदन भागवत
(लेखक क्रीडा अभ्यासक आहेत)

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.