रशियाच्या शेजारील बेलारूस आणि लिथुआनिया या दोन देशांमध्ये फुग्यांमुळे तणाव निर्माण झाला आहे. बेलारुसमधून लिथुआनिया मध्ये मोठ्या प्रमाणत फुगे पाठवण्यात येत आहेत. हे फुग्यांचे प्रमाण एवढे आहे की, या फुग्यांमुळे लिथुआनियामधील हवाई वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील विल्नियस विमानतळ बंद करण्यात आले आहे. बेलारूसमधून तस्करी केलेले हे फुगे आणि त्यासोबत येणा-या ड्रोन यामुळे आपल्या देशाला धोका असल्याचा दावा लिथुआनियानं केला असून देशभरात आणीबाणी जाहीर केली आहे. रशियाच्या शेजारी देश असलेल्या बेलारुस आणि लिथुआनिया या दोन देशात युद्धसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. या दोन्ही देशांमधील लष्कराला तैनात रहाण्याचे आदेश दिले आहेत. फुग्यामुळे या दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. बेलारूसमधून तस्करी केलेले फुगे आणि ड्रोन सतत येत असल्याची तक्रार लिथुआनियानं केली आहे. (Belarus and Lithuania)

हे फुगे थेट विमानतळावर येत आहेत. त्यामुळे लिथुआनियामधील हवाई वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. परिणामी येथील हवाई वाहतूक काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. युरोपियन युनियनने या फुग्यांच्या हल्ल्याला युद्धजन्य परिस्थितीसाठीचे सध्याच्या काळातील प्रगत साधन म्हटले आहे. हा हल्ला म्हणजे, हायब्रिड हल्ला असून यामुळे लिथुआनियाच्या स्वातंत्र्याला धोका असल्याचेही युरोपियन युनियननं स्पष्ट केले आहे. बेलारुसमधून येणा-या या फुग्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सिगरेट आणि अन्य नशेची साधने असल्याची माहिती आहे. लिथुआनियाचे पंतप्रधान इंगा रुगिनिएन यांच्या मतानुसार हे फुगे केवळ तस्करीचे साधन नाही, तर देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि हवाई वाहतुकीसाठी धोकादायक आहेत. लिथुआनिया सरकारनं या फुग्यांसंदर्भात एक समिती नेमली आहे. या समितीनं केलेल्या पाहणीनुसार या वर्षभरात बेलारूसमधून अंदाजे 600 फुगे आणि 200 ड्रोन लिथुआनियाच्या सीमेत आले आहेत. (International News)
या सर्वांमध्ये नशेची सिगरेट आणि अन्य वस्तू पाठवण्यात आल्याचा दावाही आहे. गेल्या महिनाभरात या फुग्यांची संघ्या एवढी वाढली की, विमानांच्या लँडिंगचा मार्गही बाधित झाला आहे. विल्नियस हे येथील प्रमुख विमानतळ आहे. येथे विमानांचे लॅंडिग होत असतांनाच हे मोठे फुगे दिसून आले. त्यामुळे ऐनवेळी विमानांना दुस-या हवाईपट्टीवर उतरावे लागले आहे. ऑक्टोबरपासून विल्नियस विमानतळ 60 तासांहून अधिक काळ बंद आहे. या सर्वात 30,000 हून अधिक प्रवाशांची उड्डाणे विस्कळीत झाली आहेत. शिवाय देशात अन्य ठिकाणीही हे फुगे वारंवार दिसू लागल्यानं दोन्ही देशांमध्ये तणाव वाढू लागला. हे फुगे सुमारे १० किलोमीटर उंचीवर पोहोचू शकतात. यामुळे ते थेट विमानाच्या मार्गात येतात. सुरक्षा संस्थांचे म्हणणे आहे की जर एकही फुगा प्रवासी विमानाशी आदळला तर तो गंभीर अपघात घडू शकतो. म्हणूनच लिथुआनियाने ही केवळ तस्करीची घटना नसून सुरक्षेवर हल्ला मानून देशभरात आणीबाणीची स्थिती जाहीर केली आहे. (Belarus and Lithuania)

हा तणाव इतका वाढला आहे की, ऑक्टोबरमध्ये लिथुआनियाने बेलारूससोबतच्या दोन सीमा चौक्या बंद केल्या आहेत. शिवाय या दोन्ही देशांमधील रस्तेवाहतूकही यामुळे विस्कळीत झाली आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर लिथुआनियाने 2022 मध्ये आणीबाणीची स्थिती जाहीर केली होती. त्यानंतर आता या देशात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. लिथुआनियाचा दावा आहे की, बेलारूसने केलेला हा हल्लाच आहे. लिथुआनियाचे गृहमंत्री व्लादिस्लाव कोंड्राटोविच यांनी, हा केवळ हवाई वाहतुकीत व्यत्यय आणण्याचा मुद्दा नाही तर देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका असल्याचे सांगितले आहे. (International News)
========
हे देखील वाचा : Thailand VS Cambodia : शिवमंदिरावरुन पुन्हा या दोन देशात संघर्ष !
========
मात्र हे सर्व आरोप बेलारुसनं फेटाळून लावले आहेत. लिथुआनियामध्ये येत असलेल्या फुग्यांसोबत आपला कुठलाही संबंध नसल्याचे या सरकारनं सांगितले आहे. बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी लिथुआनिया या मुद्द्याचे राजकारण करत असल्याचा दावा केला आहे. शिवाय हे फुगे कोणालाही धोका देत नाहीत आणि लिथुआनिया अनावश्यकपणे तणाव वाढवत असल्याचे सांगून आम्हाला युद्ध नको, पण युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्यास, आम्ही तयार असल्याचा इशारा लिथुआनियाला दिला आहे. या दोन देशांमध्ये फुग्यांवरुन निर्माण झालेल्या तणावामुळे युरोपियन युनियनही सतर्क झाली आहे. युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनी ही परिस्थिती गंभीर असल्याचे सांगून फुग्यांचे घुसखोरी म्हणजे, हायब्रिड हल्ले असल्याचे वर्णन केले आहे. (Belarus and Lithuania)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
