Home » Langada Mango : लंगडा चालला युरोपला !

Langada Mango : लंगडा चालला युरोपला !

by Team Gajawaja
0 comment
Langada Mango
Share

भारतात मार्च महिना सुरु झाला, की प्रत्येक राज्यात आणि त्यातील गावामध्ये एक फळ तयार होते, ते म्हणजे आंबा. भारतात जेवढ्या भाषा बोलल्या जातात, तेवढेच आंब्याच्या वेगवेगळ्या जाती आहेत. प्रत्येक गावाची माती आणि पाणी वेगळं असते, त्याचाच अंश या अंब्याच्या जातीमध्ये येतो, आणि प्रत्येक आंब्याची चव बदलते. अर्थात चव बदलली तरी त्यातला गोडवा हा प्रत्येकालाच हवाहवासा वाटणारा असतो. महाराष्ट्रामध्ये कोकणात मिळणारा हापूस सर्वाधिक प्रसिद्ध आहे. हापूस आंब्याला परदेशातही मोठी मागणी आहे. याशिवाय उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यामध्ये दशहरी आणि लंगडा या आंब्याची मागणी जास्त असते. त्यातूनही लंगडा आंबा हा सर्वाधिक लोकप्रिय आहे. थोड्या हिरव्या रंगाचा हा लंगडा आंबा, त्याच्या सालावरुन कच्चा वाटत असला तरी त्याची चव ही अप्रतिम असते. (Langada Mango)

शिवाय या आंब्याचा सुगंधही उत्तम असतो. त्यामुळे या लंगडा आंब्याला देशातूनच नव्हे तर परदेशातूनही मोठी मागणी असते. यावर्षी तर या आंब्याला युरोप, अमेरिका आणि आखाती देशांमधूनही मोठी मागणी आली आहे. उत्तरप्रदेशमधील बनारसमध्ये या लंगडा आंब्याच्या मोठ्या बागा आहेत. सध्या या बागांमधील सर्वच आंबा परदेशात पाठवण्यासाठी तयार झाला आहे. आखाती देशातून या लंगडा आंब्याला चढा भाव मिळाल्यानं अंबा बागायतदारही खुश आहेत. उत्तरप्रदेशच्या बनारसमधील लंगडा आंबा मे महिन्याच्या सुरुवातीला बाजारात येऊ लागतो. रंगानं हिरवा पण चवीनं अप्रतिम गोडवा आणि सुगंधी असलेला हा आंबा खवय्यांचा लाडका आहे. उत्तरप्रदेशच्या प्रत्येक जिल्ह्यात हा लंगडा तयार होत असला तरी भगवान शंकराची नगरी असलेल्या बनारसमधील लंगडा आंबा हा चवीसाठी सर्वोत्तम मानला जातो. या आंब्याचे वैशिष्ट म्हणजे, यात रस जास्त असतो आणि तंतूविरहीत आंबा म्हणून प्रसिद्ध आहे. (Latest News)

सध्या याच बनारसी आंब्याचे अनेक पेटारे आखाती देशात पाठवण्याची गडबड चालू आहे. दरवर्षी लंगडा आंबा आखाती देशात आणि युरोपात पाठवला जातो. मात्र गेल्या दोन वर्षापासून लंगडा आंब्याची मागणी युरोपसह अमेरिकेमध्ये आणि आखाती देशातही वाढली आहे. यावर्षी बनारसहून आखाती देशांमध्ये 10 टन लंगडा आंबा पाठवला जाणार आहे. तसेच युरोपमध्येही 10 टन लंगडा आंबा पाठवण्यात येणार आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला लंगडा आंबा तोडण्यासाठी अंबा बागायतदारांची गडबड सुरु होते. लंगडा आंबा हा रंगानं हिरवाच रहातो, त्यामुळे तो तोडतांना काळजी घ्यावी लागते. आंबा झाडावरुन उतरवला की साधारण दहा दिवसांपर्यंत तो परदेशात पाठवला जातो. मे महिन्याच्या दुस-या आठवड्यापासून आंब्याची ही निर्यात प्रक्रिया सुरु होते. बनारस येथील लंगडा आंब्याला जीआय मानांकन मिळाल्यामुळे त्याची विश्वासार्हता वाढली आहे. (Langada Mango)

सोबतच त्याच्या मागणीतही वाढ झाली आहे. ब्रँड बनलेला बनारसी लंगडा आंबा आता जागतिक बाजारपेठेत वर्चस्व गाजवू लागला आहे. उत्तरप्रदेश सरकारनं या लंगडा आंब्याच्या निर्यातीसाठी आणि त्याचे मार्केटींग करण्यासाठी जिल्हा स्तरावर केंद्र चालू केली आहेत. त्यातून लंगडा आंब्याच्या निर्यातीला अधिक फायदा झाला आहे. विशेष म्हणजे या आंब्याची निर्यात करतांना त्यांच्या पेट्या या काळजी घेऊन बनवण्यात येत आहेत. या सर्व पेट्यांवर बनारसी लंगडा आंबा जीआय टॅग छापण्यात आलेला आहे. वाराणसीबरोबरच उत्तरप्रदेशमध्ये चंदौली, मिर्झापूर, भदोही, जौनपूर, गाझीपूर आणि बलिया जिल्ह्यांतील लंगडा आंब्याचाही या जीआय टॅगमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. (Latest News)

==============

हे देखील वाचा : Virat Kohli : किंग कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

Operation Sindoor : या तीन मित्रांनी लिहिली ‘ऑपरेशन सिंदूर’ची स्टोरी !

==============

बनारसमधील लंगडा आंब्याचा इतिहास सुमारे 300 वर्ष जुना आहे. हा लंगडा आंबा बनारसमध्ये कसा आला आणि त्याचे नाव लंगडा कसे पडले याची एक कथा सांगितली जाते. बनारसमधील एक शिवमंदिरात असलेल्या पुजा-याकडे हे लंगडा आब्यांचे झाड होते. त्यांनी या आंब्यापासून मंदिराच्या आवारात अनेक तशीच आंब्याची झाडे तयार केली. त्यातील एका झाडाचे आंबे हे भगवान शंकराला प्रसाद म्हणून चढवले जायचे. नंतर तो प्रसाद भक्तांमध्ये वाटला जायचा. या आंब्याला देतांना पुजारी त्याच्या बाट्यापासून आंब्याचे रोपटे तयार करायला सांगत असे. अशाप्रकारे बनारसमध्ये या आंब्याची झाडे सर्वत्र झाली. ज्या पुजा-यानं हा आंबा वाटला, तो लंगडा होता. त्यामळे लंगड्या पुजा-यानं दिलेला आंबा, म्हणून लंगडा आंबा हे नाव प्रचलित झालं, आणि पुढे तेच नाव त्या आंब्याची ओळख झाली. आता हाच लंगडा आंबा परदेशातही प्रसिद्ध झाला आहे. (Langada Mango)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.