भारतात नवदुर्गांचा नवरात्रोत्सव साजरा होत आहे. नवरात्रोत्सवानिमित्त देशभरातील देवींची मंदिरे सजली आहेत. यात होम हवन होत आहे. देवीची ओटी भरण्यासाठी आणि देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मंदिरात मोठी गर्दी आहे. मात्र या सर्व मंदिरांसोबत भारतातील असे एक मंदिर आहे, जिथे देवीच्या या उत्सवानिमित्त चक्क पेटत्या निखा-यांना देवीचे भक्त एकमेकांच्या अंगावर टाकतात. अशानं रोगराई नष्ट होते, भविष्यात होणारे आजार दूर होतात, अशी भक्तांची भावना आहे. हे मंदिर आहे, कर्नाटक राज्यातील दुर्गा परमेश्वरी मंदिर. (Karnataka Temple)
कर्नाटक राज्यातील अनेक मंदिरे (Karnataka Temple) प्रसिद्ध आहेत. तेथील वास्तुकलेचा अभ्यास करण्यासाठी देशविदेशातील तज्ञ या मंदिरांना भेट देतात. प्राचीन काळातील या मंदिरांमध्ये आजही पूजा अत्यंत पारंपारिक पद्धतीनं केली जाते. प्राचीन काळापासून चालत आलेल्या चालीरिती या मंदिरात काटेकोरपणे पाळल्या जातात. यात सर्वांत दुर्गा परमेश्वरी मंदिर प्रमुख आहे. मंगळूरपासून 30 किलोमिटर अंतरावर असलेले हे मंदिर स्थानिक भाषेत कोकटिला मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिरात नेहमी भक्तांची गर्दी असतेच. पण आता नवरात्रीच्या दिवसांत येथे भाविकांची गर्दी झाली आहे. यामागे या मंदिरात पाळण्यात येणारी प्राचीन प्रथा आहे. मंदिरात, नवरात्रीच्या नऊ दिवसांत आगीचा खेळ खेळला जातो. पेटते निखारे एकमेकांवर टाकले जातात. हे अग्निचे निखारे म्हणजे, देवीचा आशीर्वाद असल्याचे सांगण्यात येते. यामुळे देवी आपल्या भक्तांवर कवच निर्माण करते. त्यामुळे रोगराईही दूर पळते, अशी भक्तांची भावना आहे.
एकमेकांवर निखारे टाकण्याच्या या परंपरेला अग्नि केली असे म्हटले जाते. ही परंपरा मंदिरात शतकानुशतके चालत असल्याची माहिती आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात होणारी पेटत्या निखा-यांची पूजा आणि त्यानंतर होणारा त्यांचा वर्षाव पाहण्यासाठीही मोठी गर्दी होते. दुर्गा परमेश्वरीचे हे मंदिर स्थानिकांमध्ये जेवढे लोकप्रिय आहे, तेवढेच या देवीचे भक्त भारतभर आहेत. नवरात्रीच्या दिवसात हे भारतभरातील देवीचे भक्त आवर्जून मंदिरात येतात. (Karnataka Temple)
नंदिनी नदीच्या काठावर दुर्गा परमेश्वरी मंदिर आहे. हे मंदिर ज्या भागात आहे, त्या आतुर आणि कलत्तूर या दोन गावांतील नागरिकांमध्ये ही अग्निकेलीची परंपरा चालते. हा उत्सव सुरु करण्यापूर्वी दुर्गा परमेश्वरी मातेची भव्य मिरवणूक काढली जाते. पारंपारिक वांद्याच्या गजर केला जातो. मोठी गर्दी यावेळी होते. ज्यांना मंदिरात येता येत नाही, त्यांच्या भेटीसाठी प्रत्यक्ष माता दुर्गा परमेश्वरी आल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर देवीला तलावात स्नान केले जाते. यानंतर उपस्थितही या तलावात स्नान करतात. मग या आतुर आणि कलत्तूर गावातील नागरिकांचे दोन संघ तयार केले जातात. या दोन संघातील प्रमुख नारळाच्या सालापासून बनवलेल्या मशाली हाती घेऊन एकमेकांसमोर उभे राहतात. पूजा झाल्यावर आणि घोषणा झाल्यावर जळत्या मशाली एकमेकांवर फेकल्या जातात. हा खेळ सुमारे 15 मिनिटे चालतो. या खेळाचेही काही नियम आहेत आणि ते नियम काटेकोरपणे पाळले जातात. त्यानुसार एखादी व्यक्ती केवळ पाच वेळा पेटती मशाल टाकू शकते. त्यानंतर या व्यक्ती मशाली विझवून या खेळातून माघार घेतात. हा खेळ खेळण्यामागे स्थानिक एक परंपरा असल्याचे सांगतात. या परंपरेमुळे कोणत्याही व्यक्तीला आर्थिक किंवा शारीरिक समस्या असल्यास तो व्यक्ती या खेळात सहभागी झाल्यानं त्याच्या सर्व समस्या दूर होतात. (Karnataka Temple)
नवरात्रीचे नऊ दिवस या मंदिरात मोठे सांस्कृतिक कार्यक्रमही होतात. मंदिराचे स्वतःचे नाट्य केंद्र आहे. यात यक्षगान नावाचे नाट्य सादर करण्यात येते. या यक्षगानामध्ये देवी दुर्गा परमेश्वरी देवीने राक्षसांच्या नाशाचे वर्णन केले आहे. अभिनय, संगीत आणि नृत्य यांचा या नाटकात समावेश असतो. हे बघण्यासाठी देशविदेशातील कलारसिक आवर्जून येतात. दुर्गा परमेश्वरी मंदिर आणि त्यातील प्रथांबाबत एक पौराणिक कथा सांगितली जाते त्यानुसार, अरुणासुर नावाच्या राक्षसाला ब्रह्मदेवाने कोणताही दोन पाय किंवा चार पायांचा प्राणी त्याला मारू शकणार नाही, असे वरदान दिले होते. या वरदानामुळे अरुणासुरने पृथ्वीवरील मनुष्यांवर अत्याचार केले. हे अत्याचार एवढे वाढले की, अरुणासुराला मारण्यासाठी प्रत्यक्ष देवीला जन्म घ्यावा लागला. दुर्गा मातेनं खडकाचे रुप घेतले. देवीनं अरुणासुराचा वध केला, त्या ठिकाणी दुर्गा परमेश्वरी मंदिर बांधण्यात आल्याची माहिती आहे.
===========
हे देखील वाचा : पांडवांनी स्थापन केलेले ‘हे’ माता मंदिर
==========
या मंदिराच्या प्रवेशद्वाराला गोपुरा म्हणतात. मंदिराची उंची 108 फूट आहे. मंदिर पहाटे 4 वाजता उघडते आणि दुपारी 12 ते 3 या वेळेत त्याचे दरवाजे बंद असतात. त्यानंतर दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी खुले असते. दुपारी 12:30 ते 3 आणि रात्री 8:30 ते 10 या वेळेत भाविकांसाठी प्रसाद म्हणून भोजन देण्यात येते. दुर्गा परमेश्वरीचे हे मंदिर सुंदर, नक्षीदार अशा खांबांनी सजलेले आहे. आता या मंदिरात नऊ दिवस उत्सव सुरु असून दस-याला मोठ्या समारंभांनी त्याची समाप्ती होणार आहे.
सई बने