१९९४ च्या एप्रिलची गोष्ट. भारतीय संघ शारजामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे मॅच खेळत होता. पंचेचाळीसावी ओव्हर टाकायला शेन वॉर्न आला तेव्हा भारताची परिस्थिती तशी चांगली होती. ६ ओव्हर्समध्ये ३१ धावा काढणं विशेष अवघड काम नव्हतं.
वॉर्नचा पहिलाच चेंडू. समोर खेळणारा २२ वर्षांचा एक डावखुरा खेळाडू गवतामागे दबा धरून बसलेल्या सिंहिणीप्रमाणे नेमक्या क्षणाची वाट बघत होता. सावज टप्प्यात आलं, क्षणार्धात दोन पावलं पुढे टाकत झडप घातली गेली आणि चेंडू बॉलरमागच्या साईट स्क्रीनवर जाऊन विसावला. त्यानंतर एक चांगला उंची दिलेला चेंडू, कोरड्या खेळपट्टीवर खराब झालेल्या पॅचवर टाकून फलंदाजाला अडकवण्याचा शेन वॉर्नचा प्लॅन होता. फलंदाज मात्र त्याला पुरून उरला. चेंडू यायची वाट बघितली आणि कव्हर्समधून चौकार! पाठोपाठ अजून एकदा पुढे येऊन हल्ला. ह्यावेळी समोर नाही, तर कव्हर्सच्या डोक्यावरून सिक्सर!
लेग स्पिनरवर चढवलेल्या त्या अफलातून हल्ल्याची सांगता मिडविकेटच्या डोक्यावरून चौकार मारून झाली. एका ओव्हरमध्ये तब्बल २२ रन्स कुटल्या गेल्या. थोडीफार कठीण होऊ शकत असणारी मॅच एका ओव्हरमध्ये अर्धमेली झाली. समोर होता डावखुरा बेधडक विनोद कांबळी! तेव्हाचा स्पिन गोलंदाजी फोडून काढणारा तरुण खेळाडू विनोद कांबळी (Vinod Kambli) आज ५० वर्षांचा होतोय.
मुंबईच्या चाळीतून पुढे आलेला आचरेकर सरांचा शिष्य, सचिनचा जिगरी मित्र – विनोद कांबळी. विनोदचा बेडर स्वभाव त्याच्या खेळातून सहजपणे झिरपत यायचा. स्वतःच्या रणजी ट्रॉफी कारकिर्दीची सुरुवातच सिक्सर मारून करण्याचं वेडं साहस त्याच्यात होतं. पण सचिन नावाच्या वादळापुढे तो कायमच झाकोळला गेला.
कसोटी क्रिकेट खेळायला त्याला दोनेक वर्षं उशीर झाला, पण १९९३ साली खेळायला मिळाल्यानंतर त्याने इंग्लंड, झिम्बाब्वे आणि श्रीलंकेला असं काही झोडपून घेतलं की, केवळ १४ डावात १००० धावा पूर्ण केल्या. इंग्लंड, झिंबाब्वेविरुद्ध लागोपाठ द्विशतक, नंतर लंका दौऱ्यात दोन शतकं.
विनोदचा शाळेपासूनचा घट्ट मित्र सचिन आधीच जगभरातली मैदानं मारत होता, त्यात आता विनोदचीही भर पडली. शाळेत असताना सचिन – विनोदने केलेल्या ६६४ धावांच्या भागिदारीप्रमाणे आता भारतीय संघात खेळतानाही ही जोडी मैदान गाजवणार, अशी चिन्हं दिसायला लागली होती. पण.. पण असं व्हायचं नव्हतं.
पण, किंतु, परंतु, ifs and, buts ला काही अर्थ नसतो खरंतर. गेलेली वेळ परत येत नाही. १९९४ मध्ये न्यूझीलंड आणि वेस्टइंडिजने चौखूर उधळलेल्या विनोदला वेसण घालून टाकली. कसोटी कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी ब्रॅडमनच्या जवळपास जाणारी बॅटिंग सरासरी दुसऱ्या वर्षात थेट १५ वर आली.
एका उमद्या खेळाडूचं करियर उण्यापुऱ्या १७ कसोटी सामन्यात आणि फक्त २ वर्षात संपलंसुध्दा. विनोदची वेळ गेली. त्याच्यानंतर भारतीय संघाच्या मधल्या फळीत जे तीन खेळाडू आले ते कदाचित विनोदइतके निसर्गदत्त लेणं घेऊन आलेले नव्हते, पण त्यांच्याकडे जे काही होतं त्या क्षमतेचा पूर्ण वापर आणि तुलनेने साधी राहणी विनोदला कायम मात देत राहिली. विनोद रणजी ट्रॉफीमध्ये प्रयत्न करीत राहिला, पण ज्या ‘वेळेला’ त्याने बेदखल केलं होतं ती ‘वेळ’ पुन्हा त्याच्याकडे कधीच वाकडी वाट करून आली नाही.
नव्वदीच्या दशकात जर तुम्ही क्रिकेट बघितलं असेल, तर विनोदच्या कारकिर्दीची उतरण तुम्ही बघितली असेल. पण जर आजच्या तरुण, लहान मुलांनी ‘कोण होता हा इतका भारी फलंदाज’ असं कुतूहल वाटून इंटरनेटवर धांडोळा घ्यायचा प्रयत्न केला, तर दुर्दैवाने विनोदच्या क्रिकेटमधल्या दर्जेदार कामगिरीपेक्षा त्याने निर्माण केलेले वाद -विवाद, मतभेद, त्याची दुखणी, त्याचं कौटुंबिक जीवन हेच सगळं बघायला मिळेल. हे दुर्दैव चाहत्यांचं की, स्वतः विनोदचं हे मात्र सांगता येणार नाही.
यशस्वी लोकांबद्दल होणारं गॉसिप, चर्चा अटळ आहे. आपण प्रत्यक्षात अनुभव घेणं शक्य नसलं तरी विनोदबद्दलही अनेक गोष्टी आपण वाचलेल्या आहेत. यशस्वी कारकिर्दीसोबत अनेक दुर्गुण त्याला येऊन चिकटले. हे दुर्गुण म्हणजे काय तर, एक प्रकारचा मनाला चिकटलेला व्हायरसच. तसं संपूर्ण चांगलं कुणीच नसतं. पण हा व्हायरस आपल्या मनातल्या छोट्याश्या वाईट गोष्टीला आपलंसं करतो आणि मग त्या वाईट गोष्टींच्या भराभर कॉपीज निघत जातात.
मनात जर योग्य वेळेत अँटी बॉडीज निर्माण झाल्या नाहीत, किंवा जर बाहेरून मिळणाऱ्या मदतीच्या लसीचाही उपयोग झाला नाही, तर मग हा व्हायरस तुम्हाला संपवणार हे निश्चित. आपण समूहात राहतो त्यामुळे माणूस वेगळा असला तरी सार्वजनिक जीवनात कसंही जगण्याची मुभा आपल्याला मिळत नाही. सगळ्यांची असतात तशी भारतीय समूहाची, आपल्या क्रिकेट समूहाची नीतिमत्तेची, वागण्या-बोलण्याची काही तत्त्वं असणारच. विनोद कांबळी (Vinod Kambli) जरा वेगळा होता. अशा लोकांचा निभाव लागणं थोडं कठीणच असतं.
हे ही वाचा: दी ॲशेस! तब्बल १३९ वर्षांपूर्वी सुरु झालेल्या ॲशेस मालिकेची रंजक कहाणी
परफॉर्मन्स होत आहे, कुणाचा तरी फायदा होत आहे तोपर्यंत त्यांना सहन केलं जाऊ शकतं, पण पाणी नाकावर गेलं की, माकडीण पण आधी स्वतः श्वास शोधते, इथे माणसाची तर काय गोष्ट. कदाचित विनोदच्या व्यसनाचा आणि भांडणाचा कडेलोट झाला असेल. विनोद अँटी बॉडीज निर्माण करू शकला नाही आणि त्याला दूर व्हावं लागलं, कायमचं! असो. जे व्हायचं होतं ते झालं.
विनोदने त्याचं बालपणही मोठ्या कष्टात घालवलं असावं. त्याने तात्पुरत्या यशाच्या जोरावर तारुण्य उपभोगलं, पण स्वतःच्या यशाची मधुर फळं चाखायच्या, लोकांचं प्रेम अनुभवायच्या काळात मात्र त्याच्यावर दुसऱ्यांसाठी टाळ्या वाजवायची वेळ आली.
हे ही वाचा: अजित आगरकर(Ajit Agarkar): पूर्ण न उमललेले फुल
क्रिकेटमधलं अपयश झाकण्यासाठी अन्य मार्गाने तग धरून राहण्याच्या प्रयत्नात अजून चुका झाल्या. आयुष्याचं सगळं गणितच बिघडलं. पण आज वयाच्या उत्तरार्धात मात्र खवळलेल्या समुद्राचं पाणी थोडंसं शांत झाल्यासारखं वाटतंय. आपण त्याच्या इतके जवळ नाही आहोत, पण लांबून तरी विनोद कांबळी (Vinod Kambli) त्याच्या फॅमिलीसोबत एक चांगलं जीवन जगतोय, असं दिसतंय. अळवावरच्या पाण्यासारखी हातातून सतत निसटून जात राहणारी शांतता आणि यश त्याला कायम मिळत राहो, हीच त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनोकामना!
– केदारओक