Home » ‘मी वसंतराव’च्या निमित्ताने उलगडणार भाई आणि वसंताची मैत्री!

‘मी वसंतराव’च्या निमित्ताने उलगडणार भाई आणि वसंताची मैत्री!

by Team Gajawaja
0 comment
मी वसंतराव
Share

माझं घराणं हे माझ्यापासून सुरु होतं, हे आत्मविश्वासानं सांगणाऱ्या वसंतरावांची सांगितिक कारकीर्द यशोशिखरावर पोहोचली असली तरी त्यांचा तिथंवर पोहोचण्याचा प्रवास मात्र अतिशय खडतर होता. या संघर्षमयी प्रवासात त्यांना कायम साथ लाभली ती महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाची म्हणजेच पु. ल. देशपांडे यांची. आज ‘मी वसंतराव’च्या निमित्ताने त्यांच्या त्या काळात रंगलेल्या मैत्रीच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.

पंडित वसंतराव देशपांडे आणि पु. ल. देशपांडे या दोघांनाही साहित्याची आवड. तिथेच या दोघांचे सूर जुळले. पंडित वसंतराव देशपांडे यांच्यातील सच्चा गायक पु. ल. देशपांडे यांनी हेरला. आवाजातील जादू ओळखून कारकुनी सोडून पूर्णवेळ गायकी सुरु करण्याचा मोलाचा सल्ला भाईनी त्यावेळी वसंतरावांना दिला.

चाळीसाव्या वर्षी संगीत कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या पंडित वसंतराव देशपांडे यांना भाईंनी सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणी साथ दिली. ते नेहमीच वसंतरावांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. ‘आता दोन प्रकारचे लोक असतील, एक वसंता हा एकमेव गायक आहे आणि दुसरे वसंता हा गायकच नाही.” असे स्पष्टपणे सांगणाऱ्या भाईंची वसंतरावांना मोलाची साथ लाभली.

====

हे देखील वाचा: ‘मी वसंतराव’ पहिली झलक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या हस्ते प्रेक्षकांच्या भेटीला

====

‘मी वसंतराव’ या चित्रपटात पु. ल देशपांडे यांची भूमिका पुष्कराज चिरपुटकर यांनी साकारली आहे. आपल्या भूमिकेबद्दल पुष्कराज चिरपुटकर म्हणतात, पु. ल. देशपांडे एक बहुरूपी होते. लेखक, नाटककार, नट, कथाकार, पटकथाकार, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, साहित्यिक अशा नानाविविध छटांमध्ये त्यांचं व्यक्तिमत्व सामावलेलं होतं. साहित्य कलेचे गुण जणू त्यांना जन्मजातच मिळालेले आणि पंडित वसंतराव यांना आईकडून गायकीचा वारसा लाभलेला. मी खूप नशीबवान आहे की अशा महान व्यक्तिमत्वाची भूमिका साकारण्याची मला संधी मिळाली, यातच सर्व काही आले.

मुळात भाई हे अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आणि त्यामुळे त्यांची व्यक्तिरेखा सादर करणं जरा दडपणच होतं. मात्र ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मला निपुणनं मदत केली. भाईंच्या स्वभावात हजरजबाबीपणा आणि मिश्किल विनोदी वृत्ती होती. त्यांची व्यक्त व्हायची एक अचूक वेळ असायची अशा अनेक बारकाव्यांचा मला अभ्यास करावा लागला. त्यांच्या सारख दिसण्यासाठीही मला थोडी मेहनत घ्यावी लागली.

====

हे देखील वाचा: पांघरूण (Panghrun): एक विलक्षण प्रेमकहाणी

====

तर राहुल देशपांडे म्हणतात, ”मला आजोबांचा सहवास फारसा लाभला नाही. त्यामुळे कुटुंबाकडून, नातेवाईकांकडून, त्यांच्या सान्निध्यात आलेल्या सर्वांकडून मी आजोबांविषयीचे किस्से ऐकून आहे. त्यापैकीच एक म्हणजे आजोबा आणि भाईंची मैत्री. त्यांची मैत्री त्यांनी शेवटपर्यंत टिकवून ठेवली. त्यांचे अनेक किस्से मी ऐकले, जे चित्रपटात तुम्हाला पाहायला मिळतील. आजोबांच्या या सर्व प्रवासात भाईंनी त्यांना खूप मोलाची साथ दिली. जिथे फक्त अंधार दिसतोय तिथेच आशेचा किरणही आहे, याची जाणीवही भाईंनीच आजोबांना करून दिली.”

जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘मी वसंतराव’ या चित्रपटाची निर्मिती चंद्रशेखर गोखले, दर्शन देसाई, निरंजन किर्लोस्कर यांनी केली असून ‘गुढी पाडव्याच्या’ शुभ मुहूर्तावर म्हणजेच १ एप्रिल रोजी ही सांगीतिक मैफल रंगणार आहे. या चित्रपटात राहुल देशपांडे, अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर, कौमुदी वालोकर आणि अमेय वाघ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.