साल १९२९, जर्मनीमध्ये फ्रेडरिक रिटर नावाचा एक डॉक्टर राहत होता. त्याचं आयुष्य तसं नीट सुरु होत पण त्याला हवी होती फक्त शांतता, एक अशी जागा जिथे तो त्याच्या स्वतःच्या नियमांनुसार जगू शकेल, आणि मग तो आणि त्याची मैत्रीण डोरे स्ट्रॉच यांनी ठरवलं की आपण युरोपमधल्या गोंधळातून, युद्धातून आणि ताणतणावातून निघून एखाद्या शांत ठिकाणी जायचं आणि ते थेट आले इक्वेडोरच्या किनाऱ्यापासून जवळजवळ १,००० किमी अंतरावर असलेल्या प्रशांत महासागरात ज्वालामुखी बेटांचा समूह असलेल्या गॅलोपागोस बेटांवरील एका ठिकाणी,फ्लोरेआना बेटावर! (Galapagos Affair)
आता बेट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं समुद्राच्या मधोमध असलेलं एक सुंदर जंगल असलेलं ठिकाण ! जिथे हिरवीगार झाडं, निळा समुद्र आणि पक्ष्यांची किलबिल असेल पण आजूबाजूला कुणीच नसेल. फ्रेडरिक रिटर आणि त्याच्या मैत्रिणीसाठी हे ड्रीम लाइफस्टाइलच होत. त्यांच्यासाठी हा जणू पृथ्वीवरचा स्वर्गच ! पण हाच स्वर्ग काही लोकांसाठी नरक ठरला. कारण तिथे राहायला आलेली एकेक माणसं गायब होऊ लागली. पण कशी ? त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं ? काय होती त्या सर्वांची गोष्ट? जाणून घेऊ. (Top Stories)
हे फ्लोरियाना जवळजवळ पूर्णपणे निर्जन बेट होत. रिटर आणि डोरे स्ट्रॉचसाठी, हे परफेक्ट ठिकाण होत. इथे ते फक्त काही सामान घेऊन आले होते. काही हत्यारं, बिर्याणी, एक तंबू,मेडिसिन्स आणि एक कुत्रा. इथे आल्यावर त्यांनी एका लहान टेकडीच्या उतारावर एक जागा निवडली आणि त्यांच नवीन घर बांधल. घर कसलं तिथे त्यांनी छोटीशी झोपडीच बांधली. मग शेती केली, फळं-भाज्या पिकवल्या. तेच खाऊ लागले ! ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करायचे. ते बागेची देखभाल करायचे, मासे पकडायचे आणि जंगली शेळ्यांची शिकार करायचे.(Galapagos Affair)

पण काही दिवसांनी त्यांनी मांस खायचं नाही असं ठरवलं. ते अगदी साधेपणाने जगत होते. वीज नाही, पाणी नाही, घड्याळे नाहीत. निसर्गाशी जुळवून घेत शांत जीवन जगत होते. पुढे ते इथे राहायला लागल्यावर या बेटावर मीडियाची नजर पडली. हे दुर्गम बेट अचानक प्रसिद्ध झालं. रिटर आणि डोरेला “मॉडर्न ॲडम अँड इव्ह इन पॅसिफिक ईडन”, असं नाव दिलं गेलं. सगळं काही छान सुरु होत. पुढे काही काळाने या बेटावर विटमर नावाचं आणखी एक जर्मन कुटुंब आलं. हेन्झ, त्यांची गरोदर पत्नी मार्गरेट आणि त्यांचा किशोरवयीन मुलगा, असं हे विटमर कुटुंब होतं. त्यांनी आपला छोटा शेतमळा केला, स्वतःची एक छोटीशी झोपडी बांधली. रिटर आणि डोरेला मदत करत कधी त्यांची मदत घेत अशाप्रकारे शांतपणे जीवन जगायला सुरूवात केली. यात सुरुवातीला वातावरण सुखद होतं, पण खरी गोष्ट त्यानंतर सुरू झाली ! (Top Stories)
१९३२ मध्ये बेटावर आली एक स्त्री! तिचं नाव होतं बारोनिस एलेओइस. तिच्यासोबत आले होते तिचे दोन बॉयफ्रेंडस फिलिपसन आणि लॉरेंझ. ही बारोनिस जरा हटकेच होती. ती रेशमी पँट घालून बंदूक घेऊन फिरायची, स्वतःला फ्लोरेआनाची राणी म्हणायची ! बेटावर आधीपासून राहणारी दोन्ही कुटुंब कष्टाळू होती. साधं, शांत जीवन जगत होती. कारण त्यांचं AIM एकच होतं जगाच्या गोंगाटापासून दूर जाणं. पण बारोनिससाठी, फ्लोरियाना एक राज्य होत, आश्रयस्थान नव्हत. तीचं स्वप्न मोठं होतं तिला या बेटावर आलिशान हॉटेल बांधायचं होतं.
अर्थातच यामुळे तणाव वाढला. पाणी कमी, अन्न कमी, आणि त्यातच सतत वादविवाद होऊ लागले. ती अशाप्रकारे तिथे राहायची वावरायची जणू काही ते बेट आधीपासून तिच आहे आणि बाकीचे सर्वजण पाहुणे आहेत. दरम्यान बॅरोनेसने काही समुद्रकिनारे स्वतःचे असल्याचा दावा केला, तिने परवानगी दिल्याशिवाय काही फळबागांना परवानगी नव्हती. जे मार्ग उघडे होते ते तिचे मार्ग बनले. शिवाय बारोनिस इतरांची पत्रं चोरून स्वतःचे रंगीत किस्से बाहेर पाठवत असे, या सगळ्या गोष्टींमुळे तिची खूप चर्चा झाली. पण तिच्या प्रसिद्धीच्या मागे सगळ्यांच्या नजरा होत्या. लॉरेंझसोबत तर बारोनिस आणि फिलिपसन दोघेही वाईट वागायचे. मग लॉरेंझ विटमर कुटुंबाकडे पळून जायचा, पण या बेटावर कुणालाच शांतता नव्हती. छोट्या बेटावर एकेकाचे अहंकार वाढू लागले, आणि लवकरच ते बेट बनलं संघर्षाचं रणांगण. (Galapagos Affair)
आणि मग घडलं असं काही, की जग हादरलं. मार्च १९३४ च्या एका सकाळी बातमी आली बारोनिस आणि तिचा प्रियकर फिलिपसन अचानक गायब झाले. मार्गरेट विटमर म्हणाली की ते ताहितीला गेले. पण गंमत म्हणजे, तिथे जाण्यासाठी कोणतंही जहाज बेटावर आलंच नव्हतं. डोरे स्ट्राउचने तर सांगितलं की, त्या रात्री तिने भयंकर किंचाळी ऐकली. पण पुरावा कुठेच नाही. बारोनिस आणि फिलिपसन कायमचे गायब झाले. काही महिन्यांनी लॉरेंझने बेट सोडण्याचा प्रयत्न केला. एक नॉर्वेजियन मच्छीमार त्याला घेऊन गेला, पण दोघंही मृत अवस्थेत सापडले ते दूरवरच्या निर्जन बेटावर तहानेने मरून गेले होते. त्यांच्या शरीराला सूर्याने ममीसारखं बनवलं होतं. इतकंच नाही, तर नोव्हेंबर १९३४ मध्ये डॉक्टर रिटरही मृत झाला. असं म्हणतात की त्याने खराब चिकन खाल्लं होतं, पण त्याने मरताना डोरेवर आरोप केला की “तिने मला विष दिलं!” काय खरं, काय खोटं कुणालाच माहित नाही. पण एका वर्षातच ३ लोक मरण पावले, दोन गायब झाले, आणि एक छोटं बेट जगभर चर्चेत आलं. त्यांच्यावर कोणा आदिवासी जमातीने हल्ला केला होता की एखाद्या अदृश्य शक्तीने याचं कोडं आजही सुटलेलं नाही. (Top Stories)
===============
हे देखील वाचा : Navi Mumbai : भारताच्या पहिल्या ‘पूर्ण डिजिटल आणि सर्वात सुरक्षित’ एअरपोर्टची वैशिष्ट्ये
===============
या सत्य घटनेवर आधारित रॉन हॉवर्ड यांनी ईडन हा चित्रपटसुद्दा काढला आहे. शिवाय आज फ्लोरेआना टुरिस्ट प्लेस आहे. त्या बेटावर आजही Post Office Bay नावाचं ठिकाण आहे, जिथे जुना बॅरल ठेवलेला आहे. प्रवासी तिथे पत्रं ठेवतात, आणि इतर प्रवासी ती पत्रं पुढे पोहोचवतात. पण आज जवळजवळ शंभर वर्षांनंतरही तिथून गायब झालेल्या माणसांचं रहस्य सुटलेलं नाही. बारोनिस आणि फिलिपसन खरंच बेट सोडून गेले की त्यांची हत्या झाली? लॉरेंझचा मृत्यू अपघात होता की कोणी जाणीवपूर्वक घडवला? डॉक्टर रिटरला खरोखर विष दिलं होतं का? हे प्रश्न अजूनही हवेतच आहेत. फक्त विटमर कुटुंब जिवंत राहिलं, त्यांनी पुढे तिथे पर्यटन व्यवसाय सुरू केला. मार्गरेट ९६ वर्षांपर्यंत जगली आणि तिने स्वतःचे अनुभव पुस्तकात लिहिले. पण खरी गोष्ट कुणालाच कळली नाही.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
