आजच्या धकाधकीच्या जीवनात कोणालाच स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. प्रत्येक जणं नोकरी आणि घर यामध्ये कसरत करताना दिसत आहे. मात्र यामुळे आपल्या शरीराचे नुकसान होत आहे. वेळेआधीच आपण अधिक नाजूक होत आहोत. आपण आपल्या वयाआधीच म्हातारे होत आहोत. यासाठी आपण काही उपाय करताना दिसतो, मात्र त्यात सातत्य नसल्याने याचा फायदा आपल्याला होताना दिसत नाही.
आजच्या आधुनिक जगात अतिशय सामान्य आणि प्रत्येकालाच भेडसावणारी समस्या म्हणजे केसगळती. स्त्री असो किंवा पुरुष सोबतच लहान मुलं असो सगळ्यांनाच ही समस्या त्रास देत आहे. अनेक औषधं, विविध तेलं लावून देखील केसांच्या समस्या कमी होत नाही. आपल्या सौंदर्यामध्ये भर घालण्याचे काम केस करत असतात. लोकांच्या आकर्षणाची बाब देखील केसच असतात. स्त्रियांचे लांबसडक, घनदाट केस दिसले की आपोआपच सगळ्यांचे लक्ष त्याकडे जाते आणि आपले पण केस असे असावे हा विचार मनात येतो.
मात्र आपल्या केसांकडे आणि त्यांच्या आरोग्याकडे पाहून आपल्याला वाईट वाटते. अशावेळेस काय करावे हा प्रश्न आता सगळ्यांनाच पडत आहे. याच प्रश्नाचे उत्तर आज आम्ही देणार आहोत. आपल्या योग शास्त्रामध्ये यावर काही उत्तम योग प्रकार आहेत, जे करून तुम्ही तुमच्या केसांच्या समस्यांपासून सुटका मिळवू शकता. जाऊन घेऊया त्याबद्दल अधिक माहिती.
केस गळती थांबविण्यासाठी उपयुक्त आसने:
पुढे वाकून केलेली सर्व आसने डोक्यातील व टाळू कडील भागातील रक्ताभिसरण वाढवतात. ह्या मुळे केसांची मुळं मजबूत होतात.
१ अधोमुख श्वानासन
हे आसन केल्याने मस्तकात व्यवस्थित रक्ताभिससरण होते. ज्यामुळे सायनसचा व सर्दीचा त्रास कमी होतो. मानसिक थकवा, तणाव आणि निद्रानाश ह्या लक्षणांवार मात करण्यासाठी देखील हे आसन उत्तम आहे.
श्वानासन करताना आधी ताठ उभे राहावे. दोन्ही पाय एकमेकांना जोडून ठेवावे. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या वर न्यावे. मग खाली वाकावे. दोन्ही हात पुढे नेवून जमिनीला टेकवावे. मान खाली झुकलेली असावी. श्वास सोडत कपाळ जमिनीला टेकवावे. या स्थितीत अर्धा मिनिटं थांबावे. पाय गुडघ्यात दुमडू नये. अर्धा मिनिटं शरीराची ही स्थिती ठेवावी. मग श्वास घेत सरळ उभे राहावे. थोडा विराम घेऊन पुन्हा श्वास सोडत खाली वाकून हे आसन करावे.
२ उत्थानासन:
थकवा व शीण घालवण्यासाठी हे आसन उत्तम समजले जाते. रजोनिवृत्ति काळात ह्या आसनाचा खूप लाभ होतो, पचन शक्तीची वृद्धी होते.
केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी उत्थानासन फायदेशीर असतं. हे आसन नियमित केल्यानं केस गळती तर थांबतेच सोबतच चिंता, काळजी, भीती यासारख्या मानसिक समस्या दूर होतात. मन शांत होते. अशांत मनामुळेही त्वचा आणि केसांशी निगडित समस्या निर्माण होतात. हे आसन करताना ताठ उभे राहावे. दोन्ही हात डोक्याच्या वर सरळ न्यावेत. श्वास सोडत खाली वाकावे. कपाळ गुडघ्यांखाली पायांना टेकवावं. दोन्ही हातांनी मागचे पाय पकडावेत. जास्तीत जास्त खाली वाकण्याचा प्रयत्न करावा. हे आसन करताना पाय गुडघ्यात दुमडू नये. दोन्ही पाय एकमेकांच्या अगदी जवळ ठेवावेत. आसनादरम्यान तोल सांभाळावा. आसनाची स्थिती असताना श्वास रोखून न धरता मंद श्वसन सुरु ठेवावं. आसन सोडताना दीर्घ श्वास घेत ताठ उभं राहावं. किमान 5-6 वेळा हे आसन केल्यास त्याचा फायदा होतो.
३ वज्रासन
हे एकमेव असे आसन आहे जे जेवल्यानंतर लगेच करता येते. मूत्र यंत्रणेचे विकार, वजन कमी होते. पोटातील निर्माण झालेला वायू कमी करण्यासाठीही वज्रासन उत्तम समजले जाते. पचन व्यवस्था नीट काम करत असेल तर त्याचा फायदा आरोग्यासोबताच केसांसाठीही होतो. वज्रासन हे प्रामुख्याने पचन सुधारण्यासाठी परिणामकारक असते म्हणूनच केसांचे आरोग्य चांगले राहावे. पचन व्यवस्था बिघडून त्याचा परिणाम केस कमजोर होण्यावर होवू नये यासाठी नियमित वज्रासन करावे.
कृती :
वज्रासन करताना जमिनीवर गुडघ्यांवर बसावे. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवावे. ताठ बसावे. वज्रासन करताना ध्यान मुद्रेत बसायचे असते. यासाठी डोळे बंद करावेत. खांदे सरळ रेषेत असावेत. वज्रासन करताना शरीरावरील ताण काढून टाकून शरीर सैल सोडावे. पण पाठीत वाकून बसू नये. वज्रासनात पाठ ताठ असायला हवी. वज्रासन करताना श्वास रोखून न धरता मंद श्वसन करावे. एक मिनिटानंतर पाय सोडून बसावे. पुन्हा काही वेळ वज्रासनात बसावे. वरील चार आसनांचा नियमित सराव केल्यास त्याचा फायदा आरोग्यावर होतो. आरोग्य सुधारत आणि केस गळती थांबून केस दाट होतात.
४ पवनमुक्तासन:
पवनमुक्तासन केल्याने शरीरातील वायूवर नियंत्रण येते आणि शरीराचे पचन सुधारते. पाठीच्या खालच्या भागातील स्नायू मजबूत होतात. सोबतच पोट आणि नितंबावरील चरबी कमी होते. पोटातील वायूचा परिणाम केसांच्या मुळांवर होतो. तिथे कोरडेपणा निर्माण होवून केस कमजोर होतात आणि गळतात. या आसनामुळे पोटातील आणि आतड्यातील वायू बाहेर पडतो. हे आसन नियमित केल्यास केस गळणे थांबते.
कृती :
पवनमुक्तासन करण्यासाठी पाठीवर झोपावे. दोन्ही पाय एकदम 90 अंशाच्या कोनात वर उचलावे. दोन्ही हात तोंडासमोर धरावे. नंतर दोन्ही पाय गुडघ्यात दुमडावे. डोक आणि पाठ उचलून दोन्ही हातांनी पायांना घट्ट धरावे, आणि पाय छातीशी आणावे. कपाळ गुडघ्यांवर टेकवावे. या स्थितीत अर्धा मिनिटं थांबावे. पाठ आणि डोकं जमिनीला टेकवावे. हातांनी घातलेली पायाची मीठी सोडवावी. दोन्ही हात तोंडासमोर ताठ धरावे आणि पाय पुन्हा 90 अंशावर आणावे. मग हळूवार हात आणि पाय जमिनीला टेकवावे. किमान दोन वेळा हे आसन करावं.
५ सर्वांगासन:
हे योगासन वेगवेगळ्या मसल्स ग्रुपसाठी मदत करते आणि तुमची शरीरयष्टी सुधारण्यासाठी फायदेशीर आहे, असे मानले जाते. असं म्हणतात की या योगासनामुळे तुमच्या डोक्यातील ब्लड सर्कुलेशन सुधारते आणि कोरड्या आणि विरळ केसांसाठी हे योगासन अत्यंत फायदेशीर आहे.
कृती
आरामात जमिनीवर किंवा चटईवर पाठीवर झोपा. तुमचे पाय हळू हळू वर करा, त्यांना 90° च्या कोनात आणा. आता नितंबवर करताना तुमचे पाय तुमच्या डोक्याच्या दिशेने आणा. तुमचे पाय, छाती आणि पोट एका सरळ रेषेत आणण्याचा प्रयत्न करत असताना, त्यांना वर उचलत राहा. आपल्या तळहातांनी आपल्या कमरेला आधार द्या. तुमची हनुवटी तुमच्या छातीजवळ ठेवा. जोपर्यंत तुम्हाला आरामदायक वाटत असेल तोपर्यंत या स्थितीत राहा. या पोझमध्ये 30 सेकंद किंवा त्याहून अधिक काळ राहण्याचा प्रयत्न करा. आता हळूहळू तुमच्या पहिल्या स्थानावर परत या. हे करण्यासाठी, आपले कूल्हे हळू हळू खाली करा आणि कंबरेला आधार देत सामान्य स्थितीत परत या. हे दोन किंवा तीन वेळा करा.
======
हे देखील वाचा : हेअर ड्रायरचा दररोज केसांसाठी वापर करत असाल तर होईल नुकसान
======
६ शीर्षासन
हे योगासन केसगळती, टक्कल पडणे किंवा केस पातळ होणे इत्यादी केसांच्या समस्या कमी करण्यास मदत करते, असे म्हटले जाते. असं म्हणतात की या योगासनामुळे केस पांढरे होत नाहीत आणि केस वाढतात.
कृती :
शीर्षासन करण्यासाठी सर्वप्रथम चटईवर वज्रासनात बसा. यानंतर दोन्ही कोपर जमिनीवर ठेवा आणि दोन्ही हातांची बोटे एकत्र करा. दोन्ही हातांची बोटे जोडून तुमचे तळवे वरच्या दिशेला असले पाहिजे, जेणेकरुन तुम्ही तुमच्या तळहाताने तुमच्या डोक्याला आधार देऊ शकता. पुढे वाकताना हळू हळू तळहातावर डोके ठेवा. हे करत असताना श्वास सामान्य ठेवा आणि हळूहळू शरीराचा भार डोक्यावर येऊ द्या. या स्थितीत येताना तुम्हाला तुमचे पाय आकाशाकडे वर न्यावे लागतीत. जसे तुम्ही तुमच्या सरळ पायांवर उभे असता, तसेच तुम्ही तुमच्या डोक्यावर उलटे उभे आहात. काही काळ या स्थितीत रहा आणि नंतर सामान्य स्थितीत या.