Home » अमरनाथ यात्रेसारखी अवघड असणारी नागद्वार यात्रा  

अमरनाथ यात्रेसारखी अवघड असणारी नागद्वार यात्रा  

by Team Gajawaja
0 comment
Nagdwar Yatra
Share

भगवान शंकराची अमरनाथ यात्रा सर्वात कठीण यात्रा म्हणून ओळखली जाते.  मात्र प्रती अमरनाथ यात्रा म्हणून मध्यप्रदेशमध्ये होणारी एक यात्रा आहे.  ही यात्रा नागदेवाची आहे.  मध्यप्रदेशच्या सातपुडा जंगल भागात वर्षभरातील अवघ्या दहा दिवसांसाठी या यात्रेचा मार्ग मोकळा करुन देण्यात येतो.  कारण हा सर्व भाग घनदाट जंगलाचा असून यात हिंस्त्र जनावरांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. असे असले तरी सातपुड्याच्या या जंगलात होणारी नागद्वार मंदिर यात्रा देशभरात प्रसिद्ध आहे. या नागद्वार यात्रेसाठी देशभरातून हजारो भाविक दाखल झाले आहेत. सातपुड्याची राणी म्हणून गौरव होणाऱ्या या  पचमढीच्या खोऱ्यात प्रसिद्ध नागद्वार मंदिर आहे.  यालाच मध्य प्रदेशचे अमरनाथ म्हणतात. या नागद्वार मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सात दुर्गम पर्वत चढावे लागतात.  भगवान शिवाचे दुसरे घर म्हणूनही या नागद्वारचा उल्लेख करण्यात येतो.  अत्यंत कठीण मार्ग, सतत पडणारा पाऊस, चिखलाची वाट, डोंग-याचे निसरडे कडे चढण्यासाठी असणा-या शिड्या असा सर्व प्रवास या मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी करावा लागतो.  वर्षभरातून अवघे दहा दिवस उघडण्यात येणा-या या नागद्वार यात्रेसाठी पाच लाख भाविकांनी आपली नोंद केली आहे. (Nagdwar Yatra)

मध्यप्रदेशच्या सातपुड्यामधील पचमढीच्या खोऱ्यात प्रसिद्ध असलेले नागद्वार मंदिर (Nagdwar Yatra) भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.  22 ऑगस्ट पर्यंत होणा-या या यात्रेसाठी देशभरातून सुमारे 5 लाख भाविक सहभागी होत आहेत.  हा नागद्वार मंदिराचा प्रवास अतिशय खडतर आहे. नागद्वार मंदिरात (Nagdwar Yatra) जाण्यासाठी सात पर्वत पार करावे लागतात.  या मंदिरावर 35 फूट लांबीची गुहा आहे. मंदिरात नागदेवतेच्या मूर्ती आहेत. या नागाच्या मुर्तींना काजळ लावण्याची प्रथा स्थानिक भागात आहे.  त्यामुळे नागदेवाची कुटुंबावर कृपा राहते अशी या भागात राहणा-या स्थानिकांची श्रद्धा आहे. नागफणीपासून नागद्वार मंदिराचा प्रवास सुरू होतो. हा संपूर्ण प्रवास सुमारे 15 किलोमीटरचा आहे. यात जेवढी चढ आहे, तेवढाच उतारही आहे, पुन्हा चढ आणि पाय-या तर कुठे डोंगराच्या कड्यावर लावलेल्या लोखंडी शिड्या असा सांभाळत प्रवास करावा लागतो. अत्यंत अवघड अशा या मार्गावर भक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रशासनातर्फे विशेष व्यवस्था आहे.  तसेच या सर्व मार्गावर ठिकठिकाणी भक्तांसाठी मोफत भंडाराही चालवण्यात येतो. नागफणी आणि काळाझार येथे भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था आहे. या भाविकांमध्ये छत्तीसगड, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसह इतर राज्यांतून आलेल्या भाविकांची मोठी संख्या आहे. (Nagdwar Yatra) 

नागद्वारी गुहा सातपुडा व्याघ्र प्रकल्प परिसरात येते. यामुळे येथे वर्षभर प्रवेश प्रतिबंधित आहे. राखीव वन व्यवस्थापनाकडून येथून जाणारे गेट कायमचे बंद करण्यात आलेले आहे. फक्त वर्षातून एकदाच या नागद्वार यात्रेसाठी हे गेट उघडण्यात येते. भाविकांना वन्यजीवांपासून कुठलाही त्रास होऊ नये म्हणून जवळपास हजार पोलीस आणि वनविभागातील जवानांना तैनात करण्यात आले आहे.

नागद्वार मंदिराची (Nagdwar Yatra) वाट एवढी कठीण असली तरी तेथे येणा-या भाविकांची संख्या वाढत आहे. यामागे या नागद्वार मंदिराचा महिमा आहे.  या टेकड्यांवरून जो कोणी भक्त जातो तो त्याच्या कालसर्प दोषातून मुक्त होतो, असे मानले जाते. नागद्वारीतील मुख्य गुहेत बांधलेल्या शिवलिंगावर काजळ चढवल्याने भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात,  असेही सांगण्यात येते.  भाविकांना नागद्वारीत पोहोचण्यासाठी आणि येण्यासाठी 2 दिवस लागतात.  यासाठी या भागात भाविकांच्या राहण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात येते.  सतत होणारा पावसाचा मारा सहन करत भक्त ही दोन दिवसांची खडतर यात्रा नागदेवाचा आणि भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मोठ्या भक्ती भावानं पार पाडतात.  

घनदाट अरण्याचा हा संपूर्ण भाग वनराईनं नटलेला आहे.  या संपूर्ण मार्गात नागदेवतांच्या अनेक मूर्ती पाहायला मिळतात. येथील चिंतामणी नावाची गुहा असून ती नागद्वारीच्या आत आहे.  ही गुहा 100 फूट लांब आहे. याच गुहेत येण्यासाठी भाविक 15 किलोमिटरचा पायी प्रवास करतात. या मार्गावर अनेक विषारी साप दिसतात. मात्र आजपर्यंत एकाही भक्ताला इजा झाल्याची घटना घडलेली नाही. (Nagdwar Yatra) 

===========

हे देखील वाचा : राजस्थानच्या चित्तौडगड किल्ल्यातील गोमुख कुंडाचे रहस्य…

===========

चौरागढ हे पचमढीमधील एक धार्मिक स्थळ आहे. चौरागढ येथे भगवान शंकराला समर्पित मंदिर आहे.  चौरागढचे महादेव मंदिर हे अतिशय प्राचीन मंदिर आहे. महादेव मंदिर पचमढी येथे उंच टेकडीवर आहे. महादेव मंदिरात जाण्यासाठी 2 ते 3 किलोमीटर चालत जावे लागते.  याशिवाय कालभैरव गुहाही चौरागढच्या वाटेवर येते. या गुहेत जाण्याचा मार्ग अत्यंत अवघड आहे. शिवरात्री आणि नागपंचमीच्या वेळी या कालभैरव गुहेत देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करतात. याच भागात वैदेही गुहाही आहे.  वनवासकाळा राम, सीता आणि लक्ष्मण यांचा येथे निवास होता.  देवी सीता या गुहेत स्नान करीत असत त्यामुळे गुहेचे नाव वैदेही गुहा पडल्याची माहिती आहे. हा सर्वच परिसर अशा गुहा आणि प्राचीन मंदिरांनी व्यापलेला आहे. वर्षभर बंद असलेले हा परिसर श्रावणातील दहा दिवस आणि महाशिवरात्रीच्या निमित्त भक्तांसाठी खुला होतो.  तेच निमित्त साधत आता येथे लाखो भाविक भगवान शंकर आणि नागदेवतेच्या दर्शनाचा लाभ घेत आहेत.  

सई बने

 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.