गेल्या काही महिन्यापूर्वी दक्षिण अफ्रिकेमधून मध्यप्रदेशच्या कुनोमध्ये चित्ते आणण्यात आले. ही मोठी घटना होती. या चित्यांबद्दल खूप मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. आता अशीच मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे ती पाणघोड्यांच्या (Hippopotamus) बाबतीत…अर्थात अवाढव्य असे हिप्पोटस भारतात आणले जाणार आहेत. कोलंबिया मधून येणारे हे हिप्पो गुजरातमधील अभयआरण्यात ठेवण्यात येणार आहेत. लॅटिन अमेरिकन देश कोलंबिया येथून भारत आणि मेक्सिकोमध्ये 70 हिप्पो पाठवण्यात येणार आहेत. हे पाणघोडे (Hippopotamus) गुजरात राज्यात येणार असून विशेष म्हणजे या पाणघोड्या पकडण्यापासूनचा ते त्यांना भारतात आणण्यापर्यंतचा सगळा खर्च कोलंबिया सरकार करणार आहे. कोलंबियामध्ये या पाणघोड्यांची संख्या कमालीची वाढली आहे. यामुळे तेथील पर्यावरणाला धोका निर्माण झाला. त्यामुळे तेथील वाढलेले पाणघोडे अन्य देशांना पाठवण्यात येत आहेत. त्याअंतर्गतच हे पाणघोडे भारतात आणण्यात येणार आहेत.
कोलंबियाच्या पाब्लो एस्कोबारच्या पशु फार्मजवळ गेले अनेक वर्षापासून हिप्पोपोटॅमस म्हणजेच पाणघोड्यांची मोठ्या संख्येनं वस्ती आहे. हे पाणघोडे इतके वाढले आहेत की, त्यांना इतरत्र हलवण्याची वेळ कोलंबियन सरकारवर आली आहे. या फार्ममधील किमान 70 पाणघोडे भारत आणि मेक्सिकोला पाठवण्यात येणार आहेत. भारतातील गुजरात राज्यातील जामनगर मधील ग्रीन्स झूलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन किंगडममध्ये 60 पाणघोडे (Hippopotamus) कोलंबियन सरकारतर्फे पाठवण्यात येणार आहेत. पण हे पाणघोडे आणणे सहज सोपे नाही. या पाणघोड्यांचे वजन साधारण 3 ते 5 टन एवढे असते. ते पाण्यात काही काळ राहतात आणि त्यांना एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणे हे धोक्याचे असते. त्यासाठी खूप काळजी आणि आवश्यक असे पिंजरे करावे लागणार आहेत. या सर्व मोहिमेची जबाबदरी कोलंबियन सरकारनं घेतली आहे. कोलंबियातर्फे असे खास पिंजरे तयार करण्यात येणार आहेत. कोलंबिया सरकार पाणघोडे (Hippopotamus) पकडणे, त्यांना वाहून नेणारे लोखंडी कंटेनर आणि विमानाद्वारे भारतात पाठवण्याशी संबंधित सर्व मोहीमेचा संपूर्ण खर्च करणार आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यावर कोलंबियातर्फे तेथील पाणघोडे (Hippopotamus) अन्य देशातील अभयअरण्यातही पाठवण्याबाबत विचार करण्यात येणार आहे.
हे पाणघोडे (Hippopotamus) कोलंबियात कसे आले, आणि त्यांची वाढ कशी झाली, हेही तेवढचे उत्सुकतापूर्ण आहे. पाब्लो एस्कोबार हा कोलंबियाचा जागतिक स्तरावर कुख्यात अंमली पदार्थ तस्कर होता. हा पाब्लो 1993 मध्ये पोलीसांबरोबर झालेल्या चकमकीत मारला गेला. या पाब्लोने 1980 च्या दशकात आफ्रिकेतून चार पाणघोडे बेकायदेशीरपणे आयात केले होते. त्यानं आणलेल्या या चार पाणघोड्यांनी (Hippopotamus) नदीवर जणू कब्जाच केला. गेल्या काही वर्षांमध्ये, हिप्पोची संख्या मॅग्डालेना नदीच्या काठावर असलेल्या हॅसिंडा नेपोल्स रँचच्या पलीकडे मोठ्याप्रमाणत वाढली. पर्यावरण संस्थांचा अंदाज आहे की अँटिओक्विया प्रांतात या प्रदेशात सुमारे 130 हिप्पो आहेत आणि पुढील आठ वर्षांत त्यांची संख्या 400 पर्यंत वाढू शकते. हे पाणघोडे कमी प्रमाणात होते, तेव्हा ते पर्यटकांसाठी पर्यटनाचे स्थळ झाले होते. मात्र या पाणघोड्यांची (Hippopotamus) संख्या वाढू लागल्यावर त्यांची दहशतच अधिक प्रमाणात वाढायला लागली. तेथील जनजीवनही विस्कळीत झाले. अनेक स्थानिकांनी पाणघोड्यांबाबत तक्रार केली होती.
=======
हे देखील वाचा : होळीच्या वेळी तुमच्या स्मार्टफोनसह गॅजेट्सची अशी घ्या काळजी
=======
एस्कोबारचे ‘हॅसिंडा नेपोल्स रँच’ आणि परिसरातील पाणघोडे (Hippopotamus) 1993 पासून पर्यटकांचे प्रमुख आकर्षण म्हणून उदयास आले. पण त्यांच्या वाढत्या संख्येचा परिणाम पर्यावरणालाही झाला. त्यांच्या मलमूत्रामुळे नद्यांची रचना बदलली आहे, नदीकिना-यावर रहाणा-या प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासावर आणि नदिमध्ये रहाणा-या माश्यांच्या जीवनावरही परिणाम होऊ लागला. त्यामुळे कोलंबिया सरकारने गेल्या वर्षी हिप्पोपोटॅमसला विषारी आक्रमण करणारी प्रजाती घोषित केली होती. तिथूनच त्यांच्या स्थलांतराच्या योजना आखण्यात आल्या. कोलंबियातील पर्यावरण मंत्रालय, भारत आणि मेक्सिकोमध्ये पाणघोडे पाठवण्याची योजना एका वर्षाहून अधिक काळ तयार करीत आहे. पाणघोड्यांना (Hippopotamus) पाठवण्याच्या या योजनेसाठी मोठ्याप्रमाणात तयारी करण्यात येत आहे. मोठ्या लोखंडी कंटेनरटी निर्मिती करण्यात येत आहे. त्यातूनच भारतातील गुजरातमध्ये 60 पाणघोडे पाठवण्यात येणार आहेत. असेच पाणघोडे (Hippopotamus) मेक्सिकोसह इक्वाडोर, फिलीपिन्स आणि बोत्सवाना येथेही पाठवण्यात येणार आहेत. याबरोबरच गुजरातनंतर अन्य राज्यातील अभयअरण्यातही असेच पाणघोडे कोलंबियातून येण्याची शक्यता आहे.
सई बने